राष्ट्रपती कार्यालय

बेंगळुरू येथील श्री राजाधिराज गोविंद मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात भारताचे राष्ट्रपती उपस्थित

Posted On: 14 JUN 2022 3:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 जून 2022

 

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (14 जून 2022) बेंगळुरूमध्ये वसंतपुरा येथील वैकुंठ टेकडीवरील श्री राजाधिराज गोविंद मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यात उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली. 

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपतींनी मंदिरांचे महत्त्व विशद केले. "हिंदू धर्माच्या सर्वात महत्त्वाच्या सांस्कृतिक प्रतीकांमध्ये पूर्वीपासून देवाल्यांचा समावेश होतो. एका स्तरावर विचार करता ती पवित्र स्थळे आहेत. प्रार्थना करणाऱ्या भाविकांना तेथे देवत्वाची प्रचीती येते, मग ती कंपनांच्या माध्यमातून असो की ऊर्जेच्या की उचंबळून येणाऱ्या भक्तिभावाच्या माध्यमातून असो. अशा एखाद्या ठिकाणी आल्यावर, जग आणि त्याचा कल्लोळ मागे सोडून शांततेत गुरफटल्याचा अनुभव व्यक्तीला येतो. तर दुसऱ्या स्तरावर विचार करता, मंदिरे ही केवळ प्रार्थनास्थळे असण्याच्या कितीतरी पलीकडे आहेत. ती जणू संगमस्थळे आहेत- कला, स्थापत्य, भाषा आणि ज्ञानाच्या परंपरा यांचा मिलाफ/ संगम होण्याची स्थळे !"

"श्रील प्रभुपाद यांच्या मते, गरजूंची सेवा हाही प्रार्थनेचा- पूजनाचाच एक प्रकार आहे, त्यामुळेच भक्तिभावाइतकेच, मानवधर्म राखण्यामुळे आणि सेवाधार्माचे पालन करण्यामुळे इस्कॉन नावारूपाला आले आहे." असे राष्ट्रपती म्हणाले. गेल्या किमान पंचवीस वर्षांपासून बंगळुरूच्या इस्कॉनने लक्षावधी लोकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आल्याचेही राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात नमूद केले. भक्तगणांच्या परिश्रम आणि निश्चयामुळे, एका उजाड वैराण टेकाडाचे रूपांतर हरे कृष्ण टेकडीवरील भव्य अशा इस्कॉन श्री राधा कृष्ण मंदिरामध्ये झाले आहे, असे राष्ट्रपती म्हणाले. तेथेच अक्षयपात्र फाउंडेशनचा जन्म झाला. सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण देण्याचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे अक्षयपात्र." असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले.

राष्ट्रपती कोविंद यांनी श्री मधू पंडित दास आणि बंगळुरूच्या इस्कॉनच्या समर्पित सदस्यांप्रती सदिच्छा व्यक्त केल्या. आगामी काळातील त्यांच्या धार्मिक आणि सेवाभावी कार्यांसाठी राष्ट्रपतींनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

डॉ.हिंडोल सेनगुप्ता यांनी लिहिलेल्या 'सिंग, डान्स अँड प्रे: द इन्स्पिरेशनल स्टोरी ऑफ श्रील प्रभुपाद' या पुस्तकाची प्रत बंगळुरूच्या इस्कॉनचे वरिष्ठ उपाध्यक्ष चंचलपती दास' यांच्या हस्ते  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वीकारली.

 

* * *

R.Aghor/J.Waishampayan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833799) Visitor Counter : 145


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil