खाण मंत्रालय

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी योग उत्सवामध्ये झाले सहभागी

Posted On: 25 MAY 2022 6:20PM by PIB Mumbai

 

आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन  जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात कार्यक्रम आयोजित करण्यात  येत आहेत. केंद्रीय कोळसा आणि खाण तसेच संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी आज शास्त्री भवन येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले.

आगामी आंतरराष्ट्रीय योग दिवस-2022 च्या पार्श्वभूमीवर खाण मंत्रालयाने आयोजित केलेल्या योग उत्सवाचा भाग म्हणून झालेल्या कार्यक्रमामध्ये कोळसा, खाण आणि संसदीय व्यवहार मंत्रालयाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सक्रीय सहभाग होता. योग नियमावलीचे पालन करत जवळजवळ 250 जणांनी यावेळी आयुष मंत्रालयाच्या मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेमधील तज्ञांनी दाखवलेल्या प्रात्यक्षिकांचे अनुकरण केले.

 

उपस्थितांना दैनंदिन जीवनात योग साधनेचा समावेश करण्यासाठी प्रोत्साहन देताना प्रल्हाद जोशी म्हणाले, समतोल जीवनासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग साधना महत्वाची आहे. योग साधनेच्या लोकप्रियतेने देशाच्या सीमा ओलांडल्या असून आज जगभरात योग स्वीकारला जात आहे.

कोळसा, खाण आणि रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब पाटील दानवे, संसदीय व्यवहार आणि सांस्कृतिक राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यावेळी उपस्थित होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या कल्पनेला संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत  2014 मध्ये  मान्यता मिळाल्यानंतर दर वर्षी 21  जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या कल्पनेला 175 देशांनी मान्यता दिली होती.

कोविड-19 महामारीमुळे आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन वर्षांच्या खंडानंतर प्रत्यक्ष साजरा होत असूनपुढील महिन्यात 21 जून रोजी कर्नाटकमध्ये  मैसूर येथे होणार्‍या सामुहिक योग प्रात्यक्षिक कार्यक्रमात  पंतप्रधान  नरेंद्र मोदी नेतृत्व  करतील.

***

N.Chitale/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1828269) Visitor Counter : 148