अर्थ मंत्रालय

प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांची मुंबईसह गुजरात आणि इतर ठिकाणी शोधमोहीम

Posted On: 02 AUG 2022 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 2 ऑगस्‍ट 2022

 

प्राप्तिकर विभागाने 20 जुलै 2022 रोजी गुजरातमधील काही नामवंत बड्या उद्योग कंपन्यांच्या कार्यालयांवर छापे घातले आहेत. यात, वस्त्रोद्योग, रसायने, पॅकेजिंग, बांधकाम व्यवसाय आणि शिक्षण अशा क्षेत्राशी संबंधित व्यावसायिकांचा समावेश आहे. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी खेडा, अहमदाबाद, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता इथल्या 58 जागी ही कारवाई झाली आहे.

या शोधमोहीमेत, अधिकाऱ्यांना अनेक कागदपत्रे आणि डिजिटल डेटा पुरावा म्हणून सापडले असून ही सर्व सामग्री जप्त करण्यात आली आहे. या पुराव्यावरुन असे निष्पन्न झाले आहे, की, या सगळ्या व्यावसायिकांनी विविध मार्गांनी करचुकवेगिरी केली आहे. यात, खातेवहीच्या पलीकडे बेहिशेबी रोख रकमेचे व्यवहार, बनावट खरेदी व्यवहार, आणि बांधकाम व्यावसायातील खोट्या पावत्या अशा गैरव्यवहारांचे पुरावे सापडले आहेत. या सगळ्या व्यावसायिकांनी कोलकात्यातील काही बनावट कंपन्यांच्या आधारे हवालाचे व्यवहार केल्याचेही या तपासात आढळले आहे. रोख आणि ‘सराफी’म्हणजे असुरक्षित मार्गाने काही उत्पन्न मिळवल्याचेही निष्पन्न झाले आहे.  

त्याशिवाय,यातील शेअर बाजारात नोंदणीकृत असलेल्या कंपन्यांनी ऑपरेटर्सच्या मदतीने कंपनीच्या समभागांच्या किमती बनावट पद्धतीने जास्त दाखवून त्यातही नफेखोरी केली आहे. त्याशिवाय प्रवर्तकांच्या वैयक्तिक उपयोगासाठी, खोटी नावे दाखवून काही पैशांची अफरातफर केली आहे. त्याशिवाय या पुराव्यामधून असेही दिसले आहे, की या व्यावसायिकांनी पब्लिक लिमिटेड कंपनीचया खातेवह्यातही गडबड केली आहे.

या शोधमोहिमेत, अधिकाऱ्यांना  1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या बेहिशेबी व्यवहारांचा शोध लागला आहे. आतापर्यंत, 24 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम आणि 20 कोटी रुपयांचे बेहिशेबी दागिने, सोने जप्त करण्यात आले आहे.

पुढचा तपास जारी आहे.  


* * *

S.Patil/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1847475) Visitor Counter : 127