संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

संरक्षण मंत्र्यांनी नवी दिल्लीत ‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील पहिल्या परिसंवाद आणि प्रदर्शनादरम्यान 75 कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादने/तंत्रज्ञानाचे उद्‌घाटन केले, मानवतेच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता’ हे एक क्रांतिकारी पाऊल असल्याचे नमूद केले


तंत्रज्ञानाच्या साथीने मार्गक्रमण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बिग डेटा सारख्या तंत्रज्ञानाचा योग्य वेळी समावेश करणे ही काळाची गरज आहे: संरक्षण मंत्री

“वर्चस्व गाजवण्याची भारताची इच्छा नाही; भविष्यातल्या संभाव्य धोक्यांपासून राष्ट्राचे संरक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता क्षमता विकसित करत आहोत ”

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केवळ मानवतेच्या विकासासाठी आणि शांततेसाठी केला पाहिजे- राजनाथ सिंह

Posted On: 11 JUL 2022 5:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 जुलै 2022

 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 11 जुलै 2022 रोजी नवी दिल्ली येथे संरक्षण मंत्रालयद्वारा आयोजित ‘संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावरील पहिल्या परिसंवाद आणि प्रदर्शनादरम्यान 75 कृत्रिम बुद्धिमत्ता उत्पादने/तंत्रज्ञानाचे उद्‌घाटन केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा  भाग म्हणून आज उद्‌घाटन करण्यात आलेली उत्पादने विविध क्षेत्राअंतर्गत येतात. यामध्ये एआय प्लॅटफॉर्म ऑटोमेशन, स्वयंचलित /मानवरहित/रोबोटिक्स प्रणाली; ब्लॉक चेन-आधारित ऑटोमेशन; कमांड, कंट्रोल, कम्युनिकेशन, कॉम्प्युटर आणि इंटेलिजन्स,देखरेख आणि टेहळणी ; सायबर सुरक्षा; मानवी वर्तणूक विश्लेषण; इंटेलिजेंट मॉनिटरिंग सिस्टम; प्राणघातक स्वायत्त शस्त्र प्रणाली; लॉजिस्टिक आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन , ऑपरेशनल डेटा अॅनालिटिक्स; निर्मिती आणि देखभाल; सिम्युलेटर/चाचणी उपकरणे आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वापरून भाषण/आवाजाचे विश्लेषण यांचा यात समावेश आहे. संरक्षण क्षेत्राच्या सार्वजनिक उपक्रमांनी तीन एआय उत्पादने  विकसित केली असून त्यात  दुहेरी वापराचे ऍप्लिकेशन आणि उत्तम बाजारपेठ क्षमता आहे, यात  भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडने विकसित केलेले एआय -सक्षम व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन/ऍनालिसिस  सॉफ्टवेअर; भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडने विकसित केलेली ड्रायव्हर फटिग  मॉनिटरिंग सिस्टीम आणि गार्डन रीच शिपबिल्डर्स आणि इंजिनिअर्सने विकसित केलेल्या नॉन-डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंगच्या एक्स-रेमध्ये वेल्डिंग दोषांचे एआय-सक्षम मूल्यांकन या कार्यक्रमादरम्यान प्रदर्शित करण्यात आले. या उत्पादनांमुळे संरक्षण क्षेत्राच्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये   व्यवसायाच्या नवीन संधी खुल्या  होतील अशी अपेक्षा आहे.

