पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

जर्मनीमध्ये जी-7 शिखर परिषदेत “उत्तम भविष्यात गुंतवणूक: हवामान बदल, ऊर्जा आणि आरोग्य” या विषयावर पंतप्रधानांचे निवेदन

Posted On: 27 JUN 2022 10:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 जून 2022 

 

महामहीम,

दुर्दैवाने, असे मानले जाते की जागतिक विकास आणि पर्यावरण संरक्षण या उद्दिष्टांमध्ये एक मूलभूत संघर्ष आहे. आणि एक अशीही चुकीची धारणा आहे, की गरीब देश आणि गरीब लोक पर्यावरणाची  अधिक हानी करत असतात. मात्र, भारताचा हजारो वर्षांचा इतिहास, या चुकीच्या विचारांचे पूर्णपणे खंडन करणारा आहे.

प्राचीन भारताने अत्यंत समृद्धीचा काळ बघितला आहे. त्यानंतर आम्ही अत्यंत संकटे घेऊन आलेला पारतंत्र्याचा काळही सहन केला आणि आज स्वतंत्र भारत, सर्वाधिक वेगाने विकसित होत जाणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. मात्र, या संपूर्ण कालखंडात भारताने पर्यावरणाबाबतची आपली कटिबद्धता कणभरही कमी होऊ दिली नाही. भारतात जगातील 17 टक्के लोकसंख्या राहते. मात्र, कार्बन उत्सर्जनात आपले योगदान, केवळ 5 % इतके आहे. याचे मूलभूत कारण आपली जीवनशैली आहे. ही निसर्गासोबत साहचर्य या सिद्धांतावर आधारित आहे.

ऊर्जेची उपलब्धता हा केवळ श्रीमंतांचा विशेषाधिकार नसावा, हे तर आपण सगळेच मान्य कराल. अगदी गरीब कुटुंबाचाही ऊर्जेवर समान अधिकार आहे. आज जेव्हा, भू-राजकीय तणावामुळे ऊर्जेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत तेव्हा  हे लक्षात ठेवणे अधिक महत्त्वाचे झाले आहे. या तत्त्वाने प्रेरित होऊन, आम्ही भारतात एलईडी बल्ब आणि स्वच्छ स्वयंपाकाचा गॅस घरोघरी पोहोचवला. एकीकडे, गरीबांसाठी ऊर्जा उपलब्ध असेल हे सुनिश्चित करतानाच, लाखो टन कार्बन उत्सर्जन देखील कमी करता येऊ शकते हे आम्ही दाखवून दिले.

आपल्या हवामान वचनबद्धतेसोबत असलेली आमची काटिबद्धता, आमच्या कामगिरीतून स्पष्ट झाली आहे.  बिगर- जीवाश्म ऊर्जा स्त्रोतातून 40 टक्क्यांपर्यंत उर्जा-क्षमतेचे  उद्दिष्ट आम्ही आमच्या निश्चित कालावधीच्या नऊ वर्षे आधीच पूर्ण केले आहे.  पेट्रोलमध्ये 10  टक्के इथेनॉल-मिश्रणाचे लक्ष्य देखील नियोजित वेळेच्या 5 महिने आधीच साध्य केले आहे. भरतात, जगातील पहिले संपूर्णपणे सौर उर्जेवर चालणारे विमानतळ आहे. भारतातील रेल्वेचे विशाल जाळे, याच दशकात शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठणार आहे.

महामहीम,

भारतासारखा विशाल देश जेव्हा अशी महत्वाकांक्षा बाळगतो तेव्हा अन्य विकसनशील देशांनाही  प्रेरणा मिळते. आम्हाला  आशा आहे की जी -7 मधील समृद्ध देश भारताच्या प्रयत्नांना समर्थन देतील. आज भारतात स्वच्छ ऊर्जा तंत्रज्ञानासाठी एक खूप मोठी बाजारपेठ उदयाला येत आहे. जी -7 देश या क्षेत्रात संशोधन, नवोन्मेष आणि निर्मितीत गुंतवणूक करू शकतात. प्रत्येक नवीन तंत्रज्ञानसाठी भारत जे प्रचंड प्रमाण  देऊ शकतो  त्यामुळे  हे तंत्रज्ञान संपूर्ण जगासाठी किफायतशीर ठरू शकते. चक्राकार अर्थव्यवस्थेचा मूळ सिद्धांत  भारतीय संस्कृती आणि जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे.

मी गेल्या वर्षी ग्लासगो येथे LIFE – Lifestyle for Environment – नावाच्या चळवळीचे आवाहन केले होते. या वर्षी जागतिक पर्यावरण दिनी आम्ही  LiFE अभियानासाठी जागतिक उपक्रमाचा प्रारंभ केला. या अभियानाचा उद्देश  पर्यावरण-स्नेही जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा आहे.  या चळवळीच्या अनुयायींना  आपण तीन -P म्हणजे  ‘pro planet people’ म्हणू शकतो, आणि आपण सर्वांनी आपापल्या देशात तीन -P लोकांची संख्या वाढवण्याची जबाबदारी उचलायला हवी. भावी पिढ्यांसाठी हे आपले सर्वात मोठे योगदान असेल.

महामहीम,

मानव आणि वसुंधरेचे आरोग्य परस्परांशी जोडलेले आहे. म्हणूनच आपण एक जग, एक आरोग्य हा दृष्टीकोन अवलंबला आहे. महामारी काळात भारताने आरोग्य क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरासाठी अनेक रचनात्मक पद्धती वापरल्या. या नाविन्यपूर्ण पद्धती अन्य विकसनशील देशांपर्यंत नेण्यासाठी जी -7 देश भारताला सहकार्य करू शकतात. अलिकडेच आपण सर्वांनी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला. कोविड संकट काळात जगातील सर्व लोकांसाठी योगसाधना हे प्रतिबंधात्मक आरोग्याचे उत्तम साधन बनले. यामुळे अनेकांना आपले  शारीरिक आणि  मानसिक आरोग्य जपण्यात मोठी मदत झाली. 

योगाव्यतिरिक्त  भारतासह जगातील अन्य देशांमध्ये पारंपरिक वैद्यक प्रणालीचा बहुमोल वारसा आहे. ज्याचा वापर सर्वांगीण आरोग्यासाठी करता येऊ शकेल. मला आनंद आहे कि  अलिकडेच जागतिक आरोग्य संघटनेने पारंपरिक वैद्यकीय औषधाचे जागतिक केंद्र भारतात स्थापन करण्याचा  निर्णय घेतला. हे केंद्र केवळ जगातील विविध पारंपरिक औषध पद्धतींचे भांडार बनेल इतकेच नव्हे  तर इथे अन्य संशोधनालाही  प्रोत्साहन दिले जाईल. याचा लाभ जगातील सर्व नागरिकांना मिळेल.

धन्यवाद.


* * *

N.Chitale/R.Aghor/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1837391) Visitor Counter : 167