सांस्कृतिक मंत्रालय
पंतप्रधानांनी “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा”शी संबंधित राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीत केले मार्गदर्शन
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा सध्याच्या पिढीसाठी ‘संस्कारांचा उत्सव’ आहे : पंतप्रधान
अमृत काळ हा आपल्या देशाविषयीची स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी संकल्पातून सिद्धीकडे जाण्याचा काळ असेल: पंतप्रधान
आपण आपल्या ऐक्य भावनेला जोपासून तिचे संवर्धन केले पाहिजे आणि एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेची प्रेरणा पुढे नेली पाहिजे : पंतप्रधान
तिरंगा हा देशासाठी सकारात्मकता आणि समृद्धी आणणाऱ्या ऐक्याचे प्रतीक आहे : पंतप्रधान
Posted On:
06 AUG 2022 10:44PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्ली येथे “स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा”शी संबंधित राष्ट्रीय समितीच्या तिसऱ्या बैठकीला संबोधित केले. लोकसभेचे सभापती, राज्यपाल, केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, सरकारी अधिकारी, माध्यमांचे प्रतिनिधी, आध्यात्मिक नेते, कलाकार आणि चित्रपट क्षेत्राशी संबंधित व्यक्ती तसेच जीवनाच्या विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्तींसह राष्ट्रीय समितीमधील विविध सदस्य या बैठकीला हजर होते. अनेक सदस्य आभासी पद्धतीने देखील या बैठकीत सहभागी झाले. केंद्रीय संस्कृती मंत्रालयाचे सचिव गोविंद मोहन यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याला सुरुवात झाल्यापासून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेणारे सादरीकरण केले.
या राष्ट्रीय समितीची पहिली बैठक 8 मार्च 2021 रोजी झाली होती, त्यानंतर 12 मार्च 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाची सुरुवात केली. या समितीची दुसरी बैठक 22 डिसेंबर 2021 रोजी झाली.
या प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, पंतप्रधान म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकाने योगदान दिल्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला हे यश मिळाले आहे. या महोत्सवासाठी नेमण्यात आलेल्या राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हा पातळीवरील समित्यांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जनसामान्यांपर्यंत नेण्यासाठी अहोरात्र काम केले असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाला असलेली भावनिक छटा हा या अभियानाचा केंद्रबिंदू आहे. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात दिसलेला राष्ट्रभक्तीचा उत्साह अभूतपूर्व आहे. हाच उत्साह आपल्याला आपल्या सध्याच्या पिढीमध्ये रुजविणे आणि त्याचा उपयोग राष्ट्र उभारणीसाठी करणे आवश्यक आहे असे पंतप्रधानांनी पुढे सांगितले. ते म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव देशात राष्ट्रभक्तीच्या उत्साहाने भारलेले वातावरण निर्माण करत असून राष्ट्र उभारणीशी आपल्या युवकांचे भावनिक बंध निर्माण करण्यासाठीची ही सुवर्णसंधी आहे.
या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा युवकांसाठी संस्कारांचा उत्सव आहे आणि हा उत्सव या युवकांमध्ये देशासाठी योगदान देण्याची अमर्याद उत्कटता भरून टाकेल. सध्याची पिढी हे उद्याचे नेते आहेत आणि म्हणून स्वप्ने साकार करण्यासाठी तसेच भारत@100 ची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला आता त्यांच्यामध्ये कर्तव्य आणि जबाबदारीची भावना रुजविणे आवश्यक आहे. पंतप्रधान पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानविषयक क्रांतीने बदल घडून येण्याचा वेग आश्चर्यकारकरित्या वाढविला आहे. आधी जे पिढ्यापिढ्यांच्या अंतराने घडत असे ते आता काही दशकांमध्ये घडणे शक्य झाले आहे.आपल्या देशाची स्वप्ने साकार करण्यासाठी आपण आता जुन्या तंत्रांवर अवलंबून राहू शकत नाही. म्हणूनच आगामी काळात येऊ घातलेल्या तंत्रज्ञानविषयक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आपल्या युवकांची क्षमता बांधणी करणे आणि त्यांना आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे पंतप्रधानांनी सांगितले.
आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की, स्थानिक आदिवासी संग्रहालये उभारून आपण त्यांना श्रद्धांजली वाहिली पाहिजे. देशाच्या शेवटच्या टोकावर राहणार्या लोकांच्या जीवनाची ओळख तरुणांना व्हावी यासाठी "सीमेवरील गाव" असा कार्यक्रम हाती घेण्यात यावा, अशी सूचना त्यांनी केली. त्याचप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात 75 सरोवरे बांधण्याचा कार्यक्रम आणि असे कार्यक्रम तळागाळातील लोकांसाठी आखले जावेत जे पाणी आणि पर्यावरण संवर्धनासाठी उपयुक्त आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितलं. तरुणांना अशा उपक्रमांची ओळख करून दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना देशाची वास्तविकता समजण्यास मदत होईल, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
आपल्या भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले की आपण आपल्या एकतेची जोपासना आणि संवर्धन केले पाहिजे जेणेकरून "एक भारत श्रेष्ठ भारत"म्हणून भारत नावारुपास येईल.कारण एकसंध राष्ट्र हेच प्रगतीशील राष्ट्र राहू शकते. या प्रकाशात, आपला राष्ट्रध्वज तिरंगा हा एकतेचे प्रतीक आहे.अशी एकता जी देशासाठी सकारात्मकता आणि समृद्धी आणते, असे ही ते म्हणाले. पंतप्रधानांनी सांगितलं की आम्ही "संकल्प से सिद्धी" या भावनेने प्रेरित अमृत कालच्या कालखंडातून जात आहोत.हाच कालखंड येत्या 25 वर्षांत आपल्या देशाला यशाच्या शिखरावर नेईल. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अधिक यशस्वी करण्यासाठी त्यांनी समितीच्या सर्व सदस्यांना आपल्या सूचना पाठवण्याची विनंती केली.
समितीच्या सदस्यांनी “ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. या अमृत महोत्सवांतर्गत हाती घेतलेल्या उपक्रमांची माहितीही यावेळी दिली गेली आणि मोहिमेला अधिक बळकटी देण्यासाठी सूचना दिल्या गेल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या राष्ट्रीय समितीच्या या तिसऱ्या बैठकीत सर्व समिती सदस्यांचे स्वागत केले. अमित शहा यांनी यावेळी सांगितले की, देशात आजपर्यंत 60 हजाराहून अधिक कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले गेले आहेत आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रम राष्ट्र ते राज्य, जिल्हा आणि तळागाळात पसरला आहे. आपल्या भाषणाच्या समारोपात त्यांनी पंतप्रधान आणि राष्ट्रीय समितीच्या सदस्यांनी मौल्यवान सूचना आणि वेळ दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
समितीचे सचिव गोविंद मोहन यांनी यावेळी बोलताना सांगितले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव जनसामान्यांची भागीदारी आणि संपूर्ण समाजाच्या दृष्टिकोनातून यशस्वी ठरला असल्यानेच देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला आहे.
***
S.Patil/S.Chitnis/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1849215)
Visitor Counter : 269