आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 जुलै 2022 रोजी जीआयएफटी आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राला भेट देणार

Posted On: 25 JUL 2022 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 जुलै 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 जुलै 2022 रोजी जीआयएफटी (गिफ्टसिटी) अर्थात गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी  या भारताच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय वित्तीय  सेवा केंद्राला भेट देणार आहेत.

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, केंद्रीय गृह व्यवहार आणि सहकार मंत्री अमित शाह, केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी आणि डॉ. भागवत किशनराव कराड हे देखील या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान त्यांच्या या भेटीदरम्यान भारतातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राची सर्व आर्थिक उत्पादने, अर्थविषयक सेवा तसेच विविध वित्तीय संस्था यांचा विकास आणि नियमन करणारे एकीकृत नियामक असलेल्या आयएफएससीए अर्थात आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा प्राधिकरणाच्या मुख्यालय इमारतीची कोनशीला रचणार आहेत. आयएफएससीएच्या मुख्यालयाची इमारत एक आयकॉनिक संरचना म्हणून संकल्पित करण्यात आली असून त्या इमारतीच्या रचनेत, जीआयएफटी-आयएफएससीचा एक प्रमुख आंतरराष्ट्रीय आर्थिक केंद्र म्हणून वाढत्या प्रभावाचे प्रतिबिंब पाहायला मिळेल.

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यावेळी जीआयएफटी-आयएफएससी मधील आयआयबीएक्स अर्थात  भारतीय आंतरराष्ट्रीय सोने-चांदी विनिमय बाजार या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सोने-चांदी विनिमय बाजाराची सुरुवातदेखील केली जाणार आहे. आयआयबीएक्समुळे भारतात सोन्याच्या वित्तीयकरणाला चालना देण्यासोबतच, जबाबदार स्रोत  आणि दर्जा यांच्या खात्रीसह परिणामकारक मूल्य निश्चितीची देखील सोय होणार आहे. यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय सोने-चांदी विनिमय  बाजारात योग्य स्थान मिळविण्याची आणि अधिक प्रामाणिकपणे तसेच उत्तम दर्जासह जागतिक मूल्यसाखळीतील ग्राहकांना सेवा देण्याची क्षमता प्राप्त होईल.भारताला जागतिक सोने-चांदी विनिमय बाजारांमध्ये प्रमुख ग्राहक म्हणून स्थान मिळवण्यासाठी देशाला सक्षम करण्याच्या भारत सरकारच्या कटिबद्धतेचादेखील हा पुनरुच्चार आहे.  

या सर्व कार्यक्रमांसह, पंतप्रधान या भेटीदरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या आयएफएससी-एसजीएक्स कनेक्ट उपक्रमाची सुरुवात करणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत, सिंगापूरच्या एसजीएक्स या शेअर बाजाराच्या सदस्यांनी नोंदविलेल्या निफ्टी डेरिव्हेटिव्हजवरच्या  सर्व ऑर्डर्स एनएसई-आयएफएससीकडे वळवून त्याच्या व्यापारी मंचावर जुळविल्या जातील. हा कनेक्ट उपक्रम, जीआयएफटी- आयएफएससीमधील डेरिव्हेटिव्हज बाजारातील रोखता अधिक वाढवणारा  आहे आणि त्यामुळे अधिकाधिक आंतरराष्ट्रीय भागधारक या ठिकाणी आकर्षित होतील आणि त्यातून जीआयएफटी- आयएफएससीमधीलमधील आर्थिक परिसंस्थेवर सकारात्मक प्रभाव पडेल.भारतातील आणि आंतरराष्ट्रीय अधिकारक्षेत्राच्या कक्षेतील आर्थिक व्यवहारांचे दलाल- मध्यस्थ कनेक्टच्या माध्यमातून डेरिव्हेटिव्हज व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीदरम्यान इतर अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात येणार आहेत.

 

* * *

S.Kakade/S.Chitnis/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1844661) Visitor Counter : 144