आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
'आयुष्मान भारत डिजिटल अभियान(एबीडीएम) हॅकॅथॉन मालिका' अंतर्गत महाराष्ट्रात पुणे येथे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाकडून पहिल्या हॅकॅथॉनचा प्रारंभ
एबीडीएम हॅकॅथॉन फेरी 1- युनिफाइड हेल्थ इंटरफेस (युएचआय) प्रारंभ या हायब्रीड स्वरूपातील कार्यक्रमाचे 14 ते 17 जुलै 2022 दरम्यान आयोजन
Posted On:
15 JUL 2022 4:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 जुलै 2022
आयुष्मान भारत डिजिटल अभियान हॅकॅथॉन मालिकेअंतर्गत, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने महाराष्ट्रात पुणे येथे स्मार्ट सिटी ऑपरेशन सेंटरमध्ये 14 ते 17 जुलै 2022 या कालावधीत हायब्रीड स्वरूपात पहिल्या हॅकॅथॉनचे आयोजन केले आहे.पुणे महानगरपालिका (पीएमसी ) आणि पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळ मर्यादित (पीएससीडीसीएल) यांच्या सहकार्याने आयुष्मान भारत डिजिटल अभियान (एबीडीएम)अंतर्गत हॅकॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. सहकार्य आणि नाविन्यपूर्ण उपाय तयार करण्याच्या दृष्टीने, नवोन्मेषक,विकासक आणि डेटा तज्ञांचा समावेश असलेले विविध चमू प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने यात सहभागी झाले आहेत.
या हॅकॅथॉनचे उद्घाटन राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाचे सचिव सौरभ विजय, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, (आरोग्य सेवा) आयुक्त आणि अभियान संचालक डॉ. एन. रामास्वामी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे संचालक किरण गोपाल वास्का, पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळ मर्यादित चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, सी-डॅक पुणे चे सहयोगी संचालक डॉ गौर सुंदर, पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे आणि पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार उद्घाटनप्रसंगी उपस्थित होते.
“युपीआयने बाजारात बजावलेल्या भूमिकेप्रमाणेच, युनिफाइड हेल्थ इंटरफेस आरोग्य क्षेत्रात सक्षम प्लॅटफॉर्म म्हणून काम करेल आणि त्यायोगे लोकांना एकाच ठिकाणी विविध आरोग्य उपलब्ध होतील, असे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा यांनी उदघाटन प्रसंगी बोलताना सांगितले. आरोग्य सेवा प्रदात्यांमध्ये माहितीची परस्पर देवाणघेवाण (इंटरऑपरेबिलिटी) आणि आरोग्य सेवा डेटाची देवाणघेवाण सुलभ करण्यासाठी हा एक अनोखा प्रयत्न आहे यामुळे अखेरीस सर्वांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा सुलभतेने उपलब्ध होऊ शकते आणि ही सेवा किफायतशीरही असेल.”, असे ते म्हणाले.
आम्ही आयोजित करत असलेल्या उपक्रमांपैकी हॅकॅथॉनच्या मालिकेतील ही पहिली हॅकॅथॉन आहे. हा उपक्रम देशातील तरुण प्रतिभांना आपल्या डिजिटल आरोग्य सेवा उभी करण्याच्या क्षेत्रात योगदान देण्यासाठी तसेच देश आणि जगासाठी अभिनव उपक्रम राबावण्यास प्रोत्साहित करेल'',असे हॅकॅथॉनबद्दल आणखी बोलताना डॉ. शर्मा यांनी सांगितले.
युनिफाइड हेल्थ इंटरफेस (युएचआय) व्यतिरिक्त,या हॅकॅथॉनमध्ये नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी ,व्यक्ती आणि संस्थांना एकत्र आणून भारतातील आरोग्य स्टार्ट-अप कार्यक्षेत्र विकसित करण्यावरही भर देण्यात आला आहे. 'फेरी-1 - युएचआय प्रारंभ' यासाठी बक्षीस सुमारे 60,00,000 रुपये असेल. या अंतर्गत समस्यांवर शोधण्यात आलेल्या उपाययोजनांचे मूल्यांकन स्वतंत्र परीक्षकांद्वारे केले जाईल. दोन प्रमुख संकल्पनांवर प्रत्येक चॅलेंज ट्रॅकवर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल:
नवोन्मेष ट्रॅक: दूरध्वनीद्वारे वैद्यकीय सल्ला , रुग्णवाहिका नोंदणी , लॅब चाचण्या, प्रत्यक्ष वैद्यकीय सल्ला नोंदणी , प्रयोगशाळा चाचण्या नोंदणी यांसारख्या रुग्णांना लागणाऱ्या विविध वापराच्या सेवांसाठी खुल्या नेटवर्कमध्ये डिजिटल आरोग्य क्षेत्राला सक्षम करण्यासाठी नाविन्यपूर्ण उपायांसाठी आव्हान.
एकात्मीकरण ट्रॅक: युएचआयशी सुसंगत असलेल्या अनुप्रयोगांच्या विकासाला गती देण्यासाठी आणि युएचआय नेटवर्कवर डिजिटल आरोग्य व्यवहार आणण्यासाठी तसेच या प्रयोगांना इतर अशा सहभागींच्या प्रयोगांसह एकत्रित करण्याचे आव्हान
एबीडीएम हॅकॅथॉनचे अधिक तपशील येथे उपलब्ध आहेत: https://abdm.gov.in/register
युनिफाइड हेल्थ इंटरफेस (युएचआय ) संदर्भात अधिक माहिती येथे उपलब्ध आहे: https://uhi.abdm.gov.in/
R.Aghor/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841765)
Visitor Counter : 211