पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी गांधीनगर, गुजरात येथे डिजिटल इंडिया सप्ताह 2022 च्या उद्घाटनाप्रसंगी केलेले भाषण

Posted On: 04 JUL 2022 10:13PM by PIB Mumbai

नमस्कार,  गुजरातचे मुख्यमंत्री   भूपेंद्र भाई पटेल जी, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी  अश्विनी वैष्णव जी,   राजीव चंद्रशेखर जी, विविध राज्यांतील सर्व प्रतिनिधी, डिजिटल इंडियाचे सर्व लाभार्थी,  स्टार्ट अप्स आणि उद्योगांशी संबंधित सर्व हितसंबंधीत, तज्ञ, शिक्षणतज्ञ, संशोधक, महोदय आणि महोदया!

आजचा हा कार्यक्रम   21 व्या शतकात अधिकाधिक आधुनिक होत असलेल्या भारताची झलक घेऊन आला आहे.संपूर्ण मानवतेसाठी   तंत्रज्ञानाचा वापर किती क्रांतिकारी आहे याचे उदाहरण भारताने डिजिटल इंडिया मोहिमेच्या रूपात  संपूर्ण जगासमोर ठेवले आहे.

आठ वर्षांपूर्वी सुरू झालेली ही मोहीम बदलत्या काळानुसार विस्तारत आहे, याचा मला आनंद आहे. डिजिटल इंडिया मोहिमेत दरवर्षी नवे आयाम जोडण्यात आले आहेत, नवीन तंत्रज्ञानाचा समावेश झाला आहे. आजच्या कार्यक्रमात सुरू झालेले नवे व्यासपीठ, नवे कार्यक्रम ही शृंखला पुढे नेत आहेत. आताच तुम्ही या छोट्या चित्रफितीमध्ये पाहिले असेल माय स्कीम (myScheme) असो, भाषिणी-भाषादान असो, डिजिटल इंडिया- जेनेसिस असो, चिप्स टू स्टार्टअप प्रोग्राम किंवा इतर सर्व उत्पादने असोत या सर्व गोष्टी जीवन सुलभता  आणि व्यवसाय सुलभतेला बळकटी देणाऱ्या आहेत. विशेषतः भारताच्या स्टार्ट-अप कार्यक्षेत्राला याचा मोठा फायदा होईल.


मित्रांनो,

काळाच्या ओघात जो देश आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाही, काळ त्याला मागे टाकून पुढे सरकतो आणि तो देश तिथेच राहतो.तिसऱ्या औद्योगिक क्रांतीच्या काळात भारताला याचा फटका बसला आहे, पण आज आपण हे अभिमानाने सांगू शकतो  की, भारत चौथी औद्योगिक क्रांती, उद्योग 4.0 घडवत आहे, आज भारत अभिमानाने सांगू शकतो की भारत जगाला दिशा देत आहे. यात गुजरातने एक पथदर्शक  भूमिका बजावली याचा मला दुहेरी आनंद आहे.

काही वेळापूर्वी येथे, डिजिटल प्रशासनाच्या संदर्भात गुजरातचे गेल्या दोन दशकांतील अनुभव दाखवण्यात आले. गुजरात स्टेट डेटा सेंटर (जीएसडीसी), गुजरात स्टेटवाईड एरिया नेटवर्क (जीएसडब्ल्यूएएन), ई-ग्राम केंद्र आणि एटीव्हीटी /जनसेवा केंद्र यासारखे स्तंभ उभारणारे गुजरात हे देशातील पहिले राज्य होते.

 सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले होत तिथे सुरत, बार्डोलीजवळ सुभाषबाबूंच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि त्यावेळी ई विश्वग्राम सुरू करण्यात आले.

2014 नंतर राष्ट्रीय स्तरावर तंत्रज्ञानाला प्रशासनाचा व्यापक भाग बनवण्यात गुजरातच्या अनुभवांनी खूप मदत केली आहे, धन्यवाद गुजरात. हा अनुभव डिजिटल इंडिया मोहिमेचा आधार बनला. आज जेव्हा आपण मागे वळून पाहतो तेव्हा लक्षात येते की या 7-8 वर्षात डिजिटल इंडियाने आपले जीवन किती सुलभ केले आहे. ज्यांचा जन्म 21व्या शतकात झाला, जी आपली तरुण पिढी आहे, ज्यांचा जन्म 21व्या शतकात झाला आहे, त्यांना आज डिजीटल जीवन  खूप छान वाटते  त्यांना फॅशन स्टेटमेंट वाटते.

