संरक्षण मंत्रालय
भारतीय नौदलात स्वदेशी तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देणाऱ्या ‘स्प्रिंट आव्हाने’ याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण
Posted On:
18 JUL 2022 9:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 जुलै 2022
भारतीय नौदलात स्वदेशी तंत्रज्ञानाला चालना देणाऱ्या ‘स्प्रिंट आव्हाने’ या उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत नौदल नवोन्मेष आणि स्वदेशीकरण संस्था- एनआयआयओच्या ‘स्वावलंबन’ या परिसंवादादरम्यान अनावरण झाले. संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी तसेच, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षांचे औचित्य साधत, एनआयआयओ ने संरक्षण नवोन्मेष संघटना- डीआयओ सोबत भारतीय नौदलात 75 नवी स्वदेशी तंत्रज्ञाने/उत्पादने विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या संपूर्ण उपक्रमाला “स्प्रिंट’ – (सपोर्टिंग पोल व्हॉल्टइंग इन रिसर्च अँड डेव्हलपमेंट थ्रू इनोव्हेशन्स फॉर डीफेन्स एक्सलन्स- (iDEX), एनआयआयओ आणि तंत्रज्ञान विकास गती विभाग (TDAC)) असे म्हटले गेले आहे.
21 व्या शतकातील भारताच्या उभारणीसाठी, भारताच्या सैन्यदलांनी आत्मनिर्भर असण्याचे उद्दिष्ट अत्यंत आवश्यक आहे, असे मत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. आत्मनिर्भर नौदलाच्या निर्मितीसाठी पहिला परिसंवाद ‘स्वावलंबन’ आयोजित करणे, हे अत्यंत महत्वाचे पाऊल आहे, असेही त्यांनी म्हटले.नव्या भारताच्या उभारणीसाठी, या काळात, 75 देशी बनवटीची तंत्रज्ञाने विकसित करण्याचा संकल्प अतिशय प्रेरक आहे, असे सांगत हा संकल्प लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. असे असले तरीही, हे या क्षेत्रातले आपले पहिलेच पाऊल ठरेल, असेही ते म्हणाले. “भारतीय तंत्रज्ञानांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला सातत्याने काम करत राहणे, अत्यंत आवश्यक आहे. भारत जेव्हा आपल्या स्वातंत्र्याची 100 वर्षे करेल, त्यावेळी,आपले नौदल एका अभूतपूर्व उंचीवर पोहोचले असेल, असे आपले उद्दिष्ट असायला हवे” असे पंतप्रधान पुढे म्हणाले.
आत्मनिर्भरतेसाठी, नवोन्मेष आणि स्वदेशीकरण हे महत्त्वाचे घटक असून, सशस्त्र सैन्यदले, उद्योग, संशोधन आणि विकास आस्थापना तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये मजबूत आणि दीर्घकालीन सहकार्यासाठी हे घटक केंद्रस्थानी ठेवले जावेत, असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. संरक्षण क्षेत्रात ‘आत्मनिर्भर’ होण्यासाठी तसेच राष्ट्राची सुरक्षा आणि सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी हे सहकार्य आवश्यक आहे, असेही ते पुढे म्हणाले.
ज्यावेळी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे, अशावेळी आपल्या स्वातंत्र्याच्या व्याख्येत आत्मनिर्भरतेचा नवा पैलू जोडला गेला आहे, असे राजनाथ सिंह यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842517)
Visitor Counter : 241