राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बोडो साहित्य सभेच्या 61 व्या वार्षिक संमेलनाला राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 04 MAY 2022 3:56PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 4 मे 2022

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज 4 मे 2022 रोजी आसाममधील तमुलपूर येथे बोडो साहित्य सभेच्या 61 व्या वार्षिक संमेलनाला उपस्थित राहिले.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, केंद्र सरकार आणि ईशान्य प्रदेशातील राज्यांची सरकारे यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या भागात शांती आणि एकोप्याचे वातावरण अधिकाधिक बळकट होत आहे. या बदलामध्ये या भागात होत असलेल्या विकासात्मक कामांची महत्त्वाची भूमिका आहे याकडे त्यांनी निर्देश केला. हा बदल घडवून आणल्याबद्दल राष्ट्रपतींनी केंद्र सरकार, राज्य सरकारे तसेच या प्रदेशातील स्थानिक रहिवाशांचे कौतुक केले.

बोडो जनतेमध्ये मे महिन्याला मोठे महत्त्व आहे कारण या महिन्यात 1 तारखेला ते त्यांचे नेते बोडोफा उपेंद्र नाथ ब्रह्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वजण त्यांचे स्मरण करतात याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. ते म्हणाले की, बोडोफा यांनी “जगा आणि जगू द्या” हा संदेश सर्वदूर पोहोचविला. बोडो असण्याचा स्वाभिमान राखून सर्व समुदायांसोबत एकोपा राखण्याचा त्यांनी दिलेला संदेश कायमच समर्पक राहील असे ते म्हणाले.

गेली 70 वर्षे बोडो भाषा, साहित्य आणि संस्कृती यांना सशक्त करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल राष्ट्रपतींनी बोडो साहित्य सभेची प्रशंसा केली. ते म्हणाले की, बोडो साहित्य सभेचे संस्थापक-अध्यक्ष जॉय भद्र हक्झर आणि महासचिव सोनाराम ठोसन यांनी बोडो भाषेला मान्यता मिळवून देण्यासाठी अत्यंत स्तुत्य प्रयत्न केले आहेत. शालेय शिक्षणाचे माध्यम म्हणून बोडो भाषेचा वापर सुरु करण्यात तसेच या भाषेला उच्च शिक्षण प्रणालीत स्थान मिळवून देण्यात या सभेने महत्त्वाची भूमिका बजावली आहे असे ते म्हणाले.

आतापर्यंत 17 लेखकांना त्यांनी बोडो भाषेत निर्माण केलेल्या साहित्याबद्दल साहित्य अकादमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे आणि त्यापैकी 10 जणांना काव्यक्षेत्रातील कार्यासाठी गौरविण्यात आले आहे याचा राष्ट्रपती कोविंद यांनी उल्लेख केला. यावरून, बोडो भाषेतील लेखकांचा काव्यरचनेकडे असलेला नैसर्गिक कल दिसून येतो असे निरीक्षण त्यांनी नोंदविले. मात्र असे लक्षात आले आहे की अस्सल साहित्य निर्मितीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळविणाऱ्या ज्येष्ठ लेखकांमध्ये केवळ दोन महिलांचा समावेश आहे असे सांगत राष्ट्रपतींनी महिला लेखकांना प्रोत्साहन देण्याची विनंती बोडो साहित्य संघाच्या सदस्यांकडे केली. कोणताही साहित्यप्रकार सजीव आणि कालानुरूप असण्यासाठी त्यात तरुण पिढीचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो आणि म्हणून बोडो साहित्य संघाने तरुण लेखकांना विशेष प्रोत्साहन दिले पाहिजे असे ते म्हणाले.

इतर भाषांमधील साहित्य अत्यंत उत्साहपूर्ण पद्धतीने बोडो भाषेत भाषांतरित होऊ लागले आहे हे समजल्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांनी आनंद व्यक्त केला. हे कोणत्याही चैतन्यमय साक्षर समाजाचे वैशिष्ट्य आहे असे मत व्यक्त करून ते म्हणाले की, अशा प्रकारे भाषांतरित साहित्य इतर भारतीय भाषा तसेच जागतिक साहित्य यांच्याशी परिचय करून घेण्यात बोडो भाषेच्या वाचकांना उपयुक्त ठरेल.

राष्ट्रपती म्हणाले की, स्थानिक भाषेचे जतन आणि संवर्धन ही त्या त्या समाजाची आणि सरकारची जबाबदारी आहे. बोडो भाषेच्या प्रसाराला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आसाम सरकारला केले.

राष्ट्रपतींचे भाषण हिंदी भाषेतून वाचण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1822624) अभ्यागत कक्ष : 264