युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिलेचे मुंबईत स्वागत; रिलेच्या पुढील टप्प्यात गोव्यासाठी सज्ज


सरकारच्या पुढाकाराने देशात बुद्धिबळ संस्कृती निर्माण होत आहे: ग्रँड मास्टर अभिजित कुंटे

Posted On: 02 JUL 2022 9:50PM by PIB Mumbai

 

पहिलीवहिली ऑलिम्पियाड मशाल रिले 19 जून रोजी दिल्लीत सुरू झाल्यानंतर 14 व्या दिवशी महाराष्ट्रात पोहोचली. महाराष्ट्रातील टॉर्च रिलेच्या अंतिम टप्प्यात आज संध्याकाळी 7 वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथील गरवारे क्लबमध्ये भव्य स्वागत करण्यात आले.

तत्वपूर्वी नागपूर आणि पुणे येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालीचे जोरदार स्वागत करण्यात आले. याविषयीच्या वृत्तासाठी इथे क्लिक करा.

मुंबई येथे वानखेडे स्टेडियमवर गरवारे क्लबमध्ये झालेल्या या कार्यक्रमात ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे, अभिजित कुंटे, सौम्या स्वामीनाथन यांच्यासह क्रीडा विभाग, राज्य बुद्धिबळ संघटनेचे अधिकारी, बुद्धिबळाचे चाहते आणि नवोदित बुद्धिबळपटू उपस्थित होते.

या कार्यक्रमाला संबोधित करताना ग्रँड मास्टर अभिजित कुंटे यांनी मशाल रिलेची सुरुवात भारतात होत असल्याचा आनंद व्यक्त केला. “बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये प्रथमच टॉर्च रिले सादर करण्यात आली आहे; भारतातून टॉर्च रिलेला सुरुवात झाली याचा आम्हाला खूप आनंद आहे,” असे ग्रँडमास्टर अभिजित कुंटे म्हणाले. शासनाच्या या उपक्रमामुळे देशात बुद्धिबळ संस्कृती निर्माण होत असून मुलांनाही बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळते. देशात अनेक बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत,असे ते पुढे म्हणाले.

महाराष्ट्र बुद्धिबळ असोसिएशनचे कार्याध्यक्ष डॉ परिणय फुके याप्रसंगी म्हणाले की, यापुढे बुद्धीबळ ऑलिम्पियाड जगभर कुठेही होणार असले तरी बुद्धिबळ ऑल्मिपयाड मशाल रिले भारतातून जाईल.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशालचे राज्यस्तरीय बुद्धिबळपटूंनी पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय संचार ब्युरोने भारतातून बुद्धिबळाचा उगम कसा झाला आणि भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष यावर प्रकाश टाकणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. पायाभूत सुविधांचा विकास, महिला सक्षमीकरण आणि मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांच्या संकल्पनेवर आधारीत कलाकारांनी नुक्कड नाटकही सादर केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल ऐतिहासिक ठिकाणांवर नेण्यात येत आहे. मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया या ऐतिहासिक ठिकाणी मशाल नेण्यात आली.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड मशाल रिले उत्सवाचा भाग म्हणून, 30 नवोदित बुद्धिबळपटूंना आंतरराष्ट्रीय मास्टर्सविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.

मुंबईतील बुद्धिबळ ऑलिम्पियाड टॉर्च रिलेच्या भव्य स्वागत सोहळ्याचा समारोप ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांच्या हस्ते ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे यांच्याकडे मशाल सोपवपून झाला. प्रवासाच्या पुढील टप्प्यात ऑलिम्पियाड मशाल रविवारी सकाळी गोव्यात पोहचणार आहे.

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1838906) Visitor Counter : 241


Read this release in: English