सेवादले , संरक्षण संशोधन आणि विकास संस्था , संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम, आयडेक्स स्टार्ट-अप्स आणि खाजगी उद्योगांनी गेल्या चार वर्षांत कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात केलेले  सामूहिक प्रयत्न दर्शवणाऱ्या या 75 उत्पादनांची सविस्तर माहिती असलेल्या पुस्तकाची  आवृत्ती तसेच ई-आवृत्ती संरक्षण मंत्र्यांनी प्रकाशित केली .  या प्रयत्नांची प्रशंसा करताना राजनाथ सिंह म्हणाले की  कृत्रिम बुद्धिमत्ता हे मानवतेच्या विकासातील एक क्रांतिकारी पाऊल आहे; मानव हा जगातील सर्वात विकसित प्राणी असल्याचा पुरावा असल्याचे नमूद केले. मानवाने केवळ ज्ञानाची निर्मिती/पुनर्निर्मिती केली नाही तर ज्ञान निर्माण करणारी बुद्धी विकसित करत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेने आज जवळपास प्रत्येक क्षेत्रात शिरकाव केला आहे, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी नमूद केले  आहे. यात संरक्षण, आरोग्य आणि वैद्यकशास्त्र, कृषी, व्यापार आणि वाणिज्य तसेच वाहतूक यांचाही समावेश आहे. मानवी सदसद्विवेकबुद्धी आणि कृत्रिम बुद्धीमत्तेची क्षमता, यांच्यातील समन्वय वाढावा ज्यातून या क्षेत्रात काही आमूलाग्र बदल घडवता येतील, यासाठी संरक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांनी प्रयत्न करायला हवेत असेही ते म्हणाले. जेव्हा युद्धात संपूर्ण मानवी सहभाग असायचा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवी स्वचालित शस्त्रे/प्रणाली विकासित करण्यात आली. याद्वारे मानवी नियंत्रणाशिवाय शत्रूची ठिकाणे नष्ट करता येऊ शकतात. कृत्रिम बुद्धिमत्ता चलित सैन्य उपकरणे फार मोठी माहिती प्रभावीपणे हाताळू शकतात. यामुळे सैनिकांच्या प्रशिक्षणात देखील मोठी मदत मिळत आहे. येत्या काळात, एकत्रित आणि वर्च्युअल रियालिटी तंत्रज्ञांचा देखील प्रभावीपणे वापर केला जाईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षण मंत्रालय, सैन्य दले, डीआरडीओ, डीपीएसयु आणि संरक्षण उद्योग, संरक्षणक्षेत्राच्या समस्यांवर स्वदेशी आणि नवोन्मेषी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित उपाययोजना शोधत आहेत आणि भविष्यातील तंत्रज्ञान विकसित करत आहेत, याची संरक्षण मंत्र्यांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांच्या समाज कल्याण आणि राष्ट्रीय सुरक्षा यासाठी आणि भारताला ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे जागतिक केंद्र’  बनविण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित आणि कृत्रिम बुद्धिमत्ता चलित प्रणाली विकसित करण्याच्या दृष्टिकोनाचा त्यांनी पुनरुच्चार केला. भारत लवकरच कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आघाडीच्या देशांत असेल, अशी अशा त्यांनी व्यक्त केली.

राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले की शस्त्रे/ प्रणाली विकसत करताना भविष्यातील युद्ध प्रकारात कृत्रिम बुद्धिमत्तेची महत्वाची भूमिका लक्षात घेतली जाते. आम्ही दुरून नियंत्रित केली जाणारी, मानवरहित हवाई वाहने यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरु केला आहे. या दिशेने पुढे जाण्याची गरज आहे, जेणेकरून स्वयंचलित शस्त्र प्रणाली विकसित केली जाऊ शकेल. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि बिग डेटा या सारख्या तंत्रज्ञानाचा संरक्षण क्षेत्रात वेळेत वापर करणे हे अतिशय महत्वाचे आहे. जेणेकरून आपण तांत्रिकदृष्ट्या मागे राहणार नाही आणि आपल्या सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा कमाल उपयोग करून घेऊ शकू,  राजनाथ सिंह म्हणाले.

