माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दूरदर्शनने आपल्या आगामी मेगा शो 'स्वराज' चा प्रोमो केला प्रकाशित
Posted On:
15 JUL 2022 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2022
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली देश 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करत आहे. याच महोत्सवात दूरदर्शन देखील "नये भारत का नया दूरदर्शन" या संकल्पनेनुसार आपल्या प्रसारण सेवेत मोठ्या सुधारणा करत आहे. दूरदर्शनने अनेक नवीन उच्च दर्जाच्या मालिका सुरू करून भारताची सार्वजनिक प्रसारण सेवा म्हणून आपले कर्तव्य पूर्ण केले आहे.
दूरदर्शन "स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा" नावाचा एक मेगा ऐतिहासिक शो प्रसारित करणार आहे. याचे पहिले पाऊल म्हणून, केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसेच युवा व्यवहार आणि क्रीडा विभाग मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते आज नवी दिल्ली येथील आकाशवाणी भवनात आयोजित कार्यक्रमात या शोचा प्रोमो प्रकाशित करण्यात आला.
ऐतिहासिक माहितीपर नाट्य मालिका, ‘स्वराज- भारत के स्वतंत्रता संग्राम की समग्र गाथा’ हा 15 व्या शतकापासून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या गौरवशाली इतिहासाचे वर्णन करणारा 75 भागांचा मेगा शो आहे. ही मालिका भारतीय इतिहासातील अनेक पैलू जिवंत करेल तसेच कमी ज्ञात असलेल्या लोकनायकांचे जीवन आणि बलिदान याबाबत माहिती देईल. लोकप्रिय चित्रपट अभिनेते, मनोज जोशी यांनी या मालिकेत निवेदक (सूत्रधार) म्हणून उत्कृष्ट भूमिका साकारली आहे. या मालिकेची निर्मिती दर्जेदार आहे आणि ती प्रेक्षकांसाठी नेत्रसुखद ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
स्वराज हा शो 14 ऑगस्ट 2022 रोजी दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवर हिंदीतून आणि त्यानंतर प्रादेशिक वाहिन्यांवरुन प्रादेशिक भाषांमध्ये प्रसारित करण्यात येणार आहे. या शोची ध्वनी आवृत्ती ऑल इंडिया रेडिओ वरुनही प्रसारित केली जाणार आहे.
प्रोमो लॉन्च प्रसंगी बोलताना, केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर म्हणाले, “हा प्रोमो केवळ स्वातंत्र्य लढ्याच्या काळात ज्याची कल्पना केली गेली होती त्याचीच झलक नाही तर नव भारताची नवी दूरदर्शन वाहिनी कशी असेल याचीही झलक आहे. चित्रहार ते समाचारपर्यंत दूरदर्शनच्या कार्यक्रमांना विशेष दर्जा असायचा. येत्या काही वर्षांत त्यात आणखी वाढ होईल याची आम्हाला खात्री आहे असेही मंत्री म्हणाले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव, अपूर्व चंद्रा, या कार्यक्रमाला उपस्थित होते. याप्रसंगी ते म्हणाले, "आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने, या मालिकेद्वारे तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात बलिदान आणि योगदान देणाऱ्या स्वातंत्र्य सेनानींची माहिती मिळेल, ही आनंदाची बाब आहे.
प्रसार भारती आणि दूरदर्शनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मयंक कुमार अग्रवाल, प्रसार भारतीच्या अर्थ विभागाचे सदस्य डी. पी. एस. नेगी, ऑल इंडिया रेडिओचे महासंचालक एन. व्ही. रेड्डी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत प्रोमो लाँच करण्यात आला. स्वराज हा शो त्याच्या उच्च तंत्रज्ञान उत्पादन गुणवत्तेसह आणि प्रेरणादायी कथेमुळे निश्चितपणे प्रत्येक भारतीयाचे हृदय अभिमानाने भरून टाकेल!
स्वराजचा प्रोमो पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
R.Aghor/S.Mukhedkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841918)
Visitor Counter : 214