विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) नवउद्यम (स्टार्ट-अप), 'एआय' संशोधन आणि शाश्वतता तसेच आरोग्य सेवेमध्ये त्याचा उपयोग यावर लक्ष केंद्रित करून एकत्र काम करण्यावर भारत आणि जर्मनी सहमत
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी बर्लिनमध्ये जर्मनीच्या शिक्षण आणि संशोधन मंत्री बेट्टीना स्टार्क-वॅटझिंगर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली आणि सध्या सुरू असलेल्या द्विपक्षीय विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले
Posted On:
03 MAY 2022 6:58PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2022
कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) नवउद्यम (स्टार्ट-अप), 'एआय' संशोधन आणि शाश्वतता तसेच आरोग्य सेवेमध्ये त्याचा उपयोग यावर लक्ष केंद्रित करून एकत्र काम करण्यावर भारत आणि जर्मनीने सहमती दर्शवली आहे. जर्मनीच्या शिक्षण आणि संशोधन मंत्री, बेट्टीना स्टार्क-वॅटझिंगर यांच्याबरोबरच्या द्विपक्षीय भेटीनंतर विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात एकत्र काम करण्यास भरपूर वाव आहे असे उभय नेत्यांनी मान्य केले. यासाठी दोन्ही बाजूंचे तज्ञ आधीच भेटले आहेत. संशोधक आणि उद्योगांकडून प्रस्ताव मागवून लवकरच यासंबंधीच्या प्रस्तावांसाठी भारत-जर्मनी पुढाकार घेतला जाणार आहे.
उभय देशांमधे द्विपक्षीय संबंधांच्या धोरणात्मक स्तंभांपैकी महत्वाच्या अशा सध्या सुरु असलेल्या विज्ञान आणि तंत्रज्ञान सहकार्यावर भारत आणि जर्मनी या दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केले आहे.
दोन्ही देश आता विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या क्षेत्रात काम करत आहेत. यात इलेक्ट्रिक मोबिलिटी, सायबर फिजिकल सिस्टीम, क्वांटम तंत्रज्ञान, भविष्यातील उत्पादन, ग्रीन हायड्रोजन इंधन, खोल महासागरात संशोधन यांचा समावेश आहे. या क्षेत्रांमध्ये संयुक्त सहकार्य विकसित करण्याचा प्रस्ताव आहे असे बर्लिनमधील अधिकृत भेटीच्या तिसर्या दिवशी डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.
विज्ञान आणि अभियांत्रिकीमधील मानवी क्षमता विकासासाठी अलीकडेच अनेक उपक्रम राबवले गेले आहेत याबद्दल दोन्ही मंत्र्यांनी आनंद व्यक्त केला. यात महिला संशोधकांना सुरु असलेल्या एस अँड टी प्रकल्पांमध्ये थेट प्रवेश आणि अभ्यासवृत्ती (पेअर अर्ली करिअर फेलोशिप) तयार करण्यासाठी विज्ञान आणि अभियांत्रिकी संशोधनामध्ये महिलांचा सहभाग (डब्लूआयएसईआर) समाविष्ट आहे. या माध्यमातून दोन्ही बाजूंच्या तरुण संशोधकांच्या देवाणघेवाणीसह भारत-जर्मनी एस अँड टी सहकार्यासाठी सर्वसमावेशक परिसंस्था तयार केली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार नवोन्मेषाला खूप महत्त्व देते. सध्याचे सरकार नावीन्य, उद्योजकता आणि आयपी निर्मितीच्या मूल्य साखळीला चालना देण्यावर भर देते असे डॉ जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.
N.Chitale/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1822387)
Visitor Counter : 235