पण केवळ 8-10 वर्षांपूर्वीची परिस्थिती आठवा,  जन्माचा दाखला घेण्यासाठी रांग, देयके जमा करण्यासाठी रांग, शिधावाटपासाठी रांग, शैक्षणिक प्रवेशासाठी रांग ,निकाल आणि प्रमाणपत्रासाठी रांग, बँकांमध्ये रांग,  भारताने ऑनलाईनच्या माध्यमातून इतक्या सगळ्या रांगांमधून मुक्त केले आहे. आज जन्माच्या दाखल्यापासून ते ज्येष्ठ नागरिकांची ओळख पटवणाऱ्या जीवन प्रमाणपत्रापर्यंत बहुतांश सरकारी सेवा डिजिटल आहेत, अन्यथा ज्येष्ठ नागरिकांना, विशेषत: निवृत्तीवेतनधारकांना तिथे जाऊन मी जिवंत आहे, असे सांगावे लागत असे. जी कामे पूर्ण व्हायला एकेकाळी अनेक दिवस लागायचे त्या आता काही सेकंदात पूर्ण होतात.

मित्रांनो,

आज भारतात डिजिटल प्रशासनासाठी सर्वोत्तम पायाभूत सुविधा आहेत. जन धन-मोबाइल आणि आधार, जेईएम या त्रिशक्तीचा सर्वाधिक फायदा देशातील गरीब आणि मध्यमवर्गाला झाला आहे. यातून मिळालेली  सुविधा  आणि आलेली पारदर्शकता यामुळे देशातील कोट्यवधी कुटुंबांच्या पैशांची बचत होत आहे. 8 वर्षांपूर्वी इंटरनेट डेटासाठी जितके पैसे खर्च करावे लागत होते, त्यापेक्षा कितीतरी पटीने कमी, म्हणजे नगण्य किंमतीत आज आणखी चांगली डेटा सुविधा उपलब्ध आहे. यापूर्वी देयके  भरण्यासाठी, अर्ज भरण्यासाठी, आरक्षणासाठी, बँकेशी संबंधित कामासाठी, अशा प्रत्येक सेवेसाठी कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. रेल्वे आरक्षण काढायचे असल्यास आणि खेडेगावात राहणारा असेल तर गरीब माणूस दिवसभर शहरात जात असे, बसचे भाडे 100-150 रुपये खर्च करत असे आणि पुन्हा  रेल्वे आरक्षणासाठी रांगेमध्ये थांबत असे. आज तो सामान्य सेवा केंद्रामध्ये जातो आणि तिथे त्याला सामान्य सेवा कर्मचारी सहाय्य करतात आणि त्याचे काम पूर्ण होते आणि गावातच होते. ही व्यवस्था कुठे आहे हे ग्रामस्थांनाही माहीत आहे. यामुळे येण्या- जाण्याचे भाडे दैनंदिन खर्चासह सर्व खर्चात कमी आली आहे. गरीब, कष्टकरी लोकांसाठी ही बचत आणखी मोठी आहे कारण त्यांचा संपूर्ण दिवस वाचतो.

आणि कधी कधी आपण ऐकायचो ना, टाईम इज मनी. ऐकायला आणि सांगायला तर छान  वाटते  पण त्याचा अनुभव ऐकला की मनाला भिडते.  मी नुकताच काशीला गेलो होतो. तर रात्री काशीत… दिवसा मी इकडे तिकडे फिरतो, वाहतूकीला आणि लोकांना त्रास होतो,  मग मी रात्री दीड वाजता रेल्वे फलाटावर काय स्थिती आहे हे पाहायला गेलो. कारण मी तिथला खासदार आहे, मग काम करायलाच हवे. तर मी तिथे प्रवाशांशी बोलत होतो, स्टेशन मास्तरांशी बोलत होतो. माझी अचानक भेट होती,  मी कोणालाही  कळवूनही गेलो नव्हतो. तर मी विचारले, ही जी  वंदे भारत रेल्वेगाडी सुरु करण्यात आली आहे या गाडीचा अनुभव काय आहे आणि आतील व्यवस्था कशी वाटली... ते म्हणाले, साहेब, याला इतकी मागणी आहे की आपण कमी पडत आहोत. मी म्हणालो ही रेल्वेगाडी थोडी महाग आहे, तिकीट जास्त आहे, लोक कशाला जातात त्यात. तर ते म्हणाले, त्यात मजूर सर्वात जास्त जातात, गरीब लोक सर्वात जास्त जातात. मी म्हटले कसे काय ! हे माझ्यासाठी एक आश्चर्यच होते. ते म्हणाले, दोन कारणांसाठी जातात. म्हणाले, एक म्हणजे - वंदे भारत ट्रेनमध्ये एवढी जागा आहे की सामान उचलून नेले तर ठेवायला जागा मिळते. गरिबांचा एक  स्वतःचा  हिशेब आहे आणि दुसरे म्हणजे - वेळ, जाताना जर  चार तासांची बचत होत असेल, तर तो लगेच कामाला लागतो, त्यामुळे सहा-आठ तासांत जी कमाई होते त्यापेक्षाही कमी दरात तिकीट पडते. वेळ हा पैशासमान आहे, गरीब कसा हिशेब  करतात, हे खूप शिकलेल्या लोकांनाही  फारसे कळत नाही.

