सहकार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते होणार सरकारी ई -बाजारपेठ (जीईएम) पोर्टलवर खरेदीदार म्हणून सहकारी संस्थांच्या समावेशाचा ई-प्रारंभ

Posted On: 08 AUG 2022 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2022

 

जीईएम पोर्टलवर मागणी नोंदवण्यासाठी  खरेदीदार म्हणून  सहकारी संस्थांच्या समावेशाचा  ई - प्रारंभ उद्या नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह करणार आहेत. सहकार मंत्रालय (भारत सरकार), भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ (एनसीयूआय )आणि जीईएम  यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाचे (एनसीयूआय) अध्यक्ष  दिलीप संघानी हे देखील उपस्थित राहणार आहेत. या ई-प्रारंभामुळे सर्व पात्र सहकारी संस्थांना  जीईएम पोर्टलवर मागणी नोंदवता येणार आहे. सहकारी संस्थांच्या समावेशाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी,जीईएम प्राधिकरणांशी समन्वय साधण्यासाठी या समावेशाच्या प्रक्रियेत  सहकारी संस्थांना सहभागी करून घेण्यासाठी अलीकडेच सहकार मंत्रालयाने भारतीय राष्ट्रीय सहकारी संघाला नोडल संस्था बनवले होते.

पारदर्शक आणि कार्यक्षम रीतीने सामान्य वापराच्या वस्तू आणि सेवा  खरेदी करण्यासाठी , केंद्र आणि राज्य सरकारचे विभाग/ मंत्रालये, सार्वजनिक उपक्रम इ.यांना थेट खरेदीसाठी ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय खरेदी पोर्टल म्हणून जीईएमची  (GeM) स्थापना करण्यात आली आहे, आतापर्यंत जीईएम मंचावर खरेदीदार म्हणून सहकारी संस्थांची नोंदणी करता येत नव्हती. सहकारी संस्थांना जीईएमच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा खरेदी करण्याची परवानगी देण्यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 1 जून रोजी जीईएमसंदर्भातील  आदेशाचा विस्तार करण्यास मान्यता दिली आहे. यामुळे सहकारी संस्थांना खुल्या आणि पारदर्शक प्रक्रियेद्वारे स्पर्धात्मक दर तर मिळतीलच  शिवाय   एकाच व्यासपीठावर उपलब्ध देशभरातील  सुमारे 45 लाख प्रमाणीकृत विक्रेते/सेवा प्रदात्यांकडूनही खरेदी करता येईल.याशिवाय, यामुळे वेळेची बचत होईल आणि सहकारी संस्थांच्या प्रशासकीय खर्चात कपात होईल.

जीईएम पोर्टलवर मागणी नोंदवण्यासाठी  खरेदीदार म्हणून  सहकारी संस्था/बँकांचा समावेश टप्प्याटप्प्याने केला जाईल.पहिल्या टप्प्यात,  'अ'  श्रेणी लेखा परीक्षण असलेल्या आणि   अलीकडच्या  लेखापरीक्षण केलेल्या  वित्तीय विवरणानुसार 100 कोटी रुपयांहून अधिक उलाढाल/ठेवी असलेल्या सहकारी संस्था/बँका  समाविष्ट करण्यात आल्या आहेत.


* * *

S.Kakade/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1850057) Visitor Counter : 208