पंतप्रधान कार्यालय
श्री स्वामीनारायण मंदिराने आयोजित केलेल्या युवा शिबिराला पंतप्रधानांनी केले संबोधित
दर पिढीमध्ये सातत्यपूर्ण चरित्र घडवणे हा प्रत्येक समाजाचा पाया
जिथे आव्हाने आहेत तिथे आशेचा किरण म्हणून भारत उपस्थित तर जिथे समस्या तिथे तोडगा घेऊन भारत हजर
‘आज भारत हा जगाची नवी आशा’
सॉफ्टवेअर ते अंतराळ क्षेत्रापर्यंत उगवत्या भविष्यासाठी सज्ज असलेला देश म्हणून भारत पुढे येत आहे
आपली प्रगती साध्य करूया मात्र त्याच बरोबर ती इतरांच्या कल्याणाचे माध्यमही असावी
नागालँन्ड कन्येच्या काशी घाट स्वच्छता मोहिमेचा केला उल्लेख
Posted On:
19 MAY 2022 2:43PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 मे 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वडोदरा इथल्या करेलीबाग इथे आयोजित केलेल्या ‘युवा शिबीर’ ला दुरदृष्य प्रणालीद्वारे संबोधित केले. श्री स्वामीनारायण मंदिर कुंडलधाम आणि श्री स्वामीनारायण मंदिर करेली बाग, वडोदरा यांनी या शिबिराचे आयोजन केले होते.
दर पिढीमध्ये सातत्यपूर्ण चरित्र घडवणे हा प्रत्येक समाजाचा पाया असल्याचे आपल्या शास्त्रांमध्ये म्हटले आहे असे पंतप्रधान म्हणाले. आज आयोजित केलेले शिबीर म्हणजे युवकांमध्ये उत्तम संस्कार बिंबवण्यासाठी केलेला एक प्रयत्न इतकेच नसून समाज, स्वत्व, अभिमान आणि राष्ट्र यांच्या नव्या जडणघडणीसाठीचे पवित्र आणि स्वाभाविक अभियान आहे यावर त्यांनी भर दिला.
नव भारत निर्मितीसाठी प्रयत्न आणि सामुहिक निर्धार करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. असा नव भारत ज्याची ओळख नवी असेल जो दूरदृष्टी बाळगत असेल आणि ज्याच्या परंपरा प्राचीन असतील. नवे विचार आणि प्राचीन संस्कृती या दोन्हीसह वाटचाल करतानाच हा नव भारत संपूर्ण मानव जगताला दिशा दाखवणारा असेल. जिथे आव्हाने आहेत तिथे आशेचा किरण म्हणून भारत उपस्थित तर जिथे समस्या तिथे तोडगा घेऊन भारत हजर असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
कोरोना संकटाच्या काळात जगाला लस आणि औषधांचा पुरवठा ते पुरवठा साखळी विस्कळीत झाली असताना आत्मनिर्भर भारत ही आशा इथपासून ते जागतिक अस्थिर आणि संघर्षाच्या परिस्थितीत शांततेसाठी समर्थ राष्ट्राची भूमिका इथपर्यंत भारत हा आज जगासाठी नवी आशा ठरला आहे असे ते म्हणाले.
संपूर्ण मानव जगताला आम्ही योग मार्गाचे दर्शन घडवत आहोत, आयुर्वेदाच्या सामर्थ्याची ओळख करून देत आहोत. आज सरकारची कार्य शैली आणि समाजाच्या मानसिकतेत परिवर्तन घडले असून लोक सहभागही वाढला असल्याचे त्यांनी नमूद केले. आज भारत जगातली तिसरी सर्वात मोठी स्टार्ट अप यंत्रणा असलेला देश असून भारताचे युवा त्याचे नेतृत्व करत आहेत. सॉफ्टवेअर ते अंतराळ क्षेत्रापर्यंत उगवत्या भविष्यासाठी सज्ज असलेला देश म्हणून भारत पुढे येत आहे. आपल्यासाठी संस्कार म्हणजे शिक्षण, सेवा आणि संवेदनशीलता ! आपल्यासाठी संस्कार म्हणजे निष्ठा,दृढ निर्धार आणि शक्ती ! आपली प्रगती साध्य करूया मात्र त्याच बरोबर ती इतरांच्या कल्याणाचे माध्यमही ठरावी ! आपण यशाची नव-नवी शिखरे साध्य केली तरी आपले यश हे सर्वांच्या सेवेचे साधन असावे! हेच भगवान स्वामीनारायण यांच्या शिकवणीचे सार आहे आणि हाच भारताचा स्वभावधर्मही असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
वडोदऱ्याशी असलेल्या आपल्या प्रदीर्घ संबंधाचे स्मरण करत या स्थानाचे आपल्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनात असलेले महत्व त्यांनी नमूद केले. स्टॅचू ऑफ युनिटी मुळे वडोदरा हे जागतिक आकर्षणाचे महत्वाचे स्थान ठरले आहे. त्याच प्रमाणे पावागड मंदिर ही लोकांना आकर्षित करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. ‘संस्कार नगरी’ वडोदरा ही जगभरात ओळखली जाऊ लागली असून वडोदरा इथे निर्माण केलेले मेट्रोचे डबे जगभरात वापरले जात असून हेच वडोदऱ्याचे सामर्थ्य आहे. स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी प्राणार्पण करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली नाही मात्र आपण देशासाठी जगू शकतो असे त्यांनी सांगितले. 15 ऑगस्ट 2023 पर्यंत आपण रोकड व्यवहाराऐवजी डिजिटल व्यवहार आपलेसे करू शकतो का? असा सवाल त्यांनी केला. आपले लहानसे योगदान छोटे व्यापारी आणि विक्रते यांच्या जीवनात प्रचंड परिवर्तन घडवू शकते. त्याचप्रमाणे स्वच्छता,एकदाच वापरात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर रोखणे आणि कुपोषण रोखणे यासाठी आपण संकल्प घेऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
काशी घाट स्वच्छतेसाठी नागालँन्ड कन्येने घेतलेल्या मोहिमेचा त्यांनी उल्लेख केला. तिने एकटीने सुरवात केली मात्र त्यामध्ये अनेकजण सहभागी झाले. यातून निर्धाराच्या सामर्थ्याची प्रचीती येते. याचप्रमाणे विजेची बचत किंवा नैसर्गिक शेतीचा स्वीकार यासारख्या छोट्या उपायांचा अंगीकार करत देशाला सहाय्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
* * *
S.Thakur/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1826649)
Visitor Counter : 264
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam