युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

अनुराग ठाकूर आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2021’ च्या राज्याच्या तयारीचा घेतला आढावा


खेलो यूथ इंडिया गेम्स 4 ते 13 जून दरम्यान होणार

‘खेलो इंडिया युथ गेम्समध्ये नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्य केले तर देशभरामध्ये हरियाणाचे अधिक नाव होईलः अनुराग ठाकूर

‘खेलो इंडिया युथ गेम्सचा शुभंकर आणि बोधचिन्हाचे 8 मे रोजी अनावरण करणार

Posted On: 26 APR 2022 7:17PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 एप्रिल 2022

 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2021च्या आयोजन आणि समन्वय समितीच्या आभासी बैठकीत सहभागी होऊन क्रीडा स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल उपस्थित होते. ‘खेलो इंडिया युथ गेम्स 2021 चे दि. 4 ते 13 जून या कालावधीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या तयारीसंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होत. यावेळी हरियाणाचे क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री सरदार संदीप सिंग, राज्याचे संबंधीत विभागाचे अधिकारी आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

या क्रीडा महोत्सवामध्ये 18 वर्षाखालील वयोगटातील मुलांच्या क्रीडा स्पर्धा  पंचकुला सोबत  शाहबाद, अंबाला, चंदिगड आणि दिल्ली येथे होणार आहेत. या क्रीडा महोत्सवामध्ये सुमारे 8,500 खेळाडू सहभागी होणार आहेत. यामध्ये भारतातील  देशी पाच प्रकारच्या खेळांसह एकूण 25 प्रकारचे खेळ खेळले जाणार आहेत. या क्रीडा महोत्सवामध्ये खेळांचे आयोजन सुरळीत पार पाडण्यासाठी तयारी सुरू असून त्याविषयीची सर्व तपशीलवार माहिती या बैठकीत केंद्रीय क्रीडा मंत्र्यांना यावेळी मनोहर लाल यांनी दिली. 

खेळांसाठी उत्तम पायाभूत सुविधा तयार

हरियाणाचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले,  पंचकुला येथे इंद्रधनू  सभागृहामध्ये 8 मे रोजी खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेच्या शुभंकरचे आणि बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सर्व तयारी पूर्ण झाली  आहे. खेळांसाठी बहुउपयोगी ठरणारी  2-3 सभागृहे, सिंथेटिक ट्रॅक, अॅथलेटिक ट्रॅक बांधण्यात आले आहेत. याशिवाय बॅडमिंटन कोर्टच्या भागात सभागृह,  पंचकुलामधील सेक्टर 14 मधील  शासकीय महिला महाविद्यालय येथील कामही पूर्ण झाले आहे. तसेच पंचकुला आणि शाहबाद हॉकी स्टेडियमचे बांधकामही जवळपास पूर्ण झाले आहे, असे त्यांनी सांगितले. अंबाला येथे सर्व हवामानाला सुयोग्य असणा-या तरण तलावाचे काम पूर्ण झाल्याचेही मनोहर लाल यांनी नमूद केले.

क्रीडा स्पर्धांमध्ये हरियाणवी संस्कृतीची झलक दिसणार

या खेळांमध्ये हरियाणवी संस्कृतीची झलक दाखविणाऱ्या सांस्कृतिक कार्याक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असल्यामुळे स्वातंत्र्यलढ्यातल्या वीरांच्या गाथा आणि राज्यातल्या उत्कृष्ट क्रीडापटूंचा  परिचय करून देणारे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या खेळांसाठी 13 मे रोजी गुरूग्राममध्ये प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हरियाणाच्या कन्यांना समर्पित संकल्पनेवर लक्ष केंद्रीत करणार

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, हरियााणामध्ये मुलींना वाचविण्यासाठी  कौतुकास्पद काम करण्यात आले आहे. याशिवाय इथल्या मुलींनी क्रीडा क्षेत्रात परदेशात उत्कृष्ट कामगिरी करून देशाचा  झेंडा फडकवला आहे.  विद्यार्थीदशेतच मुलांमध्ये खेळाची आवड वाढीस लागावी, यासाठी लक्ष केंद्रीत केले पाहिजे. खेलो इंडिया युथ गेम्समध्ये नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी कार्य केले तर देशभरामध्ये हरियाणाचे  अधिक नाव  होईल, असे सांगून ठाकूर यांनी,  जूनमध्ये होत असलेल्या खेळांमध्ये कोविड-19 चे नियम पूर्णपणे पाळले जावेत आणि खेळाडूंच्या चाचण्यांची सर्व व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश दिले.

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1820262) Visitor Counter : 134