युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

बालपणातील दम्यालाही हरवून महाराष्ट्राची धावपटू सुदेष्णाने केली सोनेरी हॅटट्रिक

Posted On: 10 JUN 2022 9:35PM by PIB Mumbai

 

पोडियमजवळ हणमंत शिवणकर स्तब्धपणे उभे होते. त्यांचे मन मात्र काही वर्षे मागे धावत त्या दिवसापर्यंत गेले. काही वर्षांपूर्वी त्याच दिवशी त्यांची मुलगी सुदेष्णा धावण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्यांना न सांगताच  घरातून गुपचुप निघून गेली होती होती.

खेलो इंडिया युथ गेम्सच्या पारितोषिक वितरण समारंभात मुलगी सुदेष्णाला आनंदात पाहून काही काळ त्यांच्या शरीरात एक भीतीची लहर उमटल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांनी तसे का म्हटले याचा भावनिक स्वरात त्यांनीच खुलासा केला .बाल वयातच सुदेष्णाला दमा असल्याचे निदान झाले होते आणि आम्ही तिच्या फुफ्फुसांना आणि श्वासनलिकांना त्रास होऊ नये म्हणून तिला धूर आणि धुळीपासून दूर ठेवण्यासाठी सर्व काही केले. शाळेत असताना तिच्या पीटी टीचरने ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी तिला नेता यावे यासाठी संमती मागण्यासाठी मला फोन केला होता. मी स्पष्टपणे नकार दिला होता. माझ्या परवानगीशिवाय त्यांनी तिला स्पर्धेला नेले. मला कुठून तरी त्यांच्या दौऱ्याविषयी कळले तेव्ही मी तिला थांबवण्यासाठी तिकडे धाव घेतली खरी पण तोपर्यंत तिने स्पर्धा जिंकली होती. विशेष म्हणजे, तिने ॲथलेटिक्स प्रशिक्षक आणि तत्कालीन तालुका क्रीडा अधिकारी बळवंत बाबर यांचे लक्ष वेधून घेतले होते.

लक्षवेधी हॅटट्रिक

आज इतक्या वर्षांनंतर, महाराष्ट्राची सुदेष्णा केवळ खेलो इंडिया युथ गेम्समधील सर्वात वेगवान महिला ठरली नाही तर तिने ट्रॅक आणि फील्डमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. स्प्रिंटमध्ये 100 मीटर, 200 मीटर आणि 4x100 मीटर सुवर्णपदक जिंकत लक्षवेधी हॅट्ट्रिक पूर्ण केली.

ती वडलांनी सांगितलेली आठवण जागवताना सुदेष्णा आनंदित आवाजात म्हणाली,, सुदैवाने माझे आईवडील त्या दिवशी साताऱ्यापासून २० किमी अंतरावर असलेल्या खर्शी येथे आमच्या मूळ गावी होते. अर्थातच, त्या दिवसापासून, त्यांनी मला आवश्यक असलेली सगळी मदत केली आहे,"

तिच्या पीटी शिक्षकाने तिला स्प्रिंटिंगसाठी कसे निवडले याचा खुलासा करताना सुदेष्णाने सांगितले, ती शाळेत मुलींसोबत खो-खो खेळायची. हे तिच्या पालकांना माहीतच नव्हते. खो खो खेळतानाचा तिचा वेग शिक्षकांच्या नजरेत भरला आणि त्यांनी  तिची निवड धावण्यासाठी केली. त्या दिवसांत, मला दम्याचा झटका आला असता तर मी विश्रांती घेतली असती आणि थोड्या वेळाने खेळायला सुरुवात केली असती पण तशी वेळ आली नाही, कारण मला कधीच त्रास झाला नाही,

नियमित प्रशिक्षण आणि वाढत्या वयानुसार तिची प्रकृती सुधारत गेली.

सुदेष्णाची वेगवान धाव

सुदेष्णाने दोन वर्षांनंतर भोपाळमधील शालेय मुलांसाठीच्या राष्ट्रीय स्पर्धेत 4x100 रिले संघाच्या राखीव यादीत स्थान मिळवून ट्रॅकवर छाप पाडायला सुरुवात केली.एका वर्षानंतर ती पुणे खेलो इंडिया युथ गेम्ससाठी पात्र ठरली आणि 17 वर्षांखालील 100 मीटरमध्ये तिने सुवर्णपदक जिंकले. पुण्यातील स्पर्धेने तिला मातीच्या ट्रॅकवर आणि सिंथेटिक ट्रॅकवर धावणे यातील फरकही शिकवला, कारण तोपर्यंत तिने साताऱ्यात घराच्या आसपासच्या मातीतच प्रशिक्षण घेतले होते. सर्वात जवळचा सिंथेटिक ट्रॅक कोल्हापुरात होता जो सुमारे 120 किलोमीटर दूर होता. महिन्यातून एकदा तरी प्रशिक्षणासाठी कोल्हापुरात जाण्याचा प्रयत्न ती आणि प्रशिक्षक बाबर यांनी करून पाहिला खरा पण हेही नेहमी शक्य नव्हते. त्यामुळे प्रशिक्षक बाबर यांनी रणनीती बदलली.

माझ्या प्रशिक्षकाने सिंथेटिक ट्रॅकसाठी आवश्यक असलेले तंत्र शिकवायला सुरुवात केली. पुढे झुकणे आणि गुडघा चांगला उचलणे या कृत्रिम ट्रॅकसाठा आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत  त्यांनी यावर खूप काम केले आहे आणि त्याचे परिणाम आता समोर येत आहेत, तिने सांगितले.

 

जागतिक स्पर्धेच्या पात्रतेची हुलकावणी

1 ऑगस्टपासून कॅली, कोलंबिया येथे U20 वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठीचा पात्रता कालावधी आपण गुजरातमध्ये नडियाद येथे झालेल्या राष्ट्रीय फेडरेशन कप ज्युनियर्समध्ये) आपण पूर्ण करू अशी आशा तिला होती, परंतु उष्ण हवामानामुळे ती सर्वोत्तम कामगिरी करू शकली नाही आणि ती पात्रता गुण गाठण्यात अयशस्वी ठरली. 100 मीटर आणि 200 मीटर या दोन्ही शर्यतींमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिली. पण इथे येईपर्यंत मी उष्णतेशी जुळवून घेतले होते. तसेच, येथील निळा ट्रॅक लाल ट्रॅकपेक्षा थोडा वेगवान आहे. मला येथे मात्र चांगली कामगिरी करू असा विश्वास होता, असे ती म्हणाली.

 

पात्रतेच्या अपेक्षा कायम

सुदेष्णाने पंचकुलातील स्प्रिंट स्पर्धांमध्ये केवळ वर्चस्व गाजवले नाही, तर तिची वेळ - 100 मीटरमध्ये 11.79 सेकंद आणि 200 मीटरमध्ये 24.29 सेकंद म्हणजे जागतिक U20 चॅम्पियनशिपसाठी अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने निर्धारित केलेल्या पात्रता मानकांपेक्षा चांगली होती. तिने आता विश्व U20 निवडीसाठी तिच्या या कामगिरीचा विचार करावा अशी विनंती AFI- ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाकडे केली आहे. ती पुढील महिन्यात कॅलीला जाणार्‍या फ्लाइटमध्ये असेल अशी आशा आहे आणि तसे झाले तर आपल्या मुलीला दमा आहे तरी तिचे धावणे थांबवले नाही याचा हणमंत शिवणकर यांना मनापासून आनंद होईल यात शंका नाही.

***

S.Patil/P.Jambhekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1833048) Visitor Counter : 214


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu