युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारोत्तोलनात मीराबाई चानूनंतर जेरेमीने जिंकले भारतासाठी दुसरे सुवर्णपदक
Posted On:
31 JUL 2022 5:36PM by PIB Mumbai
मिझोरामच्या 19 वर्षीय जेरेमी लालरिनुंगा याने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलनात 67 किलो गटात सुवर्णपदक पटकावत भारताला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. जेरेमीने एकूण 300 किलोग्रॅम (स्नॅचमध्ये 140 किलोग्रॅम आणि क्लीन अँड जर्कमध्ये 160 किलोग्रॅम) वजन उचलले, जो राष्ट्रकुल खेळातील विक्रम आहे. स्पर्धेतील भारताचे हे एकूण पाचवे पदक आणि दुसरे सुवर्णपदक आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील भारतीयांनी या कामगिरीबद्दल जेरेमीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.
याआधी, मीराबाई चानूने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या 49 किलोग्रॅम भारोत्तोलन स्पर्धेत एकूण 201 किलोग्रॅम वजन उचलून भारताला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात संकेत सरगरने रौप्यपदक पटकावले. बिंद्याराणी देवीने महिलांच्या 55किलो भारोत्तोलनमध्ये रौप्य पदक जिंकले आणि गुरुराजा पुजारीने पुरुषांच्या 61 किलो वजनी गटात कांस्यपदक मिळवले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जेरेमीला त्याच्या भारोत्तोलनमधील यशासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपतींनी ट्विट केले की “जेरेमी लालरिनुंगा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण जिंकल्याबद्दल अभिनंदन. स्पर्धेदरम्यान दुखापत होऊनही तुमच्या आत्मविश्वासामुळे इतिहास घडवत आपण लाखो लोकांना प्रेरणादायी ठरलात . तुमचे हे यश भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. तुम्हाला अशाच आणखी गौरवमय क्षणांसाठी शुभेच्छा.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेरेमी लालरिनुंगा यांचे त्यांच्या पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल आणि राष्ट्रकुल खेळांमध्ये अभूतपूर्व विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
याआधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्मिंगहॅम येथे 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल भारोत्तोलक मीराबाई चानूचे अभिनंदन केले आहे.
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत 67 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी जेरेमी लालरिनुंगा यांचे अभिनंदन केले आहे. ठाकूर यांनी ट्विट केले की "राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मधील पुरुषांच्या 67 किलोग्रॅम भारोत्तोलनमध्ये जेरेमीचे सुवर्णपदक हे खेलो इंडिया ते टॉप कोअर गटातील खेळाडूच्या प्रगतीचे उत्तम उदाहरण आहे." मंत्री म्हणाले की जेरेमीने विक्रमही मोडला आहे. भारताला त्याचा अभिमान असल्याचे ते म्हणाले.
याआधी ठाकूर यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन केले आणि ट्विट केले, “मीराबाई चानू कडून बहुप्रतीक्षित सुवर्णपदक, महिलांच्या 49 किलो स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण भारोत्तोलनात नवीन विक्रम प्रस्थापित केला. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये तुमच्या अप्रतिम कामगिरीने तुम्ही भारताला पुन्हा एकदा अव्वल स्थानावर आणले आहे. #Cheer4India"
***
N.Chitale/G.Deoda/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1846814)
Visitor Counter : 214