मित्रांनो,

ई-संजीवनी सारखी टेली वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे. मोबाईल फोनवरून मोठी-मोठी रुग्णालये मोठमोठे डॉक्टर्स यांसह प्राथमिक गोष्टी पूर्ण होऊन जातात. आणि या माध्यमातून आत्तापर्यंत 3 कोटींहून अधिक लोकांनी घरी बसून आपल्या मोबाईलवरून चांगल्या चांगल्या रुग्णालयांकडून, उत्तमोत्तम डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. जर त्यांना डॉक्टरांकडे जावे लागले असते तर किती कठीण गेले असते, किती खर्च आला असता याची तुम्ही कल्पना करू शकता. डिजिटल इंडिया सेवेमुळे या सर्व गोष्टींची गरज भासणार नाही.मित्रांनो,

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, त्यातून आलेल्या पारदर्शकतेने गरीब आणि मध्यमवर्गीयांना अनेक स्तरावर चालणाऱ्या भ्रष्टाचारापासून मुक्त केले आहे.
लाच दिल्याशिवाय कोणतीही सुविधा मिळणे कठीण होते तो  काळ आपण पाहिला आहे.  डिजिटल इंडियामुळे सर्वसामान्य कुटुंबाचा हा पैसाही वाचला आहे. डिजिटल इंडियामुळे मध्यस्थांचे जाळेही संपुष्टात येत आहे.


आणि मला आठवतंय एकदा विधानसभेत चर्चा झाली होती, आज ही चर्चा आठवली तर मला वाटतं विधानसभेत अशी देखील चर्चा व्हायची. काही पत्रकारांना हे सर्व सापडेल. विषय असा होता की, विधवा पेन्शन  मिळते, तेव्हा मी म्हणालो एक काम करा, टपाल कार्यालयांमध्ये त्यांची खाती उघडा आणि तिथे त्यांचे छायाचित्र असावे  आणि ही सर्व व्यवस्था असावी आणि टपाल कार्यलयांमध्ये जाऊन विधवा भगिनीला पेन्शन मिळावी. यावर गदारोळ झाला, वादळी चर्चा झाली, मोदीसाहेब, तुम्ही हे  काय आणले आहे, विधवा भगिनी घराबाहेर कशी पडणार? ती बँकेत किंवा टपाल कार्यालयामध्ये कशी जाईल, तिला पैसे कसे मिळणार, सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारची भाषणे केली, तुम्ही पाहाल तर मजेशीर बोलत होते. मी म्हणालो की मला या मार्गावर जायचे आहे, तुम्ही मदत केलीत तर बरे होईल. मदत केली नाही पण आम्ही पुढे गेलो कारण जनतेने मदत केली आहे ना? पण ते गदारोळ का करत होते ? त्यांना विधवांची काळजी नव्हती, जेव्हा मी टपाल कार्यालयांमध्ये छायाचित्र, ओळख अशी सगळी व्यवस्था केली, तेव्हा डिजिटल जगताची तितकीशी प्रगती झाली नव्हती. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, अनेक विधवा अशा आढळल्या की ज्यांच्या  मुलीचा जन्मही झाला नव्हता आणि विधवा झाल्या होत्या आणि पेन्शन दूसरीकडे जात होती. ती कोणाच्या खात्यात जात असेल  हे तुम्हाला समजले असेलच. मग गदारोळ होईल की नाही. कशी सर्व गळती बंद केली तर  त्रास होणारच आहे. आज तंत्रज्ञानाचा वापर करून थेट लाभ हस्तांतरणाद्वारे   गेल्या 8 वर्षात 23 लाख कोटींहून अधिक रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले गेले आहेत. या तंत्रज्ञानामुळे देशाचे 2 लाख 23 हजार कोटी रुपये म्हणजेच सुमारे 2.25 लाख कोटी रुपये, जे दुसऱ्याच्या हातात, चुकीच्या हातात जात होते, ते वाचले आहेत मित्रांनो.


मित्रांनो,

डिजिटल इंडिया मोहिमेने केलेली एक मोठी गोष्ट म्हणजे शहरे आणि गावे यांच्यातील दरी कमी करणे. आपल्या लक्षात असेल, तेव्हा शहरांमध्ये थोड्या फार सुविधा होत्या, मात्र खेड्यापाड्यातील लोकांची परिस्थिती आणखीनच कठीण होती. गाव आणि शहर यातील दरी भरून निघेल याची कल्पनाही कोणी केली नसेल. गावातल्या छोट्याशा सुविधेसाठीही तुम्हांला पंचायत, तहसील किंवा जिल्हा मुख्यालय कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. डिजिटल इंडिया मोहिमेने अशा सर्व अडचणी सोप्या केल्या आहेत आणि सरकारला नागरिकाच्या दारात, त्याच्या गावात, घरात, त्याच्या हातात आणि फोनवर आणून ठेवले आहे.

