शिक्षण मंत्रालय
उच्चशिक्षण संस्थांनी भविष्यासाठी सज्ज अशी कार्यशक्ती घडवण्यासाठी अधिकाधिक वेगाने व अधिकाधिक जोमाने प्रयत्न करण्याचे धर्मेंद्र प्रधान यांचे आवाहन
विद्यार्थ्यांना भावी उद्योजक म्हणून घडवावे- धर्मेंद्र प्रधान
दोन दिवसीय 'अभ्यागत परिषदेचा' समारोप
Posted On:
08 JUN 2022 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जून 2022
केंद्रीय विद्यापीठांचे कुलगुरू आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांचे संचालक यांच्या दोन दिवसीय परिषदेचा आज समारोप झाला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 7 जून 2022 रोजी राष्ट्रपती भवन येथे सदर परिषदेचे उद्घाटन केले होते.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार, पंतप्रधानांचे सल्लागार अमित खरे, उच्चशिक्षण सचिव संजय मूर्ती, यांच्यासह विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, राष्ट्रीय व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष, केंद्रीय विद्यापीठांचे तसेच राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थांचे प्रमुख, शिक्षण मंत्रालयातील तसेच राष्ट्रपती सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी- या परिषदेसाठी उपस्थित होते.
या 'अभ्यागत परिषदेत' सहभागी झाल्याबद्दल व परिषदेला मार्गदर्शन केल्याबद्दल धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात राष्ट्रपतींप्रती कृतज्ञता व्यक्त केली. "हळूहळू होत जाणाऱ्या परिवर्तनाचे युग आता समाप्त झाले आहे हे लक्षात घेऊन उच्चशिक्षण संस्थांनी भविष्यासाठी सज्ज अशी कार्यशक्ती घडवण्यासाठी अधिकाधिक वेगाने व अधिकाधिक जोमाने प्रयत्न केले पाहिजेत" असे आवाहन धर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी केले. नव्या युगात तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या संधी आणि समोर आणलेली आव्हाने यांविषयी प्रधान यांनी आपले विचार मांडले. भारताने यूपीआय, थेट लाभ हस्तांतरण, आधार अशा विविध प्रकल्पांद्वारे आपले तंत्रज्ञानविषयक प्रावीण्य दाखवून दिले आहे असे सांगत, ही शक्ती आणखी वाढवून भविष्यासाठी सुसज्ज अशी कार्यशक्ती घडवली पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. चौथ्या औद्योगिक क्रांतीमुळे घडून येणारे परिवर्तन अंगिकारण्यासाठी अशी कार्यशक्तीच सक्षम असेल, असेही ते म्हणाले.
उद्योजकतेबद्दल बोलताना त्यांनी देशातील युनिकॉर्न उद्योगांच्या वाढत्या संख्येबद्दल समाधान व्यक्त करत, उद्योजकांना अनुकूल आणि समृद्ध अशी परिसंस्था देशात अस्तित्वात असल्याचेच ते द्योतक आहे, असे मत व्यक्त केले. 'विद्यार्थ्यांना नोकरी शोधण्याच्या दृष्टिकोनातून मोठे करण्यापेक्षा, नोकऱ्या निर्माण करून लोकांना नोकऱ्या देण्याचे काम करण्याच्या दृष्टिकोनातून घडवा', असे ते म्हणाले.
डिजिटल शिक्षणाच्या क्षेत्रात सरकारने सुरु केलेल्या विविध उपक्रमांची माहिती प्रधान यांनी यावेळी दिली. शिक्षणाला वसाहतवादाच्या प्रभावातून बाहेर काढण्याचे काम पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. माजी विद्यार्थ्यांचे नेटवर्क बळकट करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. भारतातील शिक्षणाला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी होत असलेले प्रयत्न आणि 'भारतात येऊन शिका (स्टडी इन इंडिया') सारखे उपक्रम यांमध्ये माजी विद्यार्थ्यांना सामावून घेण्याबद्दलही ते बोलले.
या परिषदेच्या निरनिराळ्या सत्रांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. उच्चशिक्षण संस्थांची आंतरराष्ट्रीय क्रमवारी; शिक्षणक्षेत्र-उद्योगक्षेत्र आणि धोरणकर्ते यांमधील सहयोग; शालेय, उच्च आणि व्यावसायिक शिक्षणाचे एकात्मीकरण; उदयोन्मुख आणि अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत शिक्षण आणि संशोधन- आदी विषयांचा त्यामध्ये अंतर्भाव होता.
राष्ट्रपती हे 161 केंद्रीय उच्चशिक्षण संस्थांचे अभ्यागत आहेत. या 161 संस्थांपैकी 53 संस्था सदर परिषदेला प्रत्यक्ष उपस्थित होत्या, तर उर्वरित संस्था दूरदृश्य माध्यमातून सहभागी झाल्या होत्या.
* * *
R.Aghor/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1832304)
Visitor Counter : 165