संरक्षण सेवांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाशी संबंधित उपकरणांचा जलद गतीने वापर वाढवा, यासाठी उद्योगजगताशी अनेक सामंजस्य करार करण्यात आले आहेत, असेही संरक्षणमंत्र्यांनी पुढे सांगितले. संरक्षण क्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी अभिनव कल्पना(iDEX) या उपक्रमाअंतर्गत कृत्रिम बुद्धीमत्तेशी संबंधित अनेक  आव्हानात्मक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. यात रेडियो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम व्यवस्थापन, पाण्याखालील क्षेत्राविषयी जनजागृती, उपग्रह छायाचित्रे विश्लेषण आणि मित्र की शत्रू ही ओळखणारी  व्यवस्था, अशा आव्हानांचा समावेश आहे. उद्योग आणि स्टार्ट अप्स क्षेत्रांनी  नवनवे मार्ग शोधून काढावेत आणि सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम करत, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संपूर्ण आत्मनिर्भरता येईल, हे सुनिश्चित करावे, असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले.

रशिया हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत अत्यंत पुढारलेला देश असून तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सतत प्रगती करत आहे. कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाविषयी बोलताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन म्हणाले होते की, ‘या क्षेत्रात जो देश आघाडी घेईल तो जगावर राज्य करेल.’ भारताचा ‘वसुधैव कुटुंबकम’ म्हणजे संपूर्ण जग हे एक मोठे कुटुंब आहे या उक्तीवर अढळ विश्वास असला आणि जगावर सत्ता गाजवण्याचा कोणताही हेतू नसला तरीही आपण कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता विकसित केल्या पाहिजेत जेणेकरून कोणताही देश आपल्यावर सत्ता गाजविण्याचा विचारदेखील मनात आणू शकणार नाही, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

देशाच्या संरक्षण क्षेत्राला मजबूत करण्यात शिक्षण क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावू शकेल यावर भर देत केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणाले की, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे संशोधन कार्याशी संबंधित मंच, डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण क्षेत्राशी संबंधित सार्वजनिक उपक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अत्याधुनिक संशोधन करण्यासाठी विविध संस्थांना पाठबळ पुरवत आहेत. ते पुढे म्हणाले की, तंत्रज्ञानविषयक विकास निधी प्रकल्प आणि ‘डेअर टू ड्रीम’ स्पर्धांच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात नवी भरारी घेण्यासाठी डीआरडीओ प्रयत्नशील आहे. देशभरात सध्या अनेक संरक्षण-उद्योग-शिक्षण यांच्याशी संबंधित उत्कृष्टता केंद्रांची स्थापना झाली आहे आणि त्यांच्यापैकी अनेक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाला विशेष महत्त्व दिले जात आहे असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

आपल्या देशात वैज्ञानिक तसेच तंत्रज्ञानविषयक प्रशिक्षण घेतलेल्या आणि देशाच्या उभारणीमध्ये योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या नवोन्मेषी विचारांच्या तरुणांचे प्रमाण मुबलक आहे. अशा परिस्थितीत, आपण आगामी काळात आपल्या देशाच्या तसेच जगाच्या तंत्रज्ञानविषयक गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने नक्कीच प्रगती करू शकू. संरक्षण दलांसाठी भविष्यकालीन तंत्रज्ञान विकसित करणे हे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीतील संस्थांचे मुख्य कार्य असले तरी या प्रक्रियेतून निर्माण होणारे अतिरिक्त फायदे सामान्य नागरिकांसाठी देखील उपलब्ध करून दिले जातील, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.  