गावात शेकडो सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने देण्यासाठी गेल्या 8 वर्षांत 4 लाखांहून अधिक नवीन सामान्य सेवा केंद्र  जोडण्यात आली आहेत. आज या केंद्रांमधून गावातील लोक डिजिटल इंडियाचा लाभ घेत आहेत.

मी  दाहोदला गेलो होतो तेव्हा दाहोद मध्ये माझ्या आदिवासी बंधू -भगिनींची भेट झाली. तिथे एक  दिव्यांग दाम्पत्य होते. वय 30-32 वर्षे  असेल, त्यांनी मुद्रा योजनेतून  पैसे  घेतले, थोडे फार संगणकाचे ज्ञान घेतले आणि  पति पत्नीने दाहोदच्या आदिवासी जिल्ह्यातील एका छोट्या गावात सामायिक सेवा केंद्र सुरु केले.  ती दोघे मला भेटली तेव्हा ते म्हणाले की साहेब, माझे सरासरी मासिक उत्पन्न  28000 रुपये आहे, गावातील लोक माझ्याकडेच सेवा घेत आहेत. डिजिटल इंडियाची ताकद तर बघा.

सव्वा लाखांहून अधिक सामायिक सेवा केंद्र, ग्रामीण दुकाने आता ई-व्यापार ग्रामीण भारतात घेऊन जात आहेत.

एक दुसरा अनुभव, व्यवस्थांचा कशा प्रकारे लाभ घेतला जाऊ शकतो. मला आठवतंय, मी इथे गुजरातमध्ये होतो, तेव्हा शेतकऱ्यांना विजेची बिले भरण्यात अडचणी येत होत्या. पैसे घेण्याची ठिकाणे 800-900 होती. विलंब झाला तर नियमानुसार वीज जोडणी कापली जायची. मग पुन्हा नवीन जोडणी घ्यायची तर पुन्हा पैसे द्यावे लागायचे. आम्ही भारत सरकारला त्यावेळी विनंती केली होती, अटलजींचे सरकार होते, विनंती केली की ते टपाल कार्यालयात चालू करा, विजेची बिले टपाल कार्यालयात भरता येतील असे काही करा, अटलजींनी माझे म्हणणे ऐकले आणि  गुजरातमधील शेतकऱ्यांच्या समस्या दूर झाल्या. व्यवस्थांचा उपयोग कशा प्रकारे  केला जाऊ शकतो याचा एक प्रयोग मी दिल्लीला जाऊन केला, सवय जायची नाही, कारण आम्ही लोक अहमदाबादी, एकेरी मग दुहेरी प्रवासाची सवय लागली आहे, म्हणूनच रेल्वेचे स्वतःचे वायफाय , खूप मजबूत  नेटवर्क आहे, तर त्यावेळी आमच्या रेल्वेच्या मित्रांना मी म्हटले, ही 2019 च्या निवडणुकीपूर्वीची गोष्ट आहे. मी त्यांना म्हटले की रेल्वेचे जे फलाट आहेत, त्यावर वायफाय मोफत उपलब्ध करा. आणि आसपासच्या गावातील मुलांना अभ्यास करायचा असेल तर येतील, आणि त्यांना कनेक्टिविटी मिळेल आणि त्यांना जे लिहायचे वाचायचे असेल ते करतील. तुम्हाला आश्चर्य वाटेल की एकदा वर्च्युअली काही विद्यार्थ्यांशी बोलत होतो. खूप जण रेल्वे फलाटावर मोफत वायफायच्या मदतीने स्पर्धा परीक्षांची तयारी करायचे आणि उत्तीर्ण व्हायचे. कोचिंग क्लासमध्ये जायला नको, खर्च करायला नको, घर सोडायचे नाही, फक्त आईच्या हातची भाकरी मिळेल, आणि अभ्यासासाठी रेल्वेच्या फलाटाचा उपयोग करायचा. मित्रांनो, डिजिटल इंडियाची ताकद पाहा.

पीएम स्वामित्व योजना, कदाचित शहरातील लोकांचे याकडे खूप कमी लक्ष गेले आहे. प्रथमच शहरांप्रमाणे गावातील घरांचे मॅपिंग आणि  डिजिटल कायदेशीर कागदपत्रे गावकऱ्यांना देण्याचे काम सुरु आहे.  ड्रोन गावांमध्ये जाऊन प्रत्येक घराचे वरून मॅपिंग करत आहे, नकाशा बनवतो, त्याची खात्री पटते, त्याला प्रमाणपत्र मिळते, आता त्याच्या कोर्ट-कचेरीच्या फेऱ्या  बंद, हे  डिजिटल इंडियामुळे शक्य झाले आहे. डिजिटल इंडिया अभियानाने देशात मोठ्या संख्येने रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण केल्या आहेत.

