युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेच्या रिले मशालीचे महाराष्ट्रात जोरदार स्वागत


नागपूरमध्ये प्रसिद्ध झिरो माईल येथे तर पुण्यात ऐतिहासिक शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिराला दिली भेट

बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल रविवारी पोहचणार गोव्यात

Posted On: 02 JUL 2022 6:10PM by PIB Mumbai

 

पहिली बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिले आज महाराष्ट्रात पोहोचली आणि नागपूर आणि पुणे या प्रमुख ठिकाणांवरून मशालीचा प्रवास झाला. मशाल संध्याकाळी 6.30 वाजता मुंबईत पोहोचेल तेथून ती गोव्याकडे रवाना होईल. भारत स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना, बुद्धिबळ ऑलिम्पियाडची मशाल देशातील 75 शहरांमध्ये नेली जात आहे. 19 जून रोजी नवी दिल्ली येथे मशाल  रिलेच्या ऐतिहासिक आरंभ  दिनी, फिडे या  आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेचे  अध्यक्ष आर्कडी ड्वोरकोविच यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मशाल दिली त्यानंतर त्यांनी ती भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हातात  सुपूर्द केली होती.

 

भारत प्रथमच बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालीचा मान

यावर्षी, प्रथमच आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ, FIDE (Fédération Internationale des Échecs), ने बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालची सुरुवात केली आहे, जी ऑलिम्पिक परंपरेचा भाग आहे, मात्र, बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये आजपर्यंत केली गेली नाही. यापुढे दर दोन वर्षांनी जेव्हा बुद्धिबळ ऑलिम्पियाड होईल तेव्हा भारतातून यजमान देशाकडे मशाल निघेल.

28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44 वे बुद्धिबळ ऑलिम्पियाड होणार आहे. 1927 पासून आयोजित करण्यात आलेल्या या मानाच्या स्पर्धेचे आयोजन भारतात प्रथमच तर आशियामध्ये 30 वर्षांनंतर केले जात आहे.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिले झिरो माईल, नागपूर येथे

आज सकाळी राज्याची उपराजधानी नागपुरात पहिल्यावहिल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड रिले मशालीचे आगमन झाले. शहरातील प्रसिद्ध झिरो माईल येथे बुद्धिबळ मशाल रॅलीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रँड मास्टर रौनक साधवानी, दिव्या देशमुख संकल्प गुप्ता यांच्यासह नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, एनसीसी कॅडेट, क्रीडा प्रेमी  उपस्थित होते. यावेळी सर्व ग्रँड मास्टरचे स्वागत उपस्थित अधिकाऱ्यांनी केले.

नंतर रॅली नागपूर शहरातील प्रमुख चौकातून मार्गस्थ झाली आणि नागपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर नेण्यात आली. तिथून ती पुण्यात पोहचली.

 

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल पोहोचली 'पुणे' शहरात

पहिल्या चेस ऑलिम्पियाड मशालीचे आज पुण्यात मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ढोल ताशाच्या निनादात मशालीची मिरवणूकही काढण्यात आली.

पुण्यातील अमनोरा टाऊनशिप मध्ये झालेल्या या शानदार समारंभासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ग्रॅण्ड मास्टर अभिजित कुंटे, वुमन ग्रॅण्ड मास्टर ईशा करवडे, खेलरत्न पुरस्कार विजेती नेमबाज अंजली भागवत  यांच्यासह राज्य बुद्धिबळ संघटनेचे आजी माजी पदाधिकारी, शालेय विद्यार्थी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. चेस ऑलिम्पियाड च्या निमित्तानं भारतात बुद्धिबळ या खेळाची लोकप्रियता वाढावी आणि या क्रीडा प्रकारात नवी क्रांती घडावी अशी अपेक्षा यावेळी अमिताभ गुप्ता यांनी व्यक्त केली.

गुप्ता यांच्या हस्ते यावेळी ऑलिम्पियाड ज्योत ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. नंतर ज्योत यात्रेने शनिवारवाडा आणि दगडूशेठ गणपती मंदिरात भेट दिली. त्यानंतर ही ज्योत मुंबईकडे रवाना झाली.

मुंबई येथील कार्यक्रमाविषयी अद्ययावत माहिती कार्यक्रमानंतर लगेच प्रकाशित करण्यात येईल.

बुद्धिबळ ऑलिम्पिक मशाल रॅली

या ऐतिहासिक मशाल रॅलीचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी  स्टेडियमवर करण्यात आला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त, या रिलेमध्ये एकूण 75 शहरांचा समावेश असेल.

19 जून रोजी नवी दिल्ली येथे मशाल रिलेच्या ऐतिहासिक आरंभ दिनी, फिडे या  आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संस्थेचे  अध्यक्ष आर्कडी ड्वोरकोविच यांनी माननीय पंतप्रधान मोदी यांच्याकडे ही मशाल दिली त्यानंतर  त्यांनी ती भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांच्या हातात  सुपूर्द केली.ऐतिहासिक शुभारंभानंतर , मशालीने  राष्ट्रीय राजधानीतील लाल किल्ला, धरमशाला येथील एचपीसीए, अमृतसरमधील अटारी बॉर्डर, आग्रा येथील ताजमहाल आणि लखनौमधील विधानसभेसह ऐतिहासिक प्रतिष्ठा लाभलेल्या  ठिकाणी प्रवास केला.

प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच, भारत 44 व्या फिडे  बुद्धिबळ ऑलिम्पियाडचा केवळ आयोजकच नाही तर 1927 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच फिडे द्वारे स्थापित  मशाल  रिलेची सुरुवात करणारा पहिला देश आहे.आता दर दोन वर्षांनी जेव्हा बुद्धिबळ ऑलिम्पियाड होईल तेव्हा भारतातून यजमान देशाकडे मशाल निघेल.

स्पर्धेचे यजमानपद भारताकडे असल्यामुळे 44 व्या फिडे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारत 20 खेळाडूंना स्पर्धेत  उतरवणार आहे भारताचा हा  आतापर्यंतचा सर्वात मोठा चमू आहे. भारत खुल्या आणि महिला गटात प्रत्येकी 2 संघ उतरवण्यासाठी पात्र  आहे. 188 देशांमधून  2000 हून अधिक स्पर्धक या स्पर्धेत प्रतिनिधित्व करतील, बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासातील ही सर्वोच्च संख्या आहे. 28 जुलै ते 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत चेन्नई येथे 44 वी फिडे बुद्धिबळ  ऑलिम्पियाड होणार आहे.

बुद्धिबळ, जे आज आपल्याला माहित आहे, त्याचे मूळ चतुरंग या भारतीय खेळापासून आहे, जे 6 व्या शतकातील आहे.  पुढील शतकांमध्ये हा खेळ संपूर्ण आशिया आणि युरोपमध्ये पसरला आणि शेवटी 16 व्या शतकाच्या आसपास बुद्धिबळ म्हणून ओळखला जाणारा हा खेळ विकसित झाला.

***

R.Tidke/S.Thakur/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1838848) Visitor Counter : 214


Read this release in: English , Urdu , Hindi