वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

नेटवर्क नियोजन गटाने शिफारस केलेले महत्त्वाचे 3 रेल्वे प्रकल्प


महाराष्ट्रातील पाचोरा - जामनेर मार्गाच्या गेज परिवर्तनासह बोदवडपर्यंत विस्तार प्रकल्पाचा समावेश

Posted On: 04 AUG 2022 3:59PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2022

 

‘पीएम  गतिशक्ती राष्ट्रीय बृहद आराखड्याच्या 'संस्थात्मक चौकटी अंतर्गत स्थापन केलेल्या नेटवर्क नियोजन गटाने  परीक्षण करून 3 ऑगस्ट 2022 रोजी   3 महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांची   शिफारस केली आहे. शिफारस केलेल्या या  प्रकल्पांमध्ये महाराष्ट्रातील पाचोरा-जामनेर मार्गाचे गेज परिवर्तन  आणि बोदवडपर्यंत विस्तार प्रकल्पासह गोरखपूर छावणी -वाल्मिकीनगर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण, कटिहार-मुकुरिया आणि कटिहार-कुमेदपूर मार्गाचे दुहेरीकरण यांचा समावेश आहे. लॉजिस्टिक कार्यक्षमतेला गती मिळण्याच्या  आणि लॉजिस्टिक खर्चात कपात होण्याच्या अनुषंगाने दुर्गम प्रदेशात मालाची जलद वाहतूक  सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने  सर्व 3 प्रकल्प  अतिशय महत्त्वाचे आहेत.

3000 दशलक्ष मेट्रिक टन मालवाहतुकीचे उद्दिष्ट  साध्य करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने  रेल्वे मार्गांचे 'उच्च घनता जाळे निर्धारित केले आहे. त्या मोहीमेचा एक भाग म्हणून,  अति महत्त्वाचे 3 प्रकल्प खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत:

I.गोरखपूर  छावणी -वाल्मिकीनगर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण :    

पश्चिम भारतातून ईशान्येकडील राज्यांमध्ये मालवाहतूक  विशेषतः अन्नधान्याची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी गोरखपूर छावणी  – वाल्मिकीनगर (95 किमी.) हा महत्त्वाचा पट्टा आहे. मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाच्या असलेल्या या मार्गावर  रेल्वे मार्गिका आहे. वाल्मिकीनगरपासून मुझफ्फरपूरपर्यंत दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. 1120 कोटी रुपये खर्चाच्या या प्रस्तावित दुहेरीकरण  प्रकल्पामुळे लॉजिस्टिक कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा होणे अपेक्षित आहे.

II.कटिहार - मुकुरिया आणि कटिहार - कुमेदपूर रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण

कटिहार - मुकुरिया आणि कटिहार - कुमेदपूर हे जास्त वर्दळ असलेले विभाग आहेत.सध्या हा एकेरी मार्ग असून  हा राजधानी रेल्वेगाडीचा  मार्ग आहे.ईशान्य आणि हावडा यांना जोडण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग  आहे. या विभागांच्या दुहेरीकरणामुळे  कोलकाता बंदर ते विराट नगरपर्यंत मालवाहतुकीसाठी मोठी मदत होणार आहे.  या प्रकल्पाचा खर्च  942 कोटी रुपये आहे.

III.पाचोरा - जामनेर रेल्वेमार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत विस्तार

हा प्रकल्प महाराष्ट्र राज्यात आहे. या अंतर्गत पाचोरा ते जामनेर मार्गाचे गेज परिवर्तन आणि बोदवडपर्यंत या  रेल्वे मार्गाचा विस्तार करण्यात येणार आहे.  84 किमीच्या या प्रकल्पासाठी 955 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे जळगाव आणि भुसावळला  बाह्य  दुहेरी मार्ग  रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या रेल्वेमार्गामुळे  जेएनपीटी ते नागपूर आणि देशाच्या पूर्वेकडील प्रदेशात जलद गतीने  मालवाहतूक करण्यास मदत मिळणार आहे.

 

S.Patil/S.Chavan/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 

 



(Release ID: 1848364) Visitor Counter : 288