संसदीय कामकाज मंत्रालय
राजकीय पक्षांच्या संसदेतल्या सभागृह नेत्यांसोबत सरकारने घेतली बैठक
संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सहकार्य करण्याचे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्र्यांचे सर्व राजकीय पक्षांना आवाहन
Posted On:
17 JUL 2022 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जुलै 2022
संसदेचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने आज सर्व राजकीय पक्षांच्या सभागृह नेत्यांसोबत बैठक आयोजित केली होती. संसदेचे पावसाळी अधिवेशन सोमवार, 18 जुलै, 2022 रोजी सुरू होणार असून कामकाजाच्या आवश्यकतेनुरूप शुक्रवार, 12 ऑगस्ट, 2022 पर्यंत ते चालणार असल्याचे केंद्रीय संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या बैठकीला सुरुवात करताना सांगितले. अधिवेशनात 26 दिवसांच्या कालावधीत एकूण 18 बैठका होतील. या अधिवेशनासाठी साधारण 32 विधेयके निश्चित करण्यात आली असून त्यापैकी 14 विधेयकांना आधीच अंतिम निश्चिती देण्यात आली आहे.
संबंधित पीठासीन अधिकाऱ्यांनी कार्यपद्धतीच्या नियमांतर्गत परवानगी दिलेल्या कोणत्याही मुद्द्यावर सभागृहात चर्चा करण्यास सरकार नेहमीच तयार असल्याचे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्र्यांनी सांगितले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सक्रिय सहकार्य आणि पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या बैठकीला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री व राज्यसभेचे सभागृह नेते पीयूष गोयल, संसदीय कार्य आणि सांस्कृतिक मंत्रालयाचे राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि संसदीय कामकाज आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन हेदेखील उपस्थित होते.
उपस्थित असलेल्या सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उपस्थित केलेले मुद्दे ऐकून घेतल्यानंतर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीत सक्रिय आणि प्रभावी सहभाग घेतल्याबद्दल सर्व नेत्यांचे आभार मानले. चर्चा अतिशय फलदायी झाली आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले गेले याची प्रशंसा त्यांनी केली. संसदेत नेहमीच्या संसदीय कामकाजाव्यतिरिक्त तातडीच्या जनहिताच्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी सरकारकडून आवश्यक ते प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाव्यतिरिक्त काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपाइं, सीपीआय, माकपा, सपा, बसपा, संयुक्त जनता दल, आप, राजद, तृणमूल काँग्रेस, द्रमुक,अण्णा द्रमुक असे 35 राजकीय पक्ष उपस्थित होते.
राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य विरोधी विधेयक 2021, बहुराज्य सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक 2022, वस्तूंचे भौगोलिक संकेतांक (नोंदणी आणि संरक्षण) (सुधारणा) विधेयक 2022, गोदाम (विकास आणि नियमन) (सुधारणा) विधेयक 2022, स्पर्धा (दुरुस्ती) विधेयक 2022, नादारी आणि दिवाळखोरी संहिता (सुधारणा) विधेयक, 2022, खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) सुधारणा विधेयक 2022, वन संवर्धन सुधारणा विधेयक 2022, कुटुंब न्यायालये (सुधारणा) विधेयक 2022, अशी एकूण 32 विधेयके पावसाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता आहे.
* * *
N.Chitale/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1842227)
Visitor Counter : 208