उपराष्ट्रपती कार्यालय
आनुवंशिक रोगांमुळे देशातील आरोग्यव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
भारताच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा क्षेत्रातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी तरुण डॉक्टरांसाठी ग्रामीण भागात वैद्यकीय सेवा देणे अनिवार्य करावे अशी उपराष्ट्रपतींची सूचना
Posted On:
14 JUL 2022 1:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जुलै 2022
उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी आज आपल्या देशात आढळणाऱ्या थॅलेसेमिया तसेच सिकल सेल अॅनिमिया सारख्या जनुकीय आजाराच्या रुग्णांचा आरोग्यव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना असणारे महत्त्व ठळकपणे विषद केले. आनुवांशिक आजारांचा सुरुवातीच्या टप्प्यातचा शोध आणि अशा रुग्णांचे व्यवस्थापन केले जावे यासाठी लहान मुलांची सामुदायिक चाचणी हाती घ्यायला हवे अशी सूचना त्यांनी राज्य सरकारांना केली.
हैदराबाद येथील टीएससीएस अर्थात थॅलेसेमिया आणि सिकल सेल संस्थेतील संशोधन प्रयोगशाळा, आधुनिक निदानविषयक प्रयोगशाळा आणि दुसऱ्या रक्त संक्रमण केंद्राचे उद्घाटन केल्यानंतर आज उपस्थितांना संबोधित करताना उपराष्ट्रपती नायडू यांनी आनुवांशिक आजारांच्या संदर्भात सरकारने सुरु केलेल्या प्रयत्नांना पूरक ठरतील असे उपक्रम हाती घेण्याचे आवाहन खाजगी क्षेत्र आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना केले. या अनुवांशिक आजारांवरील उपचारांसाठी बोन मॅरो अर्थात अस्थिमगज प्रत्यारोपण आणि नियमित रक्त संक्रमण हे सध्या उपलब्ध असणारे पर्याय अत्यंत खर्चिक तसेच बालरुग्णांसाठी त्रासदायक ठरणारे आहेत ही बाब नमूद करून नायडू म्हणाले की थॅलेसेमिया आणि सिकल सेल ॲनिमिया या रोगांनी निर्माण केलेल्या आरोग्यविषयक आव्हानाला तोंड देण्यासाठी सर्वसमावेशक दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज आहे.
भारतात दर वर्षी सुमारे 10 ते 15 हजार बालके जन्मतःच थॅलेसेमियाने बाधित असतात याचा उल्लेख करत उपराष्ट्रपती म्हणाले की या अनुवांशिक आजारांच्या बाबतीत सर्वसामान्यांमध्ये असलेला जागरूकतेचा अभाव हा या रोगांचा प्रतिबंध आणि लवकर निदान होण्यातील मुख्य अडथळा आहे. म्हणून या क्षेत्रातील डॉक्टर्स, शिक्षक, सार्वजनिक जीवनातील आघाडीची व्यक्तिमत्त्वे, समुदायांचे नेते आणि समाज माध्यमे यांना थॅलेसेमिया आणि सिकल सेल रोगाबाबत जाणीव जागृतीचा प्रसार करण्याचे आवाहन उपराष्ट्रपतींनी यावेळी केले. या अनुवांशिक आजारांनी ग्रस्त रुग्णांना मोफत उपचार पुरवत असल्याबद्दल त्यांनी टीएससीएस संस्थेची प्रशंसा केली. सर्वांना आरोग्य सुविधा सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून खासगी क्षेत्रातील संस्थांनी देशातील दुसऱ्या आणि तिसऱ्या दर्जाची शहरे आणि ग्रामीण भागात अधिक प्रमाणात निदान आणि उपचार सुविधा उभाराव्यात अशी अपेक्षा उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली.
थॅलेसेमियाग्रस्त मुलांना आयुष्यभर नियमितपणे रक्तसंक्रमण करण्याची गरज असते याकडे उपस्थितांचे लक्ष वेधून नायडू यांनी देशातील तरुणांना स्वखुशीने पुढे येऊन गरजूंसाठी रक्तदान करण्याचा आग्रह केला.
आरोग्यसेवा क्षेत्रात दिसून येणाऱ्या प्रशिक्षित मनुष्यबळाच्या टंचाईबाबत युध्दपातळीवर उपाययोजना करण्याच्या गरजेवर भर देत उपराष्ट्रपती नायडू यांनी देशातील तरुण डॉक्टरांना पदवीपश्चात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेण्यापूर्वी ग्रामीण भागात काही काळ सेवा देणे अनिवार्य करावे अशी सूचना केली. “ग्रामीण भागांमध्ये डिजिटल साधनांच्या मदतीने ई-आरोग्यसेवा उपक्रम राबविणे ही देखील सर्वांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठीची किफायतशीर पद्धत आहे,” ते पुढे म्हणाले.
S.Patil/S.Chitnis /P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1841487)
Visitor Counter : 169