शिक्षण मंत्रालय
नव्या राष्ट्रीय अभ्यासक्रम रचनेत अनुशीलन समितीविषयीची पुरेशी माहिती समाविष्ट करावी- धर्मेद्र प्रधान
Posted On:
24 JUL 2022 8:40PM by PIB Mumbai
विसाव्या शतकात बंगालमध्ये अनुशीलन समिती ही गोपनीयपणे काम करणारी प्रभावी क्रांतिकारी संघटना होती. ब्रिटिश साम्राज्यवादाची सत्ता उलथवून टाकून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला गती देण्याची मोहीम अनुशीलन समिती या संघटनेने हाती घेतली होती, असे केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी आज सांगितले. धैर्य, त्याग आणि प्रेरणेचे प्रतीक असलेल्या अनुशीलन समितीच्या इमारतीवर प्रधान यांनी तिरंगा फडकवला.
प्रधान पुढे म्हणाले की, सतीशचंद्र प्रमाथा मित्रा, अरबिंदो घोष आणि सरला देवी यांनी स्थापन केलेली अनुशीलन समिती ही बंगालच्या पुण्यभूमीतील अनेक नामवंत संस्थांपैकी एक होती ज्यांनी राष्ट्रवादी लेखन, प्रकाशन आणि स्वदेशीवर जोर देऊन राष्ट्राच्या विवेकाला आकार दिला.
देशबंधू चित्तरंजन दास, सुरेंद्रनाथ टागोर, जतींद्रनाथ बॅनर्जी, बाघा जतीन यांसारखे दिग्गज अनुशीलन समितीशी संबंधित होते. हेडगेवार हेही समितीचे माजी सदस्य होते. विशेषत: अमृतमहोत्सवादरम्यान या महान व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यात मी धन्यता मानतो, असेही ते म्हणाले.
आगामी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यात एनसीइआरटी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसेच शिक्षण विभागाने या समितीविषयीची पुरेशी माहिती समाविष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. अभ्यासक्रमात अनुशीलन समितीच्या इतिहासाविषयीच्या माहितीचा समावेश केला तर पुढच्या पिढ्यांसाठी ते प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
***
S.Patil/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1844465)