मित्रांनो,

डिजिटल इंडियाचा एक खूप  संवेदनशील पैलू देखील आहे, ज्याची तेवढी चर्चा बहुधा मोठ्या प्रमाणात होत नाही.  डिजिटल इंडियाने हरवलेल्या अनेक मुलांना कशा प्रकारे आपल्या कुटुंबाकडे परत आणले हे ऐकल्यावर तुमचे मन भरून येईल. आता मी, आणि माझी तर तुम्हाला विनंती आहे की इथे जे डिजिटल प्रदर्शन भरले आहे, तुम्ही आवर्जून पहा. तुम्ही तर पहाच, तुमच्या मुलांना घेऊन पुन्हा या. कसे जग बदलत आहे, हे तिथे जाऊन पाहिले तर कळेल.  मला आता तिथे एक लहान मुलगी भेटली. ती मुलगी  6 वर्षांची होती, आणि आपल्या कुटुंबापासून दूर गेली होती. रेल्वे फलाटावर आईचा हात सुटला आणि ती दुसऱ्याच गाडीत जाऊन बसली. आई-वडिलांविषयी फार काही सांगू शकत नव्हती. तिच्या कुटुंबाला शोधण्याचे खूप प्रयत्न करण्यात आले, मात्र त्यात यश आले नाही. मग आधार डेटाच्या मदतीने  तिच्या कुटुंबाला शोधण्याचा प्रयत्न झाला. त्या मुलीचा आधार बायोमीट्रिक घेतला तर ते नाकारण्यात आले. असे समजले की त्या मुलीचे आधीच आधार कार्ड तयार करण्यात आले आहे. त्या  आधार कार्डच्या माहितीच्या आधारे त्या मुलीच्या कुटुंबाचा शोध लागला.


तुम्हाला ऐकून बरे वाटेल की आज ती मुलगी आपल्या कुटुंबाबरोबर आपले आयुष्य जगत आहे. आपली स्वप्ने साकार करण्यासाठी  आपल्या गावात प्रयत्न करत आहे. तुम्हालाही हे ऐकून बरे वाटेल आणि माझी अशी माहिती आहे की अशा 500 हून अधिक मुलांचा शोध घेऊन या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यांची  त्यांच्या कुटुंबाशी भेट घालून  देण्यात आली आहे.


मित्रांनो ,

मागील  आठ वर्षांमध्ये  डिजिटल इंडियाने देशात जे सामर्थ्य निर्मण केले आहे, त्याने  कोरोना जागतिक  महामारीचा सामना करण्यात भारताची खूप मदत केली आहे. तुम्ही  कल्पना करू शकता की जर  डिजिटल इंडिया अभियान नसते तर 100 वर्षातून एकदा आलेल्या संकटात देशात आपण काय करू शकलो असतो? आपण देशातील कोट्यवधी महिला, शेतकरी मजुरांच्या बँक खात्यात एका क्लिकवर हजारो कोटी रुपये त्यांच्यापर्यंत पोहचवले. एक राष्ट्र-एक शिधापत्रिकाच्या मदतीने आम्ही  80 कोटींहून अधिक देशवासियांना मोफत अन्नधान्य पुरवठा सुनिश्चित केला आहे, ही तंत्रज्ञानाची कमाल आहे.


आम्ही  जगातील सर्वात मोठे आणि सर्वात कार्यक्षम कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि कोविड मदत कार्यक्रम राबवला. आरोग्य सेतू आणि कोवीन हे असे प्लॅटफॉर्म आहेत ज्यांच्या माध्यमातून आतापर्यंत जवळपास 200 कोटी लसींच्या मात्रा. त्याची संपूर्ण नोंद  उपलब्‍ध आहे. कोण राहिले, कुठे राहिले याची माहिती त्याच्या माध्यमातून  प्राप्‍त होते. आणि आपण लक्षित व्यक्तीच्या लसीकरणाचे काम करू शकलो आहोत. जगात आज देखील चर्चा आहे की लस प्रमाणपत्र कसे घ्यायचे, अनेक दिवस निघून जातात.  भारतात ती व्यक्ती लसीची मात्रा घेऊन बाहेर पडते, त्याच्या मोबाईल साईटवर प्रमाणपत्र असते. जग कोविन द्वारे लसीकरणाच्या सविस्तर प्रमाणपत्राच्या माहितीची चर्चा करत आहे . भारतात काही लोक, त्यांचा काटा  याच गोष्टीवर  अडकला. यावर मोदींचा  फोटो कसा. एवढे मोठे काम, एवढे विशाल काम त्यांचा मेंदू तिथेच अडकला होता.


