सांस्कृतिक मंत्रालय

मंगोलियाच्या 14 जून, 2022 रोजी होणाऱ्या बुद्धपौर्णिमा उत्सवानिमित्त भगवान बुद्ध यांचे पवित्र अवशेष भारतातून मंगोलिया  इथे 11 दिवसांच्या प्रदर्शनासाठी नेले जाणार


किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यीय शिष्टमंडळही या पवित्र अवशेषांसोबत मंगोलियाचा दौरा  करणार

Posted On: 11 JUN 2022 9:51PM by PIB Mumbai

 

मंगोलियाच्या नागरिकांसाठी एक विशेष मैत्रीभाव म्हणून, येत्या 14 जून, 2022 रोजी असणाऱ्या मंगोलियन बुद्धपौर्णिमेच्या उत्सवकाळात 11 दिवस चालणाऱ्या प्रदर्शनात ठेवण्यासाठी, भगवान बुद्ध यांचे चार पवित्र अवशेष, भारतातून मंगोलिया इथे नेले जाणार आहेत. केंद्रीय विधी आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांच्या नेतृत्वाखालील 25 सदस्यीय प्रतिनिधीमंडळ हे अवशेष घेऊन  मंगोलिया दौऱ्यावर जाणार आहे. तिथल्या गंदान बुद्धविहाराच्या परिसरात असलेल्या बातसागन मंदिरांत हे अवशेष ठेवले जातील. बिहारमधील कपिलवस्तूह्या प्राचीन शहरात, 1898 साली पहिल्यांदा आढळलेले भगवान बुद्धांचे हे अवशेष  कपिलवस्तू अवशेष म्हणून ओळखले जात असून, ते सध्या राष्ट्रीय वस्तू संग्रहालयात ठेवले आहेत. 

यासंदर्भात आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलतांना किरेन रिजिजू म्हणाले, की  भारत- मंगोलिया यांच्यातील संबंधाचा हा नवा ऐतिहासिक टप्पा आहे. यामुळे, दोन्ही देशातील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 साली, मंगोलियाला भेट दिली होती, याचे स्मरण करत किरेन रिजिजू म्हणाले की, नरेंद्र मोदी हे , मंगोलियाचा दौरा करणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान होते. आता भगवान बुद्धांचे पवित्र अवशेष मंगोलियाला नेणे हा, दोन्ही देशांमधील प्राचीन सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संबंध पुरुज्जीवित करण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीनुसार आखलेला कार्यक्रम आहे, असेही ते म्हणाले.

भारत आणि मंगोलियामधील सामाईक इतिहास-संस्कृतीमध्ये हे दोन्ही देश एकमेकांकडे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक शेजारी म्हणून बघतात, असे सांगत, भारत आणि मंगोलिया यांच्यात सामाईक सीमा नसल्या तरी मंगोलियाला आपण दूरस्थ शेजारीअसे म्हणू शकतो, असेही ते म्हणाले.

या अवशेषांना राष्ट्रीय अतिथी असा दर्जा दिला जाईल आणि सध्या राष्ट्रीय संग्रहालयात ते ज्या तापमानात ठेवलेले असतात, त्याच नियंत्रित तापमानात तिथेही ठेवले जातील. हे पवित्र अवशेष वाहून नेण्यासाठी  भारतीय हवाईदलाने विशेष विमान C-17 ग्लोब मास्टर उपलब्ध करून दिले आहे.

मंगोलियाचे सांस्कृतिक कार्यमंत्री मंगोलियाच्या वतीने ह्या अवशेषांचे स्वागत करतील; मंगोलियाच्या राष्ट्रपतींचे सल्लागार आणि इतर मान्यवरांसह मोठ्या संख्येने भिक्षू यावेळी उपस्थित राहतील. भारतातील अवशेषांसह मंगोलियामध्ये उपलब्ध भगवान बुद्धांचे अवशेष देखील ह्या प्रदर्शनात ठेवले जातील. दोन्ही अवशेषांसाठी दोन बुलेट प्रूफ केसिंग तसेच दोन पेट्या भारतीय शिष्टमंडळ घेऊन जाणार आहेत.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1833207) Visitor Counter : 155