शिक्षण मंत्रालय
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा 21 व्या शतकातील ज्ञानाचा दस्तावेज आहे - धर्मेंद्र प्रधान
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवरील गोलमेज बैठकीला धर्मेंद्र प्रधान उपस्थित
Posted On:
28 MAY 2022 7:24PM by PIB Mumbai
पुणे येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीवरील गोलमेज बैठकीला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रधान म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हा 21 व्या शतकातील ज्ञानाचा दस्तावेज आहे. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे हे त्याचे उद्दिष्ट असून प्रत्येकासाठी शिक्षण सुलभ बनवणे हा हेतू आहे, असे ते म्हणाले. भारत ज्ञान- आधारित अर्थव्यवस्थेचे केंद्र बनले आहे आणि जागतिक अर्थव्यवस्थेत आपले महत्त्वपूर्ण योगदान आहे असे ते म्हणाले .
नवीन जगात भारताचे योग्य स्थान सुनिश्चित करण्यात आपले शिक्षण क्षेत्र मोठी भूमिका बजावु शकते यावर त्यांनी भर दिला. तंत्रज्ञानाची सार्वत्रिकता आणि डिजिटल अर्थव्यवस्थेने जगाला एक छोटेसे गाव बनवले आहे. आज आपण उदयोन्मुख नवीन जागतिक व्यवस्थेच्या वळणावर उभे आहोत. तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरणाशी आपण किती सुसंवाद साधतो, नवीन कौशल्ये आत्मसात करतो यावर भविष्यासाठी सज्जता तसेच उदयोन्मुख नवीन जागतिक व्यवस्थेत नेतृत्वाची भूमिका ठरेल. येथे आपल्या सर्वांसाठी, विशेषत: आपल्या शैक्षणिक समुदायासाठी खूप मोठी संधी आहे, असेही ते म्हणाले.
आपली शिक्षणपद्धती पूर्वी फारच जड ताठर होती हे प्रधान यांनी अधोरेखित केले. बहु-शाखीय आणि सर्वांगीण शिक्षण हे एक आव्हान होते परंतु एनईपी 2020 मुळे आपले अध्यापन आणि शिक्षण प्रक्रिया अधिक सर्वसमावेशक, लवचिक आणि बहु-शाखीय बनवणे शक्य झाले असे ते म्हणाले.
प्रधान म्हणाले की, गेल्या 75 वर्षात आपण आपल्या हक्कांबाबत ठाम आणि जागरूक राहिलो आहोत आणि आता कर्तव्याच्या मार्गावर चालण्याची वेळ आली आहे. यात आपल्या शिक्षकांहून श्रेष्ठ कोणीही असू शकत नाही. कर्तव्य पालन आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यावर लक्ष केंद्रित करा, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की ऑनलाइन शिक्षण हे नवीन वास्तव आहे आणि शिक्षण क्षेत्राने नवीन शैक्षणिक गतीशीलता निर्माण केली पाहिजे तसेच दर्जेदार ई-लर्निंग सामग्री विकसित करण्यासाठी पुढे यायला हवे. ऑनलाइन शिक्षण हे केवळ शोषण करणाऱ्या बाजार शक्तींपुरते मर्यादित नसेल आणि डेटा साम्राज्यवादापासून त्याचे संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे विकसित करणे आवश्यक आहे.
एनईपी 2020 च्या धर्तीवर जागतिक नागरिक घडवण्यासाठी आणि जागतिक अपेक्षा पूर्ण करण्यासाठी, आपल्या शैक्षणिक संस्थांनी देखील हे सुनिश्चित केले पाहिजे की 'भौतिक अपेक्षांची साधने' बनण्याऐवजी त्यांनी 'ज्ञान आणि सक्षमीकरणाचे साधन' बनायला हवे , असे आवाहन प्रधान यांनी केले.
***
G.Chippalkatti/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1829010)
Visitor Counter : 185