उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

उपराष्ट्रपतींच्या गबॉन, सेनेगल आणि कतार या तीन देशांच्या दौऱ्यास झाला प्रारंभ


भारताच्या उपराष्ट्रपतींनी गबॉन आणि सेनेगल या देशांना दिलेली ही पहिलीच उच्चस्तरीय भेट आहे

राजनैतिक संबंधांच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी उपराष्ट्रपती कतारला देणार भेट

Posted On: 30 MAY 2022 3:49PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 30 मे 2022

 

उपराष्ट्रपती, एम. व्यंकय्या नायडू यांच्या  दिनांक 30 मे ते 7 जून 2022 या कालावधीतील गबॉन, सेनेगल आणि कतार या तीन देशांच्या दौऱ्याला आजपासून आरंभ झाला आहे. त्यांच्यासोबत आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार, सुशील कुमार मोदी (राज्यसभा), विजय पाल सिंह तोमर (राज्यसभा) आणि पी. रवींद्रनाथ (लोकसभा) या तीन खासदारांसह,एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ आहे.या दौऱ्यात अनेक द्विपक्षीय करार साध्य होतील, अशी अपेक्षा आहे.

उपराष्ट्रपती नायडू हे या तीनही देशांना भेट देणारे,भारताचे पहिलेच उपराष्ट्रपती आहेत, तर ही भेट गबॉन आणि सेनेगल देशांमधील भारताची पहिलीच उच्चस्तरीय भेट आहे.  त्यांच्या या भेटीमुळे भारताच्या आफ्रिकेसोबतच्या संबंधांना गती मिळेल आणि आफ्रिकन खंडाशी भारताच्या असलेल्या वचनबद्धतेत  अधिक भर पडेल अशी अपेक्षा आहे.

भारत आणि कतार हे  दोन्ही देश आपल्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 50 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत, म्हणून उपराष्ट्रपतींच्या कतार भेटीलाही महत्त्व प्राप्त झाले आहे.या भेटीमुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत होण्याची अपेक्षा आहे.

उपराष्ट्रपती 30 मे ते 01 जून 2022 या कालावधीत गबॉन देशाला भेट देऊन आपल्या दौऱ्याचा आरंभ करतील. गबॉनमध्ये ते गबॉनचे पंतप्रधान महामहीम रोझ क्रिस्टियान ओसोका रॅपोंडा, यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील, तसेच गबॉनचे राष्ट्रपती अली बोंगो ओंडिंबा आणि इतर मान्यवरांची भेट घेतील. गबॉन मधील आपल्या दौऱ्यादरम्यान व्यापारी समुदायाशीही उपराष्ट्रपती संवाद साधतील आणि तेथील परदेशस्थ भारतीयांना संबोधित करतील,अशी अपेक्षा आहे.

1 ते 3 जून या कालावधीत सेनेगलला भेट देऊन श्री नायडू सेनेगलचे राष्ट्रपती महामहीम. मॅकी सॅल,यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा करतील, तसेच तेथील नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष महामहीम मुस्तफा नियासे आणि इतर मान्यवर यांची भेट घेतील. भारत आणि सेनेगल या वर्षी राजनैतिक संबंधांच्या स्थापनेचा 60 वा वर्धापन दिन साजरा करत आहेत,ही अतिशय  उल्लेखनीय बाब आहे. उपराष्ट्रपती येथे एका व्यावसायिक गोलमेज बैठकीला उपस्थित रहाणार आहेत आणि तेथील भारतीय समुदायालाही ते संबोधित करतील अशी अपेक्षा आहे.

या दौऱ्याच्या शेवटचा टप्प्यात  4-7 जून 2022 या कालावधीत राष्ट्रपती कतारचा दौरा करणार आहेत. या भेटीदरम्यान, श्री नायडू कतारचे उपअमिर, महामहिम शेख अब्दुल्ला बिन हमाद अल थानी यांच्याशी शिष्टमंडळ-स्तरावर चर्चा करतील आणि द्विपक्षीय सहकार्याचा आढावा घेतील.या भेटीदरम्यान ते कतारमधील इतर अनेक मान्यवरांचीही भेट घेतील आणि कतारमधील एका व्यावसायिक गोलमेज परिषदेला संबोधित करतील.  गेल्या दोन वर्षांत विविध भारतीय कंपन्यांमध्ये कतारने 2 अब्ज  अमेरिकन डाॅलर्स इतकी गुंतवणुक करण्याचे अभिवचन दिले आहे,ही अत्यंत उल्लेखनीय बाब आहे.

अखेरच्या दिवशी, उपराष्ट्रपतींच्या भेटीनिमित्त सामुदायिक स्वागत समारंभ आयोजित केला जाणार आहे, ज्यावेळी ते कतारमधील भारतीय समुदायाला संबोधित करतील.भारत आणि कतार येथील लोकांचा संपर्क  ऐतिहासिक आहे, सध्या कतारमध्ये अंदाजे 750,000 भारतीय वास्तव्यास  आहेत.

 

 

 

 

Jaydevi PS/S.Patgaonkar/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1829432) Visitor Counter : 204