आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
अकरा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 जून 2022 पासून पोलिओ निम-राष्ट्रीय लसीकरण दिवसाचे आयोजन
फिरत्या आणि संक्रमण पथकांद्वारे केन्द्रांवर तसेच घरोघरी जाऊन 5 वर्षांखालील सुमारे 3.9 कोटी मुलांना पोलिओ लस देण्याचे लक्ष्य
मुलांना अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी, केन्द्र सरकारने त्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात टोचण्यायोग्य निष्क्रिय पोलिओ विषाणू लस आणली आहे
Posted On:
18 JUN 2022 4:38PM by PIB Mumbai
अकरा राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 19 जूनपासून वर्ष 2022 च्या पहिल्या पोलिओ निम-राष्ट्रीय लसीकरण दिवसाचे आयोजन केले जात आहे. या अंतर्गत बिहार, चंदीगड, दिल्ली, गुजरात, हरियाणा, झारखंड, महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधे पोलिओ लस दिली जाईल.
अभियानादरम्यान फिरत्या आणि संक्रमण पथकांद्वारे केन्द्रांवर तसेच घरोघरी जाऊन 5 वर्षांखालील सुमारे 3.9 कोटी मुलांना पोलिओ लस (ड्रॉप्स ) देण्याचे लक्ष्य ठेवले आहे. केन्द्र सरकारने, मुलांना अतिरिक्त संरक्षण देण्यासाठी, त्याच्या नियमित लसीकरण कार्यक्रमात टोचण्यायोग्य निष्क्रिय पोलिओ विषाणू लसही आणली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रातील इतर 10 देशांसह भारताला 27 मार्च 2014 रोजी पोलिओमुक्त प्रमाणपत्र देण्यात आले. देशात पोलिओचा शेवटचा रुग्ण 13 जानेवारी 2011 रोजी पश्चिम बंगालच्या हावडा येथे नोंदवला गेला.
जागतिक स्तरावर, अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये पोलिओ अजूनही आहे. भारताला "पोलिओमुक्त" प्रमाणित केले गेले असले तरी, विषाणू देशाबाहेरुन येण्याचा धोका किंवा लस-व्युत्पन्न पोलिओ विषाणूचा उदय जागतिक निर्मूलन होईपर्यंत कायम आहे. उच्च लोकसंख्येची प्रतिकारशक्ती राखण्याची आणि देशातील संवेदनशील पाळत ठेवण्याची गरज ती अधोरेखित करते.
सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमा अंतर्गत (युआयपी) अतिरिक्त लसींचा अंतर्भाव करून भारत आपल्या मुलांचे अधिकाधिक लस-प्रतिबंधक रोगांपासून (व्हीपीडी) संरक्षण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशात, सर्व लसी देशातील प्रत्येक मुलापर्यंत पोहोचणे महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय पोलिओ कार्यक्रमांतर्गत शिकलेले धडे आणि तयार केलेली प्रणाली, नियमित लसीकरण मजबूत करण्यासाठी आणि 90% पेक्षा जास्त पूर्ण लसीकरण व्याप्ती प्राप्त करण्यासाठी वापरली जात आहे.
राज्य सरकारे आणि जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, रोटरी इंटरनॅशनल आणि इतर भागीदारांनी पोलिओ निर्मूलनातच नव्हे तर नियमित लसीकरण उपक्रमाचा दर्जा उंचावण्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
आपल्या 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचे पोलिओ लसीकरण करून घ्यावे असे आवाहन सर्व पालकांना करण्यात येत आहे.
***
S.Kakade/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1835070)
Visitor Counter : 392