कंपनी व्यवहार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

आयबीबीआयच्या वतीने भारतीय कंपनी कायदा सेवा प्रशिक्षणार्थ्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Posted On: 14 JUL 2022 4:00PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 14 जुलै 2022

 

इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्टसी बोर्ड ऑफ इंडिया (आयबीबीआय) अर्थात भारतीय दिवाळखोरी आणि नादारी मंडळाने 11 जुलै ते 13 जुलै  2022  दरम्यान भारतीय कंपनी कायदा सेवा (आयसीएलएस) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांकरता (2020 ची तुकडी) तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला होता. आयबीबीआयचे पूर्ण वेळ सदस्य सुधाकर शुक्ला यांनी या प्रशिक्षणाचे उद्घाटन केले आणि यावेळी आयबीबीआयचे दुसरे पूर्ण वेळ सदस्य जयंती प्रसाद हे उपस्थित होते.

या प्रशिक्षण सत्रात 2016 च्या भारतीय दिवाळखोरी संहितेचे मूल्यमापन करण्यात आले आणि दिवाळखोरी संहितेविषयक सेवांच्या व्यावसायिकीकरणाचा व्यापक आढावा आणि नियामकाची भूमिका याचा त्यात समावेश केला होता. त्यात अनेक संकल्पनांचा समावेश असून त्यास संहितेंतर्गत विविध प्रक्रियांशी संबंधित प्रत्यक्ष प्रकरणांचा अभ्यास जसे की कंपनी दिवाळखोरी निराकरण प्रक्रिया, अवसायन प्रक्रिया, स्वयंस्फूर्त अवसायन, जलदगती निवारण प्रक्रिया, वैयक्तिक दिवाळखोरी आणि वैयक्तिक नादारी याबाबत मार्गदर्शनाची जोड देण्यात आली होती. मंडळाच्या तक्रार निवारण आणि शिस्तभंग कारवाईच्या यंत्रणेबाबत प्रशिक्षणार्थींना स्पष्ट करून सांगण्यात आले.

त्यापुढे, सहभागी प्रशिक्षणार्थांना आयबीसी परिसंस्थेचे विविध घटक जसे की निर्णय घेणारा प्राधिकारी, दिवाळखोरीच्या संदर्भात कंपन्यांना मदत करणारे व्यावसायिक, दिवाळखोरी संदर्भात मार्गदर्शन करणाऱ्या  व्यावसायिक संस्था, माहिती उपयोगिता संस्था ज्या दिवाळखोर कंपनीची माहिती जमा करून दिवाळखोरी प्रक्रिया कालबद्ध मुदतीत सोडवण्यासाठी मदत करतात, आर्थिक कर्जदार, कार्यचालन करणारे कर्जदार, नोंदणीकृत मूल्यांकन करणारे आणि वित्तीय सेवा पुरवठादार यांच्याबाबत माहिती करून देण्यात आली. याच प्रशिक्षणात नियमनांचा मसुदा तयार करणे आणि त्यांची तपासणी प्रक्रिया, उदयोन्मुख न्यायतत्वशास्त्र, बुडित मालमत्ता तसेच करमाफी देण्यात आलेल्या मालमत्ता यांच्या बाजारपेठेचा दिवाळखोरीवर होणारा परिणाम  आणि दिवाळखोरी संहितेचा सामाजिक- आर्थिक परिणाम यांचाही समावेश करण्यात आला होता. दिवाळखोरीच्या संदर्भात आघाडीची क्षेत्रे म्हणजे ग्रुप इन्सॉल्व्हन्सी, क्रॉस बॉर्डर इन्सॉल्व्हन्सी आणि वैयक्तिक दिवाळखोरी याबाबतही या सत्रात प्रशिक्षण देण्यात आले. आयबीबीआयचे पूर्ण वेळ सदस्य सुधाकर शुक्ला यांच्या समारोपाच्या भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 

 

 

 

S.Patil/U.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1841472) Visitor Counter : 202