पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान आणि संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट
Posted On:
28 JUN 2022 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 जून 2022
म्युनिकहून परत येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी अबुधाबी इथे काही काळ थांबले. पंतप्रधानांनी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या ऑगस्ट 2019 च्या अबुधाबी दौऱ्यानंतर दोन नेत्यांची ही पहिलीच प्रत्यक्ष भेट होती.
शेख खलिफा बिन झायेद अल नाह्यान यांचा मागच्या महिन्यात मृत्यू झाला त्याविषयी प्रत्यक्ष भेटून शोकसंवेदना व्यक्त करणे, हा पंतप्रधानांच्या या भेटीचा मुख्य उद्देश होता. पंतप्रधानांनी महामहीम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान तसेच त्यांचे कुटुंबीय, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तन्हौन बिन झायेद अल नाह्यान, उपपंतप्रधान शेख मंसौर बिन झायेद अल नाह्यान , अबुधाबी गुंतवणूक प्राधिकरणचे व्यवस्थापकीय संचालक, शेख हमीद बिन झायेद अल नहायन, परराष्ट्र मंत्री तसेच आंतरराष्ट्रीय सहकार, मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद अल नाह्यान , यांच्यासह इतर कुटुंबियांना भेटून संवेदना व्यक्त केल्या.
शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांची संयुक्त अरब अमिरातीचे तिसरे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक म्हणून निवड झाल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले.
दोन्ही नेत्यांनी गेल्या काही वर्षांत अत्यंत काळजीपूर्वक जोपासलेल्या भारत-संयुक्त अरब अमिरात सर्वंकष राजनैतिक भागीदारीच्या विविध पैलूंवर चर्चा केली. 18 फेब्रुवारी रोजी झालेल्या आभासी शिखर परिषदेत, दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर सह्या केल्या होत्या, जो 1 मे पासून लागू झाला आहे. या सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारामुळे दोन्ही देशांत व्यापार आणि गुंतवणुकीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. दोन्ही देशांदरम्यान आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 72 अब्ज अमेरिकन डॉलरचा द्विपक्षीय व्यापार झाला. संयुक्त अरब अमिरात भारताचा तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आणि दुसरे मोठे निर्यात स्थान आहे. गेल्या काही वर्षांत संयुक्त अरब अमीरातीची भारतातील थेट गुंतवणूक सातत्याने वाढते आहे आणि आत्ता ती 12 अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे.
या आभासी शिखर परिषदेदरम्यान दोन्ही नेत्यांनी, संयुक्तपणे एक दृष्टिकोन निवेदन जाहीर केलं. या निवेदनानुसार, येत्या काही वर्षात, दोन्ही देशांमध्ये, विविध विषयांवर द्वीपक्षीय सहकार्यासाठीचा आराखडा तयार करण्यात आला. यात, व्यापार, गुंतवणूक,ऊर्जा, शाश्वत ऊर्जा, अन्नसुरक्षा, आरोग्य, संरक्षण, कौशल्य, शिक्षण, संस्कृती आणि लोकांमधील संबंध यांचा समावेश आहे. या सर्व क्षेत्रात, भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांनी आपले मैत्रीपूर्ण संबंध आणि लोकांमधल्या ऐतिहासिक संबंधांच्या बळावर, अत्यंत दृढ भागीदारी जारी ठेवली आहे, याबद्दल दोन्ही नेत्यांनी या बैठकीत समाधान व्यक्त केलं. भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये, ऊर्जाक्षेत्रात भक्कम भागीदारी असून आता, यात अक्षय ऊर्जेवर अधिक भर दिला जात आहे.
कोविड महामारीच्या काळात, संयुक्त अरब अमिरातीतल्या 35 लाख भारतीयांची उत्तम काळजी घेतल्याबद्दल, पंतप्रधानांनी यावेळी संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष आणि अबुधाबीचे शासक, शेख मोहम्मद बिन जायेद अल नाह्यान यांचे आभार मानले. शेख मोहम्मद बिन जायेद अल नाह्यान यांना लवकरात लवकर भारताचा दौरा करण्याचे आमंत्रणही त्यांनी दिले.
* * *
N.Chitale/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1837761)
Visitor Counter : 207
Read this release in:
Bengali
,
Assamese
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam