कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

निवृत्तिवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी, 'निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभाग' लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सामायिक एक निवृत्तीवेतन संकेतस्थळ सुरु करणार - केंद्रीय मंत्री डॉ.जितेंद्र सिंह

Posted On: 15 JUN 2022 7:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 जून 2022

 

निवृत्तिवेतनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीसाठी, 'निवृत्तीवेतन आणि निवृत्तिवेतनधारक कल्याण विभाग' लवकरच कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित सामायिक एकल निवृत्तीवेतन संकेतस्थळ सुरु करणार आहे. केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार), पृथ्वीविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार),, पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवृत्तीवेतन राज्यमंत्री, तथा अणुऊर्जा आणि अवकाश विभागांचे राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज ही माहिती दिली. या संकेतस्थळामुळे निवृत्तीवेतन विषयक प्रक्रिया, माग काढणे आणि वितरण यातील अडथळे दूर होऊ शकणार आहेत.

निवृत्तीवेतनाचे पैसे चुकते करणे व मागोवा घेण्यासंदर्भात 'भविष्य' या संकेतस्थळाच्या लाभार्थ्यांशी / वापरकर्त्यांशी आज डॉ.जितेंद्र सिंह बोलत होते. 'सर्वांसाठी जीवन सुखकर व सुलभ करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रीदवाक्यानुसार, कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेणारे आगामी संकेतस्थळ निवृत्तिवेतनधारकांना आणि सुपर ऍन्युएशनधारकांना स्वयंचलित पद्धतीने संदेश पाठवत जाईल.' असे ते म्हणाले. देशभरातील निवृत्तिवेतनधारकांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवणे या संकेतस्थळामुळे शक्य होणार असून त्याखेरीज त्यांच्या सूचना आणि तक्रारी नियमितपणे स्वीकारून त्यावर त्वरित उत्तर देण्यासाठी व्यवस्था करण्याचे काम होऊ शकेल.

सुपरऍन्युएशनवर असणाऱ्या आणि आता सुपरऍन्युएशन गटात समाविष्ट होऊ घातलेल्या बहुतांश ज्येष्ठ नागरिकांनी 'भविष्य' मंचाकरवी निवृत्तिवेतनविषयक प्रक्रिया त्वरित होण्याचे कौतुक केले. यांमध्ये निमलष्करी सेवांतून निवृत्त झालेल्यांचाही समावेश आहे. बँकिंग व्यवस्थेकडून येणाऱ्या काही अडचणी यावेळी सिंह यांच्या कानावर घालण्यात आल्या. "कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित संकेतस्थळाच्या बाबतीत कामांचे व जबाबदारीचे वाटप निश्चित असल्याने अशा अडचणी येणार नाहीत" असा विश्वास डॉ.सिंह यांनी यावेळी व्यक्त केला.

"पारदर्शकता, डिजिटायझेशन आणि सेवा प्रदान करण्याच्या मोदी सरकारच्या उद्दिष्टामुळे, 'भविष्य'मध्ये निवृत्तीवेतन प्रक्रियेचे अथपासून इतिपर्यन्त डिजिटायझेशन झालेले आहे." असेही ते म्हणाले. या संदर्भात समुपदेशन आणि अनुभवांची देवघेव करण्यासाठी नियमितपणे निवृत्तीपूर्व कार्यशाळा घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकारीवर्गाला केल्या. "निवृत्तिवेतनविषयक सुधारणा म्हणजे केवळ प्रशासकीय सुधारणा नसून समाजावर त्यांचे व्यापक आणि विस्तृत परिणाम होतात", असेही डॉ.जितेंद्र सिंह म्हणाले.

 

 

 

 

 

S.Patil/J.Waishampayan/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1834354) Visitor Counter : 165