मित्रांनो,

भारताचे डिजिटल फिनटेक सोल्युशन आणि आज U-fintech चा आहे, या विषयाबद्दल देखील मी बोलेन. कधीकाळी संसदेत एकदा  चर्चा झाली आहे त्यात पाहा. ज्यात देशाचे माजी अर्थमंत्री भाषण करत आहेत. ते म्हणाले होते की त्या लोकांकडे  मोबाइल फोन नाही, लोक डिजिटल कसे करतील. माहित नाही ते काय-काय बोलले आहेत, तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. खूप शिकलेल्या लोकांची अशीच स्थिती होते.  Fintech UPI म्हणजेच यूनिफाईड पेमेंट इंटरफेस, आज संपूर्ण जग याकडे आकर्षित होत आहे. जागतिक बँकेसह सर्वांनी  हा सर्वोत्तम प्लॅटफॉर्म म्हणून त्याची प्रशंसा केली आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की इथे प्रदर्शनात पूर्ण  फिनटेक विभाग आहे. ते कसे काम करते ते तिथे पाहता येईल. कशा प्रकारे मोबाईल फोनवर  पेमेंट होते, कसे पैसे येतात, जातात हे सगळे तुम्हाला इथे पहायला मिळेल. मी म्हणेन की हा जो फिनटेकचा प्रयत्न केला आहे, हा खऱ्या अर्थाने लोकांनी, लोकांचे,  लोकांसाठी शोधलेला सर्वोत्तम  उपाय आहे. त्यातील तंत्रज्ञान हे भारताचे स्वतःचे म्हणजेच लोकांचे आहे. देशवासीयांनी त्याला आपल्या जीवनाचा म्हणजेच लोकांच्या जीवनाचा भाग बनवले आहे. त्याने देशवासीयांचे व्यवहार सोपे केले आहेत म्हणजे लोकांसाठी केले आहेत.


याच वर्षी मे महिन्यात भारतात दर मिनिटाला..तुम्हाला अभिमान वाटेल, भारतात दर मिनिटाला 1 लाख 30 हजारांहून अधिक यूपीआय व्यवहार झाले आहेत. प्रत्येक सेकंदाला सरासरी 2200 व्यवहार पूर्ण झाले आहेत. म्हणजे आता मी जे भाषण करत आहे, जितक्या वेळा मी यूनिफाईड पेमेंट इंटरफेस एवढे शब्‍द बोलतो, एवढ्या वेळेत यूपीआयद्वारे 7000 व्यवहार पूर्ण झाले आहेत...मी जे दोन शब्‍द बोलत आहे, तेवढ्या वेळेत. हे काम आज डिजिटल इंडियाच्या माध्‍यमातून होत आहे.

आणि मित्रांनो, तुम्हाला अभिमान वाटेल, भारतात कुणी म्हणतात निरक्षर आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत, असे आहेत, तसे आहेत,ती देशाची ताकद पाहा, माझ्या देशवासियांची ताकद पाहा, जगातील  समृद्ध देश, त्यांच्या समोर माझा देश, जो विकसनशील देशांच्या जगात  आहे, जागतिक स्तरावर 40 टक्के डिजिटल व्यवहार भारतात होतात, मित्रांनो .


यातही  BHIM-UPI आज सुलभ  डिजिटल व्यवहारांचे  सशक्त माध्यम म्हणून समोर आले आहे. आणि सर्वात मोठी गोष्ट, आज कुठल्याही मॉलच्या आत ब्रँडेड विकणाऱ्यांकडे व्यवहाराचे जे तंत्रज्ञान आहे, तेच तंत्रज्ञान आज त्याच्या समोर फेरीवाले आणि ठेलेवाले जे बसले आहेत ना, 700-800 रुपये कमावतात, अशा मजुरांकडेही तीच व्यवस्था आहे, जी मोठमोठ्या मॉलमधील श्रीमंतांकडे आहे. नाहीतर आपण ते दिवस देखील पाहिले आहेत जेव्हा मोठमोठ्या दुकानांमध्ये क्रेडिट आणि डेबिट कार्ड चालायचे आणि फेरीवाला ग्राहकांसाठी सुट्या पैशांच्या शोधात असायचा. आणि आता तर मी पाहत होतो एक दिवस, बिहारचा कुणीतरी प्लॅटफॉर्मवर भिक्षा मागत होता, तो डिजिटल  पैसे घ्यायचा. आता पहा ना, दोघांकडे समान शक्ती आहे,  डिजिटल इंडियाची ताकद आहे.


म्हणूनच  आज जगातील विकसित देश असतील, किंवा मग असे देश जे अशा प्रकारच्या तंत्रज्ञानात गुंतवणूक करू शकत नाहीत, त्यांच्यासाठी यूपीआय सारखे भारताची डिजिटल उत्पादने आज आकर्षणाचे केंद्र आहे. आपल्या डिजिटल सोल्यूशन्समध्ये मोठी व्याप्ती, सुरक्षा आणि लोकशाही मूल्ये देखील आहेत.

आपले हे जे गिफ्ट (GIFT) सिटीचे  काम आहे  ना, माझे  शब्‍द लिहून ठेवा, ते आणि माझे  2005 किंवा 2006 चे भाषण आहे ते देखील ऐका. त्यावेळी मी जे म्हटले होते, की  गिफ्ट सिटी मध्ये काय -काय  होणार आहे, आज ते प्रत्यक्षात साकार होताना दिसत आहे. आणि आगामी काळात फिनटेकच्या जगात डेटा सुरक्षेच्या बाबतीत, वित्त पुरवठ्याच्या जगात गिफ्ट सिटी खूप मोठी ताकद म्हणून उदयाला येत आहे. ते केवळ गुजरात नाही, तर संपूर्ण भारताची आन-बान-शान बनत आहे.


