सहकार मंत्रालय
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज त्यांच्या गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गोध्रा इथल्या पंचामृत डेअरी येथे विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले
Posted On:
29 MAY 2022 6:03PM by PIB Mumbai
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी त्यांच्या गुजरात दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी, गोध्रा इथल्या पंचामृत डेअरी येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आणि लोकार्पण केले. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पीडीसी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन, 3 मोबाईल एटीएम व्हॅन, 250 चौरस मीटरमध्ये बांधण्यात आलेल्या 30 घनमीटर प्रति तास क्षमतेचे ऑक्सिजन संयंत्रचे उदघाटन केले, तसेच मालेगाव (महाराष्ट्र) येथे पंचामृत बटर कोल्ड स्टोरेज आणि डेअरी प्रकल्पाचे लोकार्पण केले. उज्जैन (मध्य प्रदेश) येथे नव्याने स्थापन झालेल्या डेअरी प्रकल्पाची पायाभरणी केली. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या भाषणात अमित शहा म्हणाले की, आजचे पाच कार्यक्रम तीन जिल्ह्यांमधील (पंचमहाल, मालेगाव आणि उज्जैन) सहकार चळवळ अधिक बळकट करणार आहेत. आज पंचमहाल, महिसागर आणि दाहोद जिल्ह्यांतील 1,598 दूध बाजार सुमारे 73 हजार लिटर दूध उत्पादन करणारी एक मजबूत संघटना आपल्यासमोर आहेत. 18 लाख लिटर दूध आणि 300 कोटी रुपयांची उलाढाल हे खूप मोठे यश आहे.
केंद्रीय सहकार मंत्री म्हणाले की, सहकार चळवळीला आवश्यक ती मदत मिळावी, अशी सहकार चळवळीशी संबंधित देशभरातील लोकांची वर्षानुवर्षे मागणी होती आणि त्यासाठी जनतेने मागील सरकारकडे वारंवार मागणी केली मात्र ती पूर्ण झाली नाही. आज मला सांगायला अभिमान वाटतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक वर्षापूर्वी सहकार चळवळीसाठी केंद्रात सहकार मंत्रालयाची स्थापना करून त्याला प्राधान्य दिले. त्याचबरोबर पंतप्रधानांनी सहकार क्षेत्रासाठी तरतुदीत सात पट वाढ केली. याशिवाय साखरेच्या दरवाढीचा फायदा सहकारी साखर कारखानदारांना मिळावा यासाठी पंतप्रधान मोदींनी त्यावरील कर रद्द केला. सर्व सहकारी संस्थांवर मॅट कर (MAT) 18 टक्के होता, मोदी यांनी सहकारी संस्थांच्या फायद्यासाठी कंपन्यांइतका तो कमी केला आहे. मोदींनी अधिभार 12 वरून 7 टक्के केला. भारत सरकार देशभरातील सर्व मंडई नाबार्डशी थेट जोडण्याचा कार्यक्रम राबवत आहे आणि यासाठी 6,500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
अमित शहा म्हणाले की, अमूलबाबत जेव्हा-जेव्हा बोलले जाते , तेव्हा देश-विदेशातील लोकांचे डोळे चमकतात. 60 हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या इतक्या विशाल सहकार चळवळीची कल्पना करणे कठीण आहे. आज सहकार मंत्री या नात्याने मला सांगावेसे वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालयाची स्थापना केली आणि येत्या पाच वर्षात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रात मोठी क्रांती घडून येईल. अनेक नवीन क्षेत्रे जोडली जाणार आहेत , त्यांचा डेटाबेस बनवणे, त्यासाठी प्रशिक्षणाची व्यवस्था केली जात आहे. पीएसीची संख्या तिप्पट करण्यासाठी आम्ही कायदेशीर सुधारणांचाही विचार करत आहोत.
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की, मोदींनी नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन दिले आहे आणि गायीच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काम केले आहे. नैसर्गिक शेतीमुळे सेंद्रिय उत्पादनांच्या किमती तर वाढतीलच, उत्पादनही वाढेल. नुकतेच अमूलने नैसर्गिक शेतीतून तयार होणारे सेंद्रिय गव्हाचे पीठ बाजारात आणले असून लवकरच भाजीपाला ठेवणार आहेत . अमूलने एका वर्षाच्या आत जमीन आणि सेंद्रिय उत्पादनांची गुणवत्ता प्रमाणित करण्यासाठी 100 हून अधिक जिल्ह्यांमध्ये प्रयोगशाळा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मोदी यांनी अधिक दूध देणाऱ्या आपल्या देशी गायी आणि म्हशींचे संरक्षण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. नरेंद्र मोदी यांनी असे अनेक उपक्रम घेतले आहेत.
शहा म्हणाले की, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ओबीसी जातींसाठी अनेक सुधारणा केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांनी मागासवर्ग आयोगाला घटनात्मक मान्यता दिली आहे. ओबीसींना वैद्यकीय जागांमध्ये केंद्रीय कोट्यात आतापर्यन्त आरक्षण नव्हते, ते आता देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गीयांच्या प्रगतीसाठी काम केले आहे. दलित, ओबीसी आणि आदिवासींना घर, स्वयंपाकाचा गॅस, वीज, शौचालय, पाच लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा अशा अनेक कल्याणकारी योजनांचा सर्वाधिक लाभ मिळाला आहे.
***
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829234)
Visitor Counter : 173