आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा 2022 चा डॉ. भारती प्रवीण पवार यांच्या हस्ते आरंभ, बालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट


हे उद्दिष्ट गाठण्यासाठी जनजागृती, रॅली, शालेय स्तरावर स्पर्धांसारखे उपक्रम विविध प्रशासन स्तरांवर राबवून मोठ्या प्रमाणावरील बहु-क्षेत्रीय सहभाग लाभदायी ठरेल - डॉ. भारती प्रवीण पवार

Posted On: 13 JUN 2022 8:36PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13जून 2022

 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री, डॉ. भारती प्रवीण पवार यांनी आज मणिपूरचे आरोग्य मंत्री डॉ. सपम रंजन सिंग यांच्या उपस्थितीत तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा (आयडीसीएफ)-2022 चा शुभारंभ केला. हा  कार्यक्रम 13 जून ते 27 जून 2022 पर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबवण्यात येणार  आहे. बालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणणे  हे  आयडीसीएफचे  ध्येय आहे.

यावेळी बोलताना राज्यमंत्री म्हणाल्या  की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या उल्लेखनीय प्रयत्नांमुळे, नमुना नोंदणी प्रणालीच्या ताज्या अहवालानुसार ( SRS-2019) देशातल्या बालमृत्यूंचे प्रमाण 2014 पासून लक्षणीयरीत्या  घटले आहे, हा दर 2014 मधील  प्रति 1000 बालकांमागे 45  वरून  2019 मध्ये प्रति 1000  बालकांमागे 35 इतका कमी झाला आहे. मात्र अजूनही पाच वर्षांखालील बालकांच्या मृत्यूमागे  अतिसार संबंधित रोग हे एक मोठे  कारण आहे.

डिहायड्रेशन हे मुलांमध्ये अतिसाराचे सर्वात मोठे कारण आहे आणि इतर कारणांमध्ये स्तनपान करणाऱ्या मातेच्या  आहारातील बदलामुळे बाळाच्या आहारातील बदल हे कारण होय. याशिवाय स्तनदा मातेला  किंवा बाळाला प्रतिजैविकांचे सेवन करावे लागल्यास तसेच  कोणत्याही प्रकारचे जिवाणू किंवा परजीवी संसर्ग हे अतिसाराचे  कारण असू शकते,असे डॉ पवार यांनी अधोरेखित केले.

अतिसाराचा प्रतिबंध आणि   निवारणासाठी उपलब्ध  पद्धतींचे महत्त्व सांगताना डॉ पवार म्हणाल्या की केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या  राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS-5) च्या ताज्या अहवालानुसार  अतिसार झालेल्या  पाच वर्षांखालील 60.6% मुलांना ओआरएस  आणि फक्त 30.5% मुलांना झिंक देण्यात आले. याचा अर्थ मातांमध्ये जागरुकतेचा अभाव आहे. अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूचे प्रमाण किमान पातळीवर आणण्यासाठी डॉ पवार यांनी  अधिकाधिक  जनजागृती मोहिमांवर भर दिला.

यासाठी केंद्र सरकारचा संकल्प आणि वचनबद्धता लक्षात घेऊन, बालपणातील अतिसारामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट  गाठण्यासाठी 2014 पासून तीव्र अतिसार नियंत्रण पंधरवडा आयोजित करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. उन्हाळा आणि मान्सूनमध्ये होणारा अतिसाराचा वाढता  प्रादुर्भाव लक्षात घेता या कालावधीत हा पंधरवडा आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले.  हे उद्दिष्ट गाठण्यासाठी  विविध  प्रशासन स्तरांवर जनजागृती, रॅली , शालेय स्तरावर स्पर्धा, नेत्यांकडून राज्य आणि जिल्हास्तरीय कार्यक्रम  राबवून  मोठ्या प्रमाणावरील  बहु-क्षेत्रीय सहभाग लाभदायी ठरेल, असे त्या म्हणाल्या. शुद्ध पेय जलाचे सेवन, स्तनपान किंवा योग्य पोषणयुक्त आहार, स्वच्छता आणि हात धुण्यासारख्या स्वच्छतेच्या सवयी अतिसाराला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतात, असे डॉ पवार म्हणाल्या. स्वच्छ भारत मिशनसारख्या उपक्रमातूनही यावर भर देण्यात आला आहे. वर्तणुकीतील या लहान  बदलांमुळे बालमृत्यू दर कमी करण्यात भारताला लक्षणीय मदत झाली आहे, असे त्यांनी नमूद केले.

आयडीसीएफ अंतर्गत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, अतिसारामुळे उद्भवणाऱ्या  डिहायड्रेशनमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करणे आणि अतिसाराला प्रतिबंध करण्यासाठी  गांभीर्याने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचा समावेश आहे. या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने अतिसारावरील  योग्य व्यवस्थापनासाठी अतिसार  आणि जनजागृतीपर मोहिमांची व्याप्ती वाढवणे, अतिसारावरील उपचारांसाठी योग्य व्यवस्थापनासाठी सेवांची  तरतूद अधिक दक्ष  करणे,ओआरएस-झिंक कॉर्नरची स्थापना, पाच वर्षांखालील बालके  असलेल्या कुटुंबांमध्ये आशा कार्यकर्त्यांच्या साहाय्याने  ओआरएस  चे पूर्व वितरण, स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी जागरुकता निर्माण उपक्रम यांचा समावेश होतो.

आयडीसीएफ अंतर्गत उपक्रमांमधील एक महत्वाचा कार्यक्रम म्हणजे आशा कार्यकर्त्या, परिचारिका  आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांसह क्षेत्रीय कार्यकर्त्यांचे उपक्रम. हे आघाडीवरचे आरोग्य कर्मचारी  पाच वर्षांखालील बालके  असलेल्या कुटुंबांच्या घरी भेट देतात आणि अतिसाराच्या बाबतीत  झिंक आणि ओआरएस  च्या सेवनाच्या महत्वाविषयी  समुपदेशन करतात. याशिवाय  ते स्वच्छतेच्या सवयी आणि  स्तनपानाविषयी मातांना  प्रोत्साहन देतात आणि मातांच्या गट बैठकांमध्ये ओआरएस  तयार करण्याच्या पद्धतीबद्दल सल्ला देतात.

 

 

 

 

N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 

 

 



(Release ID: 1833635) Visitor Counter : 257