उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

प्रतिबंधात्मक आरोग्य सुविधांविषयी जनजागृती करण्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांचे आवाहन


जीवनशैलीतील बदल आणि पोषक आहारच्या सवयी उत्तम आरोग्यासाठी आवश्यक-उपराष्ट्रपती

चेन्नई येथील स्वर्ण भारत विश्वस्त संस्था आणि ग्लोबल हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वैद्यकीय शिबिराचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन

Posted On: 28 APR 2022 4:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 एप्रिल 2022

 

वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी, आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि उत्तम, निरोगी जीवनशैलीविषयी जनजागृती करावी, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले.

एक, मजबूत, सुदृढ आणि समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्नांची गरज असल्याचे अधोरेखित करत, उपराष्ट्रपतींनी सरकारच्या प्रयत्नांना जोड देत, खाजगी संस्था, मोठे कॉर्पोरेट उद्योग आणि व्यक्तींनीही आपला वेळ आणि संसाधनांचा वापर करायला हवा, असे आवाहन केले.

चेन्नईतील नेल्लोर इथे, स्वर्ण भारत विश्वस्त संस्था आणि ग्लोबल हॉस्पिटल यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या वैद्यकीय रशिबिराचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. सध्याची बैठी आणि तणावग्रस्त जीवनशैली तसेच चुकीच्या आहाराच्या सवयी, यामुळे देशात आज जीवनशैलीमुळे होणाऱ्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यामुळे, सर्वांनी, विशेषतः युवा पिढीने, नियमित शारीरिक व्यायाम करावेत आणि आपले तन-मन सुदृढ राखावे असे आवाहन त्यांनी केले.

संसद, प्रसारमाध्यमे, राजकीय पक्ष अशा सर्वांनीच, आरोग्य, शिक्षण आणि कृषी अशा तीन क्षेत्रांना सर्वोच्च प्राधान्य द्यायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सरकारनेही या महत्वाच्या क्षेत्रांसाठी अधिक निधीची तरतूद करावी, असा सल्ला त्यांनी दिला.

युवकांमध्ये आता ‘फास्ट फूड’ संस्कृती वाढत असल्याचे संदर्भ देत, त्यांनी युवकांना पारंपरिक पद्धतीने, शिजवलेले घरगुती, पोषक अन्न खावे असा सल्ला दिला. तसेच, दिवसातला काही वेळ, निसर्गाच्या कुशीत घालवावा, असा सल्ला नायडू यांनी दिला.

युवकांमध्ये अमली पदार्थ सेवनाचे आकर्षणही वाढते आहे, याविषयी चिंता व्यक्त करत, उपराष्ट्रपती म्हणाले, की युवकांना अशा अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे भयंकर दुष्परिणाम  काय असतात, यांची जाणीवजागृती करुन द्यायला हवी. अंमली पदार्थांचा विळखा मूळातून सोडवण्यासाठी, एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, हे त्यांनी अधोरेखित केले.

या शिबिरात, फुफ्फुसांचे आजार, हाडांचे आजार, नेत्रविकास, दंतचिकित्सा आणि इतर अनेक आजारांची चिकित्सा केली जात आहे. तसह मोतिबिंदू शस्त्रक्रियाही केल्या जात आहेत. 500 पेक्षा जास्त रुग्णांची या शिबिरात तपासणी केली गेली. नायडू यांनी हे शिबिर आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले.  


* * *

S.Bedekar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1820944) Visitor Counter : 224