युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बर्मिंगहॅम येथील राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भाग घेण्यास निघालेल्या भारतीय संघाच्या निरोप समारंभात केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंग ठाकूर सहभागी


भारतीय राष्ट्रकुल संघ आजवरचा सर्वात मजबूत संघ, आमचे खेळाडू जागतिक मंचावर भारताची मान पुन्हा उंचावतील: अनुराग ठाकूर

Posted On: 07 JUL 2022 8:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 7 जुलै 2022

 

बर्मिंगहॅम येथे होत असलेल्या राष्ट्रकूल स्पर्धेत (2022) सहभाग घेण्यासाठी निघालेल्या भारतीय खेळाडुंच्या संघास केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी आज नवी दिल्ली इथे निरोप दिला. भारतातील ऑलिंपिक  क्रीडांची प्रशासकीय संस्था भारतीय ऑलिंपिक महासंघाने (आयओसी) या समारंभाचे आयोजन केले होते. केंद्रीय गृह व्यवहार आणि एमवायएएस,  (भारत सरकार) राज्यमंत्री निशिथ प्रामाणिक, भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक संदीप प्रधान, आयओएचे प्रभारी अध्यक्ष अनिल खन्ना यांचा यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये समावेश होता.

215 खेळाडुंचा समावेश असलेल्या या विशाल संघाला निरोप देताना टोक्यो येथे झालेल्या 2020 च्या ऑलिंपिक स्पर्धेतील पदक विजेते बजरंग पुनिया, पी आर श्रीजेश, मनप्रीत सिंग आणि लोवलीना बोरगोहेन असे काही प्रसिद्ध खेळाडूही समारंभात उपस्थित होते. ऑलिंपिक पदक विजेते साक्षी मलिक, प्रसिद्ध धावपटु द्युतीचंद आणि हिमा दास, मुष्टीयुद्धातील आशियाई सुवर्णपदक विजेता शिवा थापा आणि मुष्टीयोद्धा अमित पांघल हे ही उपस्थित होते.

प्रमुख अतिथी म्हणून संबोधन करताना, अनुराग ठाकूर म्हणाले की, आमचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आणि अथक परिश्रमांमुळे भारतीय क्रीडा क्षेत्र जागतिक स्तरावर नवीन उंचीला पोहचले आहे. गेल्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धांमध्ये आमची कामगिरी आतापर्यंतची आमची  सर्वोत्कृष्ट आहे आणि अलिकडच्या काळात सर्व क्रीडाप्रकारांमध्ये आम्ही आमच्या अॅथलीट्स च्या खेळात खूप सुधारणा झालेली आम्ही पाहिली आहे. थॉमस चषक स्पर्धेतील ऐतिहासिक विजय हा असा एक प्रसंग होता.

त्यांनी पुढे म्हटले की, आताचा राष्ट्रकूल स्पर्धेसाठीचा हा संघ निश्चितच आतापर्यंतचा आमचा सर्वोत्कृष्ट आणि सर्वात मजबूत संघ आहे आणि त्याने किती पदके मिळवली, याला महत्व न देता, जागतिक मंचावर आमचे सर्व खेळाडु पुन्हा भारताची मान अभिमानाने उंचावतील, असा मला विश्वास आहे. आम्हा सर्वांना त्यांचा अभिमान आहे आणि संपूर्ण देश विजय किंवा पराभवातही त्यांच्या मागे उभा राहील. आम्ही तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो.  राष्ट्रकूल स्पर्धेसाठी निवडलेल्या या संघात पुरुषांइतकीच महिला खेळाडूंनाही संधी देण्यात आली आहे.  कारण 108 पुरूष थलीट तर त्यांच्याबरोबर 107 महिला थलीट आहेत, याचा मला अत्यंत आनंद आहे, असेही ठाकूर यावेळी म्हणाले.

नेमबाजी क्रीडाप्रकार आता 2022 राष्ट्रकूल स्पर्धेचा भाग नाही, मात्र प्रथमच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे आणि देशातील सर्वात लोकप्रिय खेळ असल्याने भारताला त्यांत पदक मिळण्याची आशा असेल. भारतात बॅडमिंटन, मुष्टीयुद्ध, हॉकी या पारंपरिक मजबूत खेळांशिवाय आता भारोत्तोलन आणि कुस्ती यांचे संघही पूर्वीपेक्षा मजबूत स्थितीत आहेत. नेमबाजीचा समावेश नसल्याने, भारताचा होणारा तोटा भरून निघण्याची अपेक्षा आहे.

 

R.Aghor /U.Kulkarni/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1839957) Visitor Counter : 203