युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा आणि तिरंदाजी जागतिक चषक स्पर्धेच्या विजयी संघांचा सत्कार; 2024 च्या ऑलिंपिकमध्ये भारतासाठी आणखी पदके जिंकण्याचे केले आवाहन
Posted On:
24 MAY 2022 11:02PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 मे 2022
भारतीय क्रीडा विश्वासाठी आज दुहेरी आनंदाचा दिवस होता. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते कोरिया इथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत विजयी ठरलेल्या भारतीय तिरंदाजांचे आणि तुर्कस्थानमध्ये झालेल्या जागतिक महिला मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत विजयी ठरलेल्या चमूचा नवी दिल्लीत सत्कार करण्यात आला.
साई म्हणजेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर असलेल्या राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्रात हे दोन्ही सत्कार समारंभ झाले. भारताने गेल्या काही दिवसात जागतिक तिरंदाजी विश्व् चषक स्पर्धेत पाच पदके आणि महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत 3 पदके जिंकली आहेत. 16 भारतीय तिरंदाजांपैकी पुरुषांच्या कंपाऊंड म्हणजेच संयुक्त तिरंदाजी स्पर्धेत एक सुवर्णपदक, एक रौप्य पदक आणि 3 कांस्य पदके जिंकली. तर जागतिक मुष्टियुद्ध स्पर्धेत महिलांनी एक सुवर्ण आणि दोन कांस्य पदके जिंकली.
मुष्टियोद्धा निखत झरीनच्या उत्साहाचे विशेष कौतुक करत, अनुराग ठाकूर म्हणाले, “ आपल्या मुली देशाचा अभिमान आहेत. एक काळ असा होता जेव्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाओ, बेटी-पढाओ’ असं आवाहन करीत. त्यांच्या याच आवाहनाची आणि मोहिमेची फळे आज आपल्याला दिसत आहेत. निखत म्हणाली, की आता तिला थांबायचे नाही. आणखी पदके जिंकायची आहेत. आपल्याला हीच जिद्द आणि समर्पण सर्व खेळाडूंमध्ये हवी आहे. आपल्याला सतत पुढे जायचे आहे. तळागाळातल्या खेळाडूंसाठी तुम्ही सगळे प्रेरणा आहात. सरकारच्या टॉप्स (TOPS) योजनेद्वारे, सर्व खेळाडूंना सुविधा मिळतील याची काळजी घेतली जात आहे. आज आपण जे साध्य केले, त्याचा आनंद साजरा केलाच पाहिजे, पण त्यासोबतच पुढच्या अजिंक्यपद स्पर्धेत जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवा. 2024 च्या ऑलिंपिकमध्ये भारतासाठी आपण आणखी पदके जिंकूया”.
या सत्कार समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्वांनी पदक विजेत्यांचे कौतुक करावे असे आवाहन त्यांनी केले, “ ह्या सर्व खेळाडूंनी ही पदके जिंकण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आपण टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत आणि कौतुक करत, त्यांचा हा विजय देशासाठी किती महत्वाचा आहे, हे व्यक्त करूया. आपण सर्वच खेळाडुंचे कायम कौतुक करायला हवे करण हे आपल्या देशासाठी खेळत असतात.” असे म्हणत त्यांनी सर्व खेळाडूंसाठी बराच वेळ टाळ्या वाजवल्या. आणि त्यांचे अनोख्या पद्धतीने कौतुक केले.
S.Kulkarni/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1828082)
Visitor Counter : 257