मित्रांनो,

डिजिटल इंडिया भविष्यातही भारताच्या नव्या अर्थव्यवस्थेचा भक्कम पाया बनावी, भारताला उद्योग 4.0 मध्ये आघाडीवर ठेवावे यासाठी आज अनेक उपक्रम राबवले जात आहेत, प्रयत्न केले जात आहेत.  आज देशभरात कृत्रिम प्रज्ञा (एआय), ब्लॉक-चेन, एआर-व्हीआर, थ्रीडी प्रिंटिंग, ड्रोन, रोबोटिक्स, हरित उर्जा अशा अनेक नवीन काळातील उद्योगांसाठी देशभरात 100 हून अधिक कौशल्य विकास अभ्यासक्रम चालवले जात आहेत.  विविध संस्थांच्या सहकार्याने येत्या 4-5 वर्षात भविष्यातील कौशल्यांसाठी 14-15 लाख तरुणांना नव्याने कुशल करणे आणि त्यांचे कौशल्य उन्नत करण्याचा आमचा प्रयत्न आहे, आमचा त्या दिशेने प्रयत्न सुरू आहे.

आज इंडस्ट्री 4.0 साठी आवश्यक कौशल्ये तयार करण्यावरही शालेय स्तरावर लक्ष केंद्रित केले जात आहे.  आज सुमारे 10 हजार अटल टिंकरिंग लॅबमध्ये 75 लाखांहून अधिक विद्यार्थी नवनवीन कल्पनांवर काम करत आहेत, आधुनिक तंत्रज्ञान जाणून घेत आहेत. मी इथे प्रदर्शन बघायला गेलो होतो.  मला खूप आनंद वाटला की दुर्गम भागातील ओदिशातून कुणीतरी मुलगी आहे, कुणी त्रिपुराची आहे, कुणी उत्तर प्रदेशातल्या गावातली आहे, ती स्वतःची उत्पादने घेऊन आली आहे. 15 वर्षे, 16 वर्षे, 18 वर्षांच्या मुली जगाच्या समस्यांवर उपाय घेऊन आल्या आहेत. तुम्ही त्या मुलींशी बोलाल तेव्हा तुम्हाला वाटेल की ही माझ्या देशाची ताकद आहे मित्रांनो. अटल टिंकरिंग लॅबमुळे शाळेमध्ये जे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे मुले मोठमोठ्या मुद्यांवर आणि मोठमोठ्या समस्यांवर उपाय शोधून काढत आहेत. तो 17 वर्षांचा असेल, मी त्याला ओळख करून देण्यास सांगितले, तो म्हणतो की मी ब्रँड अॅम्बेसेडर आहे. म्हणजेच डिजिटल इंडियाच्या क्षेत्रात आम्ही ज्या उपकरणांवर काम करत आहोत त्याचा मी ब्रँड अॅम्बेसेडर आहे. अशा आत्मविश्वासाने ते बोलत होते. हे सामर्थ्य पाहिल्यावर विश्वास दृढ होतो की तो देशाची स्वप्ने साकार करेलच, संकल्प पूर्ण करणारच.


मित्रांनो,

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तंत्रज्ञानासाठी आवश्यक मानसिकता निर्माण करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. देशात अटल इंक्यूबेशन केंद्रांचे मोठे जाळे निर्माण केले जात आहे. त्याचप्रमाणे, पंतप्रधान ग्रामीण डिजिटल साक्षरता अभियान म्हणजेच पीएम-दिशा देशात डिजिटल सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी मोहीम राबवत आहे.  आतापर्यंत देशभरात 40 हजारांहून अधिक केंद्रे स्थापन करण्यात आली असून 5 कोटींहून अधिक लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
 
मित्रांनो,

डिजिटल कौशल्ये आणि डिजिटल पायाभूत सुविधांसह तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात तरुणांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी अनेक वेगवेगळ्या दिशेने सुधारणा केल्या जात आहेत.  अंतराळ असो, मॅपिंग असो, ड्रोन असो, गेमिंग आणि अॅनिमेशन असो, अशी अनेक क्षेत्रे, जी डिजिटल तंत्रज्ञानाच्या भवितव्याचा विस्तार करणार आहेत, ती नवनिर्मितीसाठी खुली करण्यात आली आहेत.  अंतराळ क्षेत्र…आता इन-स्पेस मुख्यालय अहमदाबादमध्ये बनवले आहे. अंतराळ आणि नवीन ड्रोन धोरणासारख्या तरतुदी या दशकात भारताच्या तंत्रज्ञान क्षमतेला नवीन ऊर्जा देतील. गेल्या महिन्यात मी इन-स्पेसच्या मुख्यालयाच्या उद्घाटनासाठी आलो होतो, तेव्हा मी काही मुलांशी संवाद साधला, ती शाळेतील मुले होती. ते उपग्रह सोडण्याच्या तयारीत होते.. ते उपग्रह अवकाशात सोडण्याच्या तयारीत होते. मला तिथे सांगण्यात आले की, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठी आम्ही शाळकरी मुलांनी बनवलेले 75 उपग्रह अवकाशात सोडणार आहोत.  माझ्या देशाच्या शालेय शिक्षणात हे घडत आहे मित्रांनो.


