दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय मंत्रिमंडळाने "इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या स्थापने"संदर्भात खर्चाच्या सुधारित अंदाजाला मंजुरी दिली


आर्थिक वर्ष 2020-21 ते 2022-23 साठी 820 कोटी रुपये अतिरिक्त निधी तर एकूण खर्च आता 2255 कोटी रुपये

Posted On: 27 APR 2022 8:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2022

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नियामक आवश्यकता पूर्ण करण्यासाठी इक्विटी इन्फ्युजन म्हणून इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ची स्थापना करण्यासाठी प्रकल्प खर्च  1435 कोटी रुपये वरून  2255 कोटी रुपये करायला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने नियामक आवश्यकतांची पूर्तता आणि तांत्रिक अद्ययावतीकरणासाठी  500 कोटी रुपयांच्या भविष्यातील निधी उभारणीस तत्त्वत: मान्यता दिली.

सामान्य माणसासाठी सर्वात सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह बँक तयार करणे, बँकिंग नसलेल्या लोकांसाठी अडथळे दूर करून  वित्तीय समावेशकतेला चालना देणे आणि घरपोच  बँकिंग सेवेद्वारे बँकेचा अनुभव नसलेल्या  लोकांसाठी  खर्च कमी करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. हा प्रकल्प भारत सरकारच्या "कमी रोकड" अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनाला पूरक आहे आणि त्याच वेळी आर्थिक विकास व वित्तीय समावेशनाला प्रोत्साहन देणारा आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने 1 सप्टेंबर 2018 रोजी 650 शाखा/नियंत्रक कार्यालयांसह  देशभरात प्रारंभ केला.  इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने  1.36 लाख टपाल कार्यालयांना  बँकिंग सेवा प्रदान करण्यास सक्षम बनवले आहे आणि घरोघरी बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी सुमारे  1.89 लाख पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवकांना स्मार्टफोन आणि बायोमेट्रिक उपकरणाने सुसज्ज केले आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक सुरु  झाल्यापासून, 1,61,811 कोटी रुपयांच्या एकूण 82 कोटी आर्थिक व्यवहारांसह 5.25 कोटी खाती उघडली आहेत ज्यात 21,343 कोटी रुपयांच्या 765 लाख AePS व्यवहारांचा समावेश आहे. 5 कोटी खात्यांपैकी 77% खाती ग्रामीण भागात उघडली आहेत, 48% महिला ग्राहक असून त्यांचे सुमारे  1000 कोटी रुपये जमा आहेत. सुमारे 40 लाख महिला ग्राहकांना त्यांच्या खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे  2500 कोटी रुपये जमा झाले आहेत.  शालेय विद्यार्थ्यांसाठी 7.8 लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत.

महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने  सुमारे 95.71 लाख खाती उघडली आहेत ज्यात 19,487 कोटी रुपयांचे एकूण 602 लाख  व्यवहार  आहेत. नक्षलवादी जिल्ह्यांमध्ये, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने  67.20 लाख खाती उघडली आहेत ज्यात 13,460 कोटी रुपयांचे एकूण 426 लाख व्यवहार झाले आहेत.

प्रस्तावांतर्गत एकूण आर्थिक खर्च  820 कोटी रुपये आहे. या निर्णयामुळे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेला  टपाल विभागाच्या नेटवर्कचा फायदा घेऊन संपूर्ण भारतात  आर्थिक समावेशनला चालना देण्याचे उद्दिष्ट साध्य  करण्यात मदत होईल.


* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820714) Visitor Counter : 148