प्रत्येक देशाने स्वतःचे संरक्षण आणि सुरक्षेची तरतूद करतानाच मानवता आणि जगाचा देखील विचार करण्याची गरज आहे यावर संरक्षण मंत्र्यांनी भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाची नैतिक मूल्ये आणि सुरुवातीच्या टप्प्यात यातून निर्माण होणारे धोके यांचा विचार करण्याची गरज आहे. जेव्हा एखाद्या नव्या तंत्रज्ञानाची सुरुवात केली जाते तेव्हा त्याचा स्वीकार करण्यास समाजाला थोडा वेळ लागतो. या संक्रमण काळात, कधीकधी एखादी आव्हानात्मक स्थिती देखील निर्माण होते. कृत्रिम बुद्धिमत्ता हे मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान असल्यामुळे आपल्याला, आगामी काळात निर्माण होऊ शकणाऱ्या कोणत्याही कायदेशीर, नैतिक, राजकीय तसेच आर्थिक आव्हानांचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. या तंत्रज्ञानाच्या भविष्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने पाहायला पाहिजे पण त्याचबरोबर सर्व बाबतीत सुसज्ज देखील असायला हवे. आपण या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर मानवतेच्या कल्याणासाठी केला पाहिजे. या तंत्रज्ञानाचा वापर लोकशाही पद्धतीनेच होईल या दृष्टीने आपण कार्य केले पाहिजे, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

यावेळी आपल्या स्वागतपर भाषणात, संरक्षण सचिव डॉ. अजय कुमार यांनी संरक्षणात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या गरजेवर भर दिला तसेच सशस्त्र दल अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असल्याची खात्री करण्याच्या दिशेने सर्व प्रयत्न करण्याच्या संरक्षण मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. त्यांनी सांगितले की, संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या धोरणात्मक एकात्मिक वापरासाठी 2018 मध्ये एका कृती दलाची स्थापना करण्यात आली होती, आणि त्या कृती दलाने तीन महिन्यांत आपल्या शिफारसी सादर केल्या होत्या. संरक्षणमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेच्या माध्यमातून या शिफारशी लागू करण्यात आल्याचा उल्लेख त्यांनी केला. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, संरक्षण विभागाचे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि औद्योगिक क्षेत्राने ही 75 उत्पादने विकसित करण्यासाठी तसेच राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची आणि सक्रिय प्रयत्नांची डॉ. अजय कुमार यांनी प्रशंसा केली. आणखी 100 हून अधिक प्रकल्प विकासाच्या विविध स्तरांवर आहेत असे डॉ. अजय कुमार यांनी यावेळी सांगितले.

संरक्षण राज्य मंत्री अजय भट्ट, नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार, लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे, संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि विकास विभागाचे सचिव तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी, हवाई दलाचे व्हाईस एअर मार्शल संदीप सिंग, संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ नागरी आणि लष्करी अधिकारी, परदेशातील राजदूत, संशोधन आणि शैक्षणिक संस्था तसेच उद्योग समूहांचे प्रतिनिधी आणि विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

2025 पर्यंत 35,000 कोटी रुपयांची संरक्षण सामग्री निर्यात करण्याच्या आणि देशांतर्गत उद्योगाला चालना देण्याच्या संरक्षण मंत्रालयाच्या उद्दिष्टानुसार, गेल्या काही वर्षात सर्वाधिक संरक्षण सामग्री निर्यात साध्य केल्याबद्दल, सार्वजनिक क्षेत्रातील भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि खाजगी क्षेत्रातील इंडो-एमआयएम यांना 'रक्षा निर्यात रत्न' पुरस्कार प्रदान करण्यात आले.

भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता पर्यायांवर उज्ज्वल आणि नाविन्यपूर्ण कल्पना मिळविण्यासाठी आयोजित केलेल्या ‘जेननेक्स्ट एआय’ सोल्यूशन्स स्पर्धेतील पहिल्या तीन विद्यार्थ्यांना संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. संरक्षण क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात नवीन कल्पनांना चालना देण्यासाठी, सेवा, शैक्षणिक संस्था, विद्यार्थी, संशोधन संस्था आणि उद्योग यांच्या सक्रिय सहभागाने तीन चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. नवोदितांना त्यांच्या क्षमता, उत्पादने आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याची अनोखी संधी देणारे एक प्रदर्शन देखील आयोजित करण्यात आले होते.

S.Patil /Sushama/Radhika/Sanjana/Shraddha/PM

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1840768) Visitor Counter : 558