मित्रांनो,

भारत आज पुढील तीन-चार वर्षांत इलेक्ट्रॉनिक उत्पादन 300 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त पातळीवर नेण्याच्या लक्ष्यावर काम करत आहे. भारताला चिप घेणारापासून ते चिप तयार उत्पादक देश बनवायचे आहे. सेमीकंडक्टरचे उत्पादन वाढवण्यासाठी भारतात गुंतवणूक झपाट्याने वाढत आहे. पीएलआय योजनाही यामध्ये मदत करत आहे. म्हणजेच मेक इन इंडियाची ताकद आणि डिजिटल इंडियाची ताकद यांची दुहेरी मात्रा भारतातील उद्योग 4.0 ला नवीन उंचीवर नेणार आहे.


आजचा भारत त्या दिशेने वाटचाल करत आहे ज्यात योजनांच्या लाभासाठी नागरिकांना कागदपत्रांसाठी सरकारकडे प्रत्यक्ष येण्याची गरज भासणार नाही. प्रत्येक घराघरात पोहोचणारे इंटरनेट आणि भारतातील प्रादेशिक भाषांमधील विविधता भारताच्या डिजिटल इंडिया मोहिमेला नवी चालना देईल. डिजीटल इंडिया मोहीम अशाच प्रकारे नवीन आयाम जोडत राहील, डिजिटल क्षेत्रात जागतिक नेतृत्वाला दिशा देईल. आणि आज माझ्याकडे वेळ कमी होता, मी सर्व काही पाहू शकलो नाही.  पण कदाचित दोन दिवसही कमी पडतील, अशा अनेक गोष्टी तिथे आहेत. आणि मी गुजरातच्या लोकांना सांगेन, संधी सोडू नका. तुम्ही तुमच्या शाळा-महाविद्यालयातील मुलांना तिथे घेऊन जा. तुम्हीही वेळ काढून जा.  एक नवा भारत तुमच्या डोळ्यासमोर येईल. आणि भारत सामान्य माणसाच्या जीवनाच्या गरजांशी जोडलेला दिसेल.  नवा विश्वास जन्माला येईल, नवे संकल्प सोडले जातील. आणि आशा आकांक्षांच्या पूर्ततेच्या विश्वासाने, डिजिटल इंडियाच्या माध्यमातून, देश त्या दिशेने पुढे जाण्याच्या तयारीच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे, भविष्याचा भारत, आधुनिक भारत, समृद्ध आणि बलवान भारत ती वाटचाल करत आहे. एवढ्या कमी वेळात हे साध्य झाले. भारतात प्रतिभा आहे, भारतामध्ये तरुणांचे सामर्थ्य आहे, त्यांना संधी हवी आहे.  आणि आज देशात असे सरकार आहे जे देशातील जनतेवर विश्वास ठेवते, देशातील तरुणांवर विश्वास ठेवते आणि त्यांना प्रयोग करण्याची संधी देत आहे. त्याचा परिणाम म्हणून देश अनेक दिशांनी अभूतपूर्व ताकदीने पुढे जात आहे.


या डिजिटल इंडिया सप्ताहानिमित्त मी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. येत्या दोन-तीन दिवस कदाचित हे प्रदर्शन सुरूच राहील. तुम्ही त्याचा फायदा घ्यावा. असा अप्रतिम कार्यक्रम तयार केल्याबद्दल मी पुन्हा एकदा भारत सरकारच्या विभागाचे अभिनंदन करतो. मी, आज मी सकाळी तेलंगणामध्ये होतो, नंतर आंध्रला गेलो आणि मग मला तुमच्यामध्ये येण्याची संधी मिळाली, आणि खूप छान वाटले. तुम्हा सर्वांचा उत्साह मला दिसतो आहे, तो उत्साह पाहिल्यावर आणखीनच आनंद होतो. गुजरातमध्ये हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी विभागाचे अभिनंदन करतो आणि इतका अप्रतिम कार्यक्रम केल्याबद्दल अभिनंदन करतो.  आणि देशातील तरुणांसाठी ते प्रेरणास्थान राहील, याच विश्वासाने तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.


धन्यवाद !

***


S.Thakur/S.Kane/S.Chavan/V.Ghode

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1839531) Visitor Counter : 133