निती आयोग
नीती आयोगाच्या 'एक्सपीरिअन्स स्टुडिओ ऑन ड्रोन्स' प्रकल्पाचा केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याकडून प्रारंभ
Posted On:
10 MAY 2022 4:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 मे 2022
नवोन्मेषाला चालना आणि सार्वजनिक सेवांमध्ये ड्रोनचा स्वीकार, यादृष्टीने सहयोगात्मक वातावरण निर्माण करण्यासाठी, केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी, नीती आयोगामध्ये, 'एक्सपीरिअन्स स्टुडिओ ऑन ड्रोन्स' अर्थात, 'ड्रोनवरील अनुभूती केंद्र' या प्रकल्पाचा प्रारंभ केला. या उद्घाटन समारंभासाठी नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हेही उपस्थित होते. "2030 पर्यंत भारताला जागतिक ड्रोन हब/ केंद्र म्हणून नावारूपाला आणण्याइतके सामर्थ्य आपल्यामध्ये दडलेले आहे." असे मत सिंदिया यांनी व्यक्त केले. मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे, ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग विविध औद्योगिक तसेच संरक्षण क्षेत्रातील कामांसाठी करण्याचे प्रमाण वाढवणे ही काळाची गरज आहे", असेही त्यांनी सांगितले.
'ड्रोन उद्योगातील सक्रिय भागधारक आणि भारत सरकार यांच्या सक्रिय सहभागाने ड्रोन उद्योगाची आत्यंतिक वेगाने घोडदौड सुरू झाली आहे', असेही ते म्हणाले. शिवाय, नीती आयोगातील हे अद्ययावत अनुभूती केंद्र म्हणजे, तंत्रज्ञानाच्या उत्कृष्टतेचे द्योतक आहे. वास्तव जगातील आजमितीच्या प्रश्नांवर उत्तरे शोधण्यासाठी जिज्ञासू मनांना हे केंद्र निश्चितच प्रेरणा देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
"आज सुरू झालेल्या नीती अनुभूती केंद्रामुळे, ड्रोन तंत्रज्ञानाचे विविध प्रकारचे उपयोजन सार्वजनिक तसेच खासगी भागधारकांपर्यंत पोहोचवेल तसेच त्यांच्या-त्यांच्या संस्था व क्षेत्रांत ड्रोन तंत्रज्ञानाला जलद स्वीकृती मिळावी, यासाठीही या केंद्राचा फायदा होईल. व त्यायोगे भारतात ड्रोन उद्योगाची भक्कम पायाभरणी होईल", असा विश्वास सुमन बेरी यांनी व्यक्त केला.
"या अनुभूती केंद्राच्या माध्यमातून स्टार्टअप आणि अन्य उद्योगांना त्यांच्या अभिनव संकल्पना मांडता येतील. तसेच नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आजच्या गरजांवर शोधलेली उत्तरे प्रदर्शित करता येतील.' असे मत अमिताभ कांत यांनी मांडले.
केंद्रीय नागरी विमानवाहतूक मंत्रालयाच्या सहकार्याने, नीती आयोगाकडून आयोजित होणाऱ्या विविध स्पर्धांची घोषणाही केंद्रीय मंत्री सिंदिया यांनी यावेळी केली. मे महिन्यात ड्रोन संकल्पनेवर आधारित स्पर्धा नीती आयोग, जागतिक आर्थिक मंच आणि भारतीय ड्रोन महासंघ यांच्या सहकार्याने घेणार आहे. या महिन्यात संबंधित कार्यक्रम व इतर छोट्या ध्वनिचित्रफीती, गटचर्चा आदी स्वरूपातील आशय पुढील संकेतस्थळावर पाहता येतील - https://cic.niti.gov.in
याविषयी आणखी सविस्तर माहिती पुढील संकेतस्थळावर मिळेल. - https://cic.niti.gov.in
* * *
S.Kane/J.Waishampayan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1824173)
Visitor Counter : 219