गृह मंत्रालय

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बसव जयंतीनिमित्त बेंगळूरू येथे बसवण्णा यांना वाहिली आदरांजली


अमित शाह यांनी नृपतुंग विद्यापीठाच्या उद्‌घाटनासह विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन करून केली पायाभरणी

Posted On: 03 MAY 2022 6:34PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मे 2022

 

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी बसव जयंतीनिमित्त आज बेंगळूरू येथे बसवण्णा यांना आदरांजली वाहिली. तसेच दुसऱ्या एका कार्यक्रमात शाह यांनी नृपतुंग विद्यापीठाचे उद्‌घाटन केले तसेच इतर विविध प्रकल्पांचे उद्‌घाटन आणि  पायाभरणी केली.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की,हे वर्ष स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे म्हणजे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे वर्ष आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला 75 वर्षे झाली आहेत आणि देशातील लोकांनी आपापल्या पद्धतीने या राष्ट्र उभारणीमध्ये योगदान दिले आहे. या 75 वर्षांच्या प्रवासात देशाने अनेक महत्त्वाचे टप्पे पार केले आहेत. स्वातंत्र्यप्राप्तीचे 75 वे वर्ष अनेक महत्त्वाच्या घटनांसह साजरे करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे असे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे युवकांनी आपल्या स्वातंत्र्यसैनिकांविषयी जाणून घेऊन राष्ट्रभक्ती स्वतःमध्ये बिंबवत देशाला भविष्यात पुढे न्यावे. स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष म्हणजे निश्चय करण्याची वेळ आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने अशी शपथ घ्यायला हवी की मी येत्या 25 वर्षांत देशाच्या विकासात योगदान देईन आणि आपल्या भारताला स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवी वर्षापर्यंत म्हणजे 2047 पर्यंत जागतिक पातळीवरील आघाडीचा  देश बनवून स्वातंत्र्यसैनिकांचे स्वप्न पूर्ण करीन. ते म्हणाले की जेव्हा 130 कोटी लोक अशी शपथ घेतील तेव्हा देश 130 कोटी पावले पुढे टाकेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रत्येक प्रयत्न आणि प्रत्येक विचार हा देशाला प्रत्येक क्षेत्रात  जगामधील सर्वोत्तम देश कसा बनवता येईल याचसाठी असतो आणि त्यासाठीच त्यांनी अनेक उपक्रम सुरु करून ते निश्चयाने  राबविले देखील आहेत असे अमित शाह यांनी सांगितले.

 कलम 370 आणि 35अ यासारखे अनेक मुद्दे मोदी यांनी निकाली काढले असे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी सांगितले. औद्योगिक क्षेत्रात अनेक नव्या योजना राबवून आम्ही भारताला औद्योगिक केंद्र बनविण्यासाठी काम करतो आहोत.जर भारत उत्पादन क्षेत्रातील मोठे केंद्र होऊ शकला तर ते आपल्यासाठी दोन दृष्टींनी महत्त्वाचे आहे. एक म्हणजे 130 कोटी लोकसंख्येचा मोठा बाजार उपलब्ध असणे आणि दुसरे म्हणजे जर भारत उत्पादनाचे मोठे केंद्र बनला तर देशातील युवकांना देखील जास्त संधी उपलब्ध होतील असे त्यांनी सांगितले. अमित शाह म्हणाले की नरेंद्र मोदी सरकारने अनेक क्षेत्रांमध्ये मोठे यश मिळविले आहे आणि त्यामुळे जेव्हा देश स्वातंत्र्यप्राप्तीचा सुवर्णमहोत्सव साजरा करत असेल तेव्हा तो जगातील सर्वोच्च स्थानी असेल आणि तेव्हा देशाची घोडदौड कोणीही रोखू  शकणार नाही यावर लोकांचा विश्वास वृद्धिंगत झाल्याचे शाह यांनी सांगितले.

 

 

 

 

 

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 



(Release ID: 1822381) Visitor Counter : 184