गृह मंत्रालय

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठकीत घेतला अमरनाथ यात्रेसंबंधी तयारीचा आढावा


यात्रेकरूंची सुरक्षा आणि आवश्यक सुविधांबाबत केंद्रीय गृहमंत्र्यांची प्रदीर्घ बैठक

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांना विनाअडथळा दर्शन व्हावे आणि त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, याला मोदी सरकारचे प्राधान्य अमित शहा यांच्याकडून व्यक्त

यात्रेकरूंचा प्रवास, रहाण्याची सोय, वीज, पाणी, संपर्क आणि आरोग्य या दृष्टीने सर्व आवश्यक पुरेशी व्यवस्था करण्याच्या दिल्या सूचना

कोविड-19 महामारीनंतर ही पहिलीच यात्रा असून उंचावरील प्रदेश असल्याने आरोग्याचे प्रश्न असलेल्या यात्रेकरूंसाठी पुरेशी व्यवस्था करावी लागणार

अधिक चांगल्या संपर्कासाठी आणि प्रवासाच्या मार्गावर माहिती लगेचच प्रसारित करता यावी यासाठी मोबाईल टॉवर्सची संख्या वाढवावी, तसेच दरडी कोसळल्या तर ताबडतोब मार्ग खुले करण्यासाठी साधने तैनात करण्याचे निर्देश

कुठल्याही वैद्यकीय आणीबाणीच्या स्थितीचा सामना करण्याची वेळ आल्यास पुरेशा प्रमाणात प्राणवायूच्या सिलिंडर्सची सुनिश्चिती करण्यासोबतच, 6 हजार फुटांवरील उंच प्रदेशात पुरेशा रुग्णशय्या आणि रूग्णवाहिका तसेच हेलिकॉप्टर्स तैनात करावे

अमरनाथ यात्रेच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा यांत्रेकरूंच्या सोयीसाठी वाढवण्यात याव्यात

Posted On: 17 MAY 2022 6:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 मे 2022

 

केंद्रीय  गृह आणि सहकारमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्ली येथे आज अमरनाथ यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. जम्मू आणि काश्मीरचे  नायब राज्यपाल मनोज सिन्हा, केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, जम्मू आणि काश्मीरचे  मुख्य सचिव तसेच  केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी अमरनाथ यात्रेची सुरक्षा आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधांवर प्रदीर्घ  बैठक घेतली. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार  अजित डोवल, जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल   मनोज सिन्हा, लष्करप्रमुख, केंद्रीय गृहसचिव, गुप्तचर विभागाचे संचालक, जम्मू आणि काश्मीरचे  मुख्य सचिव तसेच सुरक्षा संस्थांचे वरिष्ठ अधिकारी  बैठकीत सहभागी झाले होते.

अमरनाथ यात्रेला येणाऱ्या भाविकांना विनाअडथळा दर्शन व्हावे आणि त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, य़ाला मोदी सरकारचे प्राधान्य आहे, असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले.  यात्रेकरूंचा  प्रवास आणि राहाण्याची सोय, वीज, पाणी, संपर्क आणि त्यांचे आरोग्य यासाठी आवश्यक त्या सुविधांच्या दृष्टीने व्यवस्था करण्याचे निर्देश  अमित शहा यांनी दिले. कोविड- 19 महामारीनंतर ही पहिलीच यात्रा होत असून उंचावरील प्रदेशामुळे यात्रेकरूंना आरोग्याशी संबंधित काही प्रश्न निर्माण झाले तर पुरेशी व्यवस्था असायला हवी, असे त्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री  म्हणाले की, यात्रेच्या मार्गावर चांगल्या संपर्कासाठी तसेच  माहितीचा प्रसार करण्यासाठी मोबाईल टॉवर्सची संख्या वाढवली पाहिजे. दरडी कोसळल्या तर त्वरित मार्ग खुले करण्यासाठी यंत्रणा तैनात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.  अमित शहा यांनी  6,000 फूट उंचीवर पुरेशा प्रमाणात प्राणवायूचा  पुरवठा करणारे सिलिंडर्स आणि वैद्यकीय रुग्णशय्या, तसेच वैद्यकीय आणीबाणीच्या काळात हेलिकॉप्टर्स तैनात करण्याची सुनिश्चिती करण्याचे निर्देशही दिले. अमरनाथ यात्रेच्या कालावधीत यात्रेकरूंच्या सुविधेसाठी सर्व प्रकारची वाहतूक सेवा वाढवण्यात  आली पाहिजे, असेही ते म्हणाले.

जम्मू आणि काश्मीरचे मुख्य सचिव म्हणाले की, प्रथमच प्रत्येक अमरनाथ यात्रेकरूला आरएफआयडी कार्ड देण्यात येईल आणि त्याचा पाच लाखांचा विमा उतरवला जाईल. टेंट सिटी (तंबूंची व्यवस्था) वायफाय हॉटस्पॉट्स आणि योग्य प्रकारची विजेची व्यवस्था यात्रेच्या मार्गावर केली जाईल. यासोबतच, पवित्र अमरनाथ गुंफेत बाबा बर्फानी यांच्या  ऑनलाईन थेट दर्शनाची व्यवस्था तसेच प्रत्येक सकाळी आणि सायंकाळी आरतीचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल आणि  धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम बेस कँप येथे आयोजित करण्यात येतील.

 

 

 

 

S.Kulkarni/U.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1826078) Visitor Counter : 193