सहकार मंत्रालय

तरुणांनी खेड्याकडे जावे -केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आवाहन


गुजरात दौऱ्यातील दीक्षांत समारंभात तरुणांना केले मार्गदर्शन

Posted On: 12 JUN 2022 8:32PM by PIB Mumbai

 

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह आज त्यांच्या गुजरात दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी, 'ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणंद' (IRMA) च्या 41 व्या वार्षिक दीक्षान्त समारंभात सहभागी झाले होते.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image001QU08.jpg

या समारंभात आपले विचार मांडताना "आज ज्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येत आहेत, ते पुढे जाऊन गांधीजींचे स्वप्न साकारण्यासाठी काम करणार आहेत. ग्रामविकासाला गती देऊन, ग्रामविकासाचे देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान मिळवल्याशिवाय, आणि ग्रामविकास साधून गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला समृद्धीकडे नेल्याशिवाय भारत कदापि स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होणार नाही." असे शाह यांनी सांगितले. "आज पदव्या संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही आयुष्यभर ग्रामविकासासाठी काम करत राहावे, कारण तसे योगदान देण्यापासून तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. आज 'ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणंद' (IRMA) ला गुरुदक्षिणा देऊन तुम्ही आयुष्यभर तुमची दृष्टी ग्रामीण विकासाकडे लागलेली असेल आणि खेडोपाडीच्या गरिबांना सुखी समृद्ध करण्यात तुम्ही जीवन गुंतवून ठेवलं, अशी प्रतिज्ञा घ्यावी, अशी मी विनंती करतो." असेही ते म्हणाले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image002W5H4.jpg

"ग्रामविकास ही काही सैद्धान्तिक गोष्ट नव्हे. जेव्हा ग्रामविकासाप्रती समर्पित असणारे लोक वचनबद्ध राहून खेड्यांसाठी काम करतात, तेव्हाच तो घडून येऊ शकतो." अशी जाणीवही त्यांनी करून दिली. "आधुनिक काळात ग्रामविकास करावयाचा असेल तर, त्याचे रूपांतर करून ती संकल्पना प्रत्यक्ष जमिनीवर उतरून साकारली पाहिजे. सरदार पटेल आणि त्रिभुवनभाई यांच्या या पवित्र भूमीत 'ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणंद' (IRMA)  ने ती संकल्पना पूर्णपणे जमिनीपर्यंत आणून तळागाळात रुजवली आहे, याची मला खात्री आहे." असेही ते म्हणाले.

"आज येथे 251 तरुणांना शिक्षणविषयक पदव्या प्रदान केल्या गेल्या. मात्र जी व्यक्ती 'स्व' कडून 'पर'च्या दिशेने प्रवास करते आणि स्वतःच्या जागी इतरांना ठेवून विचार करू शकते, तीच ज्ञानी होय." असेही शाह म्हणले.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image003911B.jpg

डॉ. वर्गीस कुरियन यांच्या आठवणी शाह यांनी जागवल्या. कुरियन यांनी ग्रामस्थांच्या शाश्वत, परिस्थितीला अनुकूल, समानशील, अशा सामाजिक-आर्थिक विकासाची संकल्पना मनात धरून ही संस्था स्थापन केली. आणि येथून स्नातक होऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात हे उद्दिष्ट, हे मूल्य सदोदित असले पाहिजे, अशी अपेक्षाही शाह यांनी व्यक्त केली. "तुम्हाला आयुष्यात जेव्हा जेव्हा काही मिळेल, तेव्हा तेव्हा त्याची परतफेड करण्याचेही उद्दिष्ट मनात बाळगा" असा सल्लाही त्यांनी दिला.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image004A0I1.jpg

"भारताचा आत्मा खेड्यात राहतो. म्हणून जर भारताला समृद्ध, स्वस्थ व स्वयंपूर्ण करायचे असेल तर आधी खेड्यांना समृद्ध, स्वस्थ व स्वयंपूर्ण केले पाहिजे, असे गांधीजी म्हणत. आणि 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेमके याच दिशेने प्रयत्न सुरु केले. ते पंतप्रधान झाल्यापासून ते काम प्रत्यक्षात होऊ लागले आहे. मोदीजींनी देशाला आणि जगाला ग्रामविकासाची एक नवी दृष्टी दिली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने गेल्या आठ वर्षांत व्यक्तीच्या, गावाच्या आणि प्रदेशाच्या विकासासाठी अनेक गोष्टी केल्या आहेत. पूर्वी 60 कोटी लोकांचे बँकेत खातेही नव्हते आणि ते अर्थव्यवस्थेशी जोडलेही गेले नव्हते. आज मात्र गेल्या आठ वर्षांत केलेल्या प्रयत्नांमुळे बँकेत खाते नसलेले असे एकही कुटुंब नसेल." असे शाह यांनी सांगितले. "पूर्वांचलच्या अनेक कुटुंबांना स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही वीजदेखील मिळालेली नव्हती. प्रत्येक घराला वीजपुरवठा करण्याचे काम पंतप्रधा मोदी यांनी सुरु केले. प्रत्येक घरात शौचालय असण्याची किमान गरजही पूर्वी भागत नसे. नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता अभियान सुरु केले आणि आज प्रत्येक घरात शौचालय आहे. प्रत्येक घरी फ्ल्युओराइडविरहित शुद्ध पाणी नळाने पोहोचवण्यासाठी व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मोदीप्रणीत सरकारने प्रत्येक गरीब घराला स्वयंपाकाचा गॅसही उपलब्ध करून दिला आहे. याबरोबरच, केंद्र सरकारने प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 60 कोटी गरिबांना आरोग्यकार्डे देऊन 5 लाखांपर्यंच्या आरोग्यसुविधा पुरवल्या आहेत. जीवन स्वास्थ्यपूर्ण करण्यासाठी आणि जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी मोदीप्रणीत सरकरने अनेक प्रयत्न केले आहेत.

"प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेला मोठा निधी उपलब्ध करून दिल्यामुळे गावे जोडणे शक्य झाले आहे आणि त्यामुळे तेथे आर्थिक व्यवसाय सुरु झाले आहेत. पूर्वी गावांना वीजजोडण्या दिलेल्या नसत, त्यामुळे गावातील लोक शहरांकडे स्थलांतरित होत. परंतु आज मोदीप्रणीत सरकारने प्रत्येक खेडेगावला वीज पुरवली असून त्यामुळे गावेही स्वयंपूर्ण होण्याकडे वाटचाल करू शकत आहेत", असेही सहकारमंत्री शाह म्हणाले.

"गांधीजींनंतर खादीचा विसरच पडला होता, परंतु आता पंतप्रधानांनी प्राधान्य दिल्यामुळे खाडी ग्रामोद्योगाची उलाढाल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. शेतीला स्वयंपूर्ण केल्याखेरीज गावांचा संपूर्ण विकास शक्य नाही. हे लक्षात घेऊन त्या दिशेने प्रयत्न सुरु आहेत. शेतकऱ्यांना कर्जे घ्यावी लागणार नाहीत, याचीही काळजी मोदीजींनी घेतली आहे. 75 टक्के शेतकऱ्यांकडे दोन एकरांपेक्षाही कमी जमीन आहे आणि दोन एकर जमीन कसण्याचा-पिकवण्याचा किमान खर्च सहा ते सात हजाराच्या घरात जातो. हे लक्षात घेऊन मोदीजींनी एक व्यवस्था बसवली. त्याद्वारे प्रत्येक शेतकऱ्यास दरवर्षी 6,000 रुपये वितरित केले जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना कर्जबाजारी व्हावे लागणार नाही." असेही ते म्हणाले. "शेती स्वयंपूर्ण करण्यासाठी, शेतकरी उत्पादन वाढवतील, परंतु विपणनासाठी सहकारी संस्था हा सर्वात सोपा मार्ग आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच, पंतप्रधान मोदीजींनी सहकार मंत्रालय स्थापन केले. देशाच्या ग्रामविकासात हे मंत्रालय महत्त्वाची भूमिका निभावेल आणि वेगाने ग्रामीण विकास घडून येईल" असा विश्वासही शाह यांनी व्यक्त केला.

जिल्हा खनिज निधी स्थापन झाल्याची माहिती सहकारमंत्री शाह यांनी दिली. एखाद्या जिल्ह्यात खाणकामाच्या विकास करण्यासाठी यातून मोठी रक्कम उपलब्ध होऊ शकते. सरकारने 'CAMPA' निधी नावाची योजना सुरु केली असून, त्यातून जिल्हे हरित करण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. ग्रामविकासाचा समग्र दृष्टिकोन- व्यक्तिविकास, ग्रामविकास, प्रादेशिक विकास- प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार प्रयत्न करत आहे.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/image005LO8H.jpg

पंतप्रधानांनी देशासमोर 'आत्मनिर्भर भारताचा' दृष्टिकोन मांडला आहे आणि आत्मनिर्भर गावांची संख्या वाढेल तेव्हाच अशा आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होईल. आणि जर गाव आत्मनिर्भर करायचे असेल, तर त्यासाठी ग्रामविकास अत्यावश्यक आहे." असेही शाह यांनी सांगितले.

सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी 'ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणंद' (IRMA)  ने अधिक योगदान द्यावे, अशी अपेक्षाही केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केली. "सहकार हा सर्वसमावेशक असतो, मात्र सहकारी संस्थांना अधिक समावेशक, पारदर्शक, आधुनिक आणि तंत्रज्ञानयुक्त करण्याची गरज आहे. सहकारी संस्थांच्या माध्यमातून व्यक्ती स्वावलंबी आणि गावे स्वयंपूर्ण झाली पाहिजेत" अशी अपेक्षा व्यक्त करत, " 'ग्रामीण व्यवस्थापन संस्था, आणंद' (IRMA)  सारख्या संस्था अधिक हातभार लावतील तेव्हाच हे शक्य होईल" अशी पुस्तीही  शाह यांनी जोडली.

***

VS/J.Waishampayan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833356) Visitor Counter : 223