गृह मंत्रालय

पद्म पुरस्कार-2023 साठी नामांकन 15 सप्टेंबर, 2022 पर्यंत खुले राहणार

Posted On: 27 JUL 2022 5:53PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जुलै 2022

 

प्रजासत्ताक दिन, 2023 साठी घोषित करण्यात येणार्‍या पद्म पुरस्कार-2023 साठी ऑनलाईन नामांकन/शिफारशी करण्याची प्रक्रिया 1 मे 2022 रोजी खुली झाली आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकनाची अंतिम तारीख 15 सप्टेंबर, 2022 आहे. पद्म पुरस्कारांसाठी नामांकन/शिफारशी केवळ (https://awards.gov.in) या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाइन माध्यमातून स्वीकारल्या जातील.

पद्म पुरस्कार, म्हणजे, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. 1954 मध्ये स्थापन झालेल्या या पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी केली जाते. हा पुरस्कार असामान्य कामगिरीसाठी दिला जात असून कला,  साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक क्षेत्र, लोक सेवा, व्यापार आणि उद्योग ही आणि यासारखी क्षेत्र/विषयांमध्ये वेगळं आणि असामान्य यश/सेवेसाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो. सर्व व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र असून यामध्ये वंश, व्यवसाय, पद अथवा लिंग असा कुठलाही भेद ठेवला जात नाही. डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींसह सरकारी नोकर पद्म पुरस्कारासाठी पात्र नाहीत.

पद्म पुरस्कारांचे रुपांतर “लोकांचे पद्म” मध्ये करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. त्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या नामांकनासह, नामांकने/शिफारशी कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे. महिला, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती, दिव्यांग व्यक्ती तसेच समाजाची निःस्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींचे कर्तृत्व आणि यश सर्वत्र  ओळखले जावे यासाठी एकत्रित प्रयत्न केले जाऊ शकतील.  

नामांकने/शिफारशींमध्ये वरील पोर्टलवर उपलब्ध नमुन्यात निर्दिष्ट केलेले संबंधित तपशील असावेत, तसंच यामध्ये शिफारस करण्यात आलेल्या व्यक्तीची तिच्या/त्याच्या क्षेत्रात/विषयामधील वेगळी आणि असामान्य यश/सेवा याबाबतचा मजकूर (जास्तीतजास्त 800 शब्द), जोडण्यात यावा.  

याबाबतचे तपशील गृह मंत्रालयाच्या (https://mha.gov.in) या वेबसाईटवर आणि (https://padmaawards.gov.in) या पद्म पुरस्कार पोर्टलवर ‘पुरस्कार आणि पदके’ या शीर्षकाखाली उपलब्ध आहेत. या पुरस्काराशी संबंधित कायदे आणि नियम वेबसाईटवरील  

https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx   या लिंक वर उपलब्ध आहेत.


* * *

N.Chitale/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1845489) Visitor Counter : 366