आयुष मंत्रालय
आरोग्य आणि निरामयतेकडे पाहण्याच्या आपल्या दृष्टीकोनात आंतराष्ट्रीय योग दिन 2022 एक क्रांती घडवेल: सर्बानंद सोनोवाल
Posted On:
17 JUN 2022 9:56PM by PIB Mumbai
आगामी आंतरराष्ट्रीय योग दिन सांस्कृतिक कार्यक्रमांच्या दिनदर्शिकेमध्ये केवळ निमित्त ठरणार नाही तर आपण ज्या प्रकारे आरोग्य आणि निरामयतेकडे पाहतो त्याबद्दलच्या दृष्टीकोनात एक क्रांती घडवेल, असे आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज सांगितले. आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची तयारी जोरात सुरू आहे, असे नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांना संबोधित करताना त्यांनी सांगितले.
या वर्षीची योग दिनाची संकल्पना, जगाला भेडसावत असलेल्या भू-राजकीय पेचप्रसंगांना विचारात घेऊन ठरवण्यात आली आहे आणि ही संकल्पना प्रत्येकाला त्यांच्या परोपकारी आणि सहानुभूतीपूर्ण वृत्तीने सर्वांना मदत करण्याचा प्रयत्न करते, अशी माहिती आयुष मंत्र्यांनी पत्रकारांना दिली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात येणारा, आंतरराष्ट्रीय योग दिन देशातील सुमारे 75 प्रतिष्ठित ठिकाणी साजरा केला जाईल, अशी माहिती आयुष मंत्र्यांनी दिली. हा दिवस नाविन्यपूर्ण ‘गार्डियन रिंग’ कार्यक्रमाचाही साक्षीदार असेल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून परदेशातील भारतीय मोहिमांद्वारे आयोजित केल्या जाणार्या सर्व कार्यक्रमांचे प्रसारण , पृथ्वीच्या पूर्वेकडील भागापासून सुरू होईल आणि 16 टाईम झोनमध्ये सूर्य जसा सरकेल तसे पश्चिमेकडील देशांमध्ये बघता येईल. या अनोख्या ‘रिले’ कार्यक्रमात सुमारे ८० देश सहभागी होतील, असे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मन की बात या संबोधनातून जाहीर केल्याप्रमाणे, जगभरातील या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची संकल्पना 'मानवतेसाठी योग' अशी आहे.
या पत्रकार परिषदेत मंत्र्यांनी सामान्य योग नियम यासंदर्भातील पुस्तिका आणि आंतरराष्ट्रीय योग दिनावरील चित्रपटाचे प्रकाशन केले.
पंतप्रधान 21 जून 2022 रोजी म्हैसूर पॅलेस मैदानात आंतराष्ट्रीय योग दिन 2022 या मुख्य कार्यक्रमाचे नेतृत्व करतील.या कार्यक्रमात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचाही सहभाग असेल. सुमारे पंधरा हजार योगप्रेमी योगासने करतील आणि संसद सदस्य, कर्नाटक सरकारचे विभाग, मंत्री, मान्यवर, पूज्य योगगुरू आणि संस्था यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दसरा मैदानावर स्थिर आणि डिजिटल प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन नवोदित आणि तज्ञ या दोघांनाही सारख्याच दृष्टीने आकर्षित करेल आणि योगाच्या लाभदायक जगाचे सर्वांगीण दृश्य दाखवेल.
***
S.Patil/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1834921)
Visitor Counter : 144