युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’स्पर्धेची आता राष्ट्रीय पातळीवरील फेरीकडे वाटचाल


देशभरातील 36 विद्यालयांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी चुरस

मुंबईच्या पी.जी. गरोडिया शाळेचे तनय गौतम शेठ आणि आकाश विश्वनाथ हे विद्यार्थी राष्ट्रीय फेरीत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील

केंद्रीय युवा व्यवहार तसेच क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते मुंबईत ‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’ स्पर्धेतील राज्यस्तरीय विजेत्यांचा सन्मान

Posted On: 22 JUL 2022 4:30PM by PIB Mumbai

मुंबई, 22 जुलै 2022

 

‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’ स्पर्धेच्या राष्ट्रीय पातळीवरील फेरीला सुरुवात झाली आहे. या फेरीतील विजेत्याला मिळणारा सन्मान आणि बक्षिसाची मोठी रोख रक्कम यासाठी देशभरातील 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून राज्य पातळीवरील फेरीत विजयी ठरलेले संघ आता राष्ट्रीय फेरीच्या स्पर्धेत चमक दाखवतील.

‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’ स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये भाग घेण्यासाठी 72 विद्यार्थी स्पर्धक आणि त्यांचे शिक्षक सध्या मुंबईत आहेत. या स्पर्धेच्या राष्ट्रीय फेरीचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स वाहिनी आणि राष्ट्रीय टिव्हीवरून करण्यात येणार असून, या स्पर्धेचा वेब कास्ट केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या आधिपत्याखालील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या समाज माध्यम  वाहिन्यांवरून केले जाईल.

मुंबईच्या पी.जी. गरोडिया (आयसीएसई) शाळेचे तनय गौतम शेठ आणि आकाश विश्वनाथ हे दोन विद्यार्थी महाराष्ट्रातर्फे ‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’ स्पर्धेच्या राष्ट्रीय फेरीत आहेत. (उर्वरित राज्यांतील स्पर्धकांची यादी परिशिष्टात दिली आहे)

‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’ स्पर्धेच्या राष्ट्रीय फेरीमध्ये विजेत्या ठरलेल्या शाळेला 25 लाख रुपयांचे तर त्या शाळेच्या विजेत्या संघातील दोन विद्यार्थ्यांना अडीच लाख रुपयांचे (प्रत्येकी1.25 लाख) पारितोषिक देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय फेरीतील पहिल्या उपविजेत्या शाळेला 15 लाख तर त्या शाळेच्या संघाला दीड लाख रुपये (प्रत्येक विद्यार्थ्याला 75 हजार) देण्यात येणार आहेत. या स्पर्धेतील दुसऱ्या उप-विजेत्या शाळेला 10 लाख रुपये आणि त्या शाळेच्या संघातील दोन विद्यार्थ्यांना 1 लाख रुपये (प्रत्येकी 50 हजार रुपये) देण्यात येणार आहेत.

राष्ट्रीय फेरीमध्ये उप-उपांत्य, उपांत्य आणि अंतिम फेरीच्या स्पर्धा खालीलप्रमाणे होतील:

उप-उपांत्य

  • 3 संघांचा एक गट अशा प्रकारे 36 संघ 12 गटांत विभागले जातील. 3 संघ एकमेकांशी लढतील आणि प्रत्येक गटातील विजेता संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.
  • उरलेल्या 24 संघांतून 4 सर्वोत्तम उपविजेते देखील उपांत्य फेरीत खेळतील.
  • म्हणजे उपांत्य फेरीसाठी 16 संघ पात्र ठरतील

उपांत्य फेरी

उपांत्य उपांत्य फेरीत प्रवेश केलेल्या 16 संघांचे 4 गटांमध्ये विभाजन केले जाईल, प्रत्येक गटात 4 संघ असतील. प्रत्येक गटातून विजेता ठरलेला संघ राष्ट्रीय फेरीच्या अंतिम फेरीत पोहोचेल. या फेरीचे स्टार स्पोर्ट्स वाहिनीवरून थेट प्रसारण होईल.

अंतिम फेरी

अंतिम फिट इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धेतील सर्वोच्च विजेता ठरण्यासाठी 4 संघ स्पर्धा करतील.

राज्यस्तरीय फेऱ्यांतील विजेते

केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते काल संध्याकाळी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात ‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’ स्पर्धेच्या राज्य पातळीवरील फेरीच्या विजेत्यांचा गौरव करण्यात आला. राज्य पातळीवर विजेत्या ठरलेल्या स्पर्धकांना सुमारे 99 लाख रुपयांच्या पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

फेब्रुवारी आणि मार्च 2022 या काळात झालेल्या राज्य स्तरीय फेऱ्यांमध्ये 360 शाळांनी भाग घेतला. राज्यस्तरीय फेऱ्यांमध्ये विजेते ठरलेले 36 संघ (प्रत्येकी 2 विद्यार्थी) आणि त्यांच्या विद्यालय प्रतिनिधींना या कार्यक्रमात रोख रकमेची पारितोषिके देण्यात आली. यामध्ये विजेत्या विद्यालयाला अडीच लाख रुपयांचे तर विजेत्या दोन्ही विद्यार्थ्यांना प्रत्येकी साडेबारा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केंद्रीय मंत्री म्हणाले, शालेय वयाच्या मुलांमध्ये तंदुरुस्ती आणि क्रीडा क्षेत्राबाबत रुची निर्माण करून त्यांच्या जीवनशैलीमध्ये समाविष्ट करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला अनुसरून सप्टेंबर 2021 मध्ये फिट इंडिया प्रश्नमंजुषा स्पर्धा या भारतातील पहिल्यावहिल्या तंदुरुस्ती आणि क्रीडा विषयक शालेय प्रश्नमंजुषेची सुरुवात करण्यात आली. ते म्हणाले, तुमच्यापैकी प्रत्येक जण आता क्रीडा आणि तंदुरुस्ती यांचा दूत झाला आहे. तुम्हांला जे समजले आहे ते फार कमी लोकांना माहित आहे, फिट इंडिया मोबाईल अॅपबद्दलची माहिती सर्वांना सांगण्याची विनंती देखील त्यांनी विद्यार्थ्यांना केली.

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडामंत्री अनुराग ठाकूर मुंबईच्या पी.जी. गरोडिया (आयसीएसई) शाळेचे विद्यार्थी तनय गौतम शेठ आणि आकाश विश्वनाथ त्यांचे क्रीडा विभाग प्रमुख विनोद पाटील या शिक्षकांचा  सन्मान  करताना

‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’स्पर्धेची माहिती

भारताच्या समृद्ध क्रीडाविषयक इतिहासाविषयी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने सुरु केलेल्या या ‘फिट इंडिया प्रश्नमंजुषा’स्पर्धेच्या प्राथमिक फेऱ्यांमध्ये राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या मंचावर ऑनलाईन पद्धतीने साडेतेरा हजार शाळांमधील 36,299 विद्यार्थ्यांनी भाग घेतला.

राज्य स्तरीय फेऱ्यांसाठी यापैकी 360 शाळांची निवड करण्यात आली. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेऱ्यांनंतर राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीसाठी 36 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून विजेते निवडण्यात आले.

अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या स्पर्धकांची संपूर्ण यादी पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1843885) Visitor Counter : 196