संसदीय कामकाज मंत्रालय
संसदीय व्यवहार मंत्रालय साजरा करणार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (एकेएएम) सप्ताह (30.05.2022 ते 05.06.2022)
Posted On:
29 MAY 2022 7:55PM by PIB Mumbai
स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करण्यासाठी आणि त्याचे स्मरण करण्यासाठी तसेच भारताने अमृत काळात प्रवेश केल्याबद्दल संसदीय व्यवहार मंत्रालय 30.05.2022 ते 05.06.2022 या दिवसांमध्ये स्वातंत्र्याचा भव्य अमृत महोत्सव सप्ताह साजरा करणार आहे. या प्रतिष्ठेच्या आठवडाभराच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून, मंत्रालय ‘ध्वनी-चित्रफीत- युवा संसदेचा प्रशिक्षण वर्ग’ याला व्यापक प्रसिद्धी देत आहे. आपल्या लोकशाहीची मुळे बळकट करून विद्यार्थ्यांना संसदीय कार्यपद्धती आणि कामकाजाशी ओळख करून देण्याच्या दृष्टीने भिन्न विचारांबद्दल सहिष्णुतेला प्रोत्साहन देणे, वादविवाद आणि चर्चेतून प्रश्न सोडवणे यासारख्या युवा संसदेच्या उदात्त विचारांचे प्रदर्शन करणे हा या प्रशिक्षण वर्गांचा उद्देश आहे. हा प्रशिक्षण वर्ग स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा संदेश देखील देतो.
या ध्वनी-चित्रफीतीला जास्तीतजास्त प्रेक्षक मिळावेत यासाठी त्याचे प्रसारण संसद टीव्हीवर पुढील वेळापत्रकानुसार होईल:
प्रथम प्रसारण- सकाळी 10 वाजता- 30.05.2022
पहिले पुनःप्रसारण: दुपारी 2 वाजता- 02.06.2022
दुसरे पुनःप्रसारण: संध्याकाळी 6 वाजता- 05.06.2022
प्रशिक्षण वर्गाची ध्वनी-चित्रफीत मंत्रालयाच्या ‘नॅशनल युथ पार्लमेंट स्कीम ( एनवायपीएस)’ या युट्यूब मंचावर देखील https://youtu.be/ut32HqVbHeg . या लिंकवर प्रसारित होईल. त्याशिवाय महोत्सवाच्या आठवड्यात काही शाळांनी त्यांच्या युवा संसदेचे आयोजन केले आहे.
विधिमंडळाचे संपूर्ण कामकाज कागद विरहित घडवून आणण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेला राष्ट्रीय ई-विधान अॅप्लिकेशन (नेवा) अभियान प्रकल्प या अमृत काळात राबवला जाणार आहे. ‘एक राष्ट्र-एक अॅप्लिकेशन’ या तत्त्वावर विकसित करण्यात आलेल्या ‘नेवा’ च्या मदतीने सर्व सरकारी विभागांशी संवाद साधण्यासह विधीमंडळामधील सर्व सरकारी कामकाज एकाच मंचावर डिजिटल माध्यमातून करता येईल. नेवा https://www.neva.gov.in लिंकच्या मदतीने वापरता येईल तसेच त्याचे मोबाईल अॅप प्ले स्टोर वर मोफत उपलब्ध आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त साजऱ्या होणाऱ्या सप्ताहात क्षमता विकास उपाययोजना म्हणून संसदीय व्यवहार मंत्रालयामधील सीपीएमयु, नेवा द्वारे विधीमंडळाच्या अधिकाऱ्यांसाठी 2 आणि 3 जून रोजी दृकश्राव्य माध्यमातून दोन दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले जाईल. या प्रशिक्षण वर्गामध्ये सहभागी होण्यासाठीची लिंक पोर्टल आणि मोबाईल अॅपवर देखील उपलब्ध असेल.
***
G.Chippalkatti/R.Agashe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829263)
Visitor Counter : 251