युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित संकल्प से सिद्धी: नवा भारत नवे संकल्प   या चर्चासत्रात “इंडिया @100 पर्यंत स्वयंसेवक घडवण्याचे धोरण” या सत्राला अनुराग ठाकूर यांनी केले संबोधित


तरुणांनी विकास कामात भाग घेतला आणि या कार्यात मदत केली तरच राष्ट्र सुदृढ राहू शकते: अनुराग ठाकूर

Posted On: 23 APR 2022 9:45PM by PIB Mumbai

 

अमृत महोत्सवाअंतर्गत आयोजित संकल्प से सिद्धी: नवा भारत नवे संकल्पया चर्चासत्रात इंडिया @100 पर्यंत स्वयंसेवक घडवण्याचे धोरण केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री, भारतीय उद्योग महासंघ आणि इंडिया@75 फाउंडेशन यांनी नवी दिल्लीत संयुक्तपणे या परिषदेचं आयोजन केलं होतं.

कोविड महामारीमुळे आपल्याला कोविड नंतरच्या काळात कसे जगायला हवे याविषयी पुनर्विचार आणि पुनर्कल्पना करण्याची गरज निर्माण झाली आहे. जेव्हा सगळ्या देशात टाळेबंदी लागू झाली होती, त्यावेळी लोकांनी स्वयंस्फूर्तीने केलेल्या मदतीमुळेच, देशातील गरिबांना अन्न मिळू शकले. अनेक भागात, स्वयंसेवक युवकांनी स्वतः घरोघरी जाऊन धान्यवाटप केले. तात्पुरत्या स्वयंपाकघरांची उभारणी करुन, गरजूंना अन्नवाटप केले, असे अनुराग ठाकूर म्हणाले.

नवा भारत-नवा संकल्प याविषयी बोलतांना ते म्हणाले, की जर देशातील युवा पिढी देशाच्या विकासकार्यात सहभागी झाली तरच  देश सुदृढ देश बनू शकतो. आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी केलेला त्याग आणि बलिदान युवकांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे. आज आपल्याला कुठलेही बलिदान करण्याची गरज नाही, मात्र देशासाठी आपण योगदान नक्कीच देऊ शकतो असे ठाकूर यांनी सांगितले.

भारतात, शाश्वत विकासाशी संबंधित केंद्र आणि राज्य सरकारांच्या अनेक योजनांमध्ये युवकांना सहभागी करुन घेतलं जात आहे, असेही त्यांनी नमूद केले. 2030 पर्यंत शाश्वत विकास साधण्याचा अजेंडा, जनतेच्या सहभागावर, जबाबदारीच्या तत्वावर आणि त्यांना या विकासाविषयी वाटणाऱ्या आत्मीयतेवरच अवलंबून आहे, असे त्यांनी सांगितले. या महामारीच्या काळातच देशात कशा अनेक स्टार्ट अप्स सुरु झाल्या आणि 47 युनिकॉर्न निर्माण झाल्या असे त्यांनी सांगितले.

विविध विकासकार्यात युवकांचा सहभाग वाढवण्यासाठी, त्यांना या कामांकडे आकर्षित करण्यासाठी, इतर संस्था आणि खाजगी क्षेत्रांनीही पुढाकार घ्यावा, अशी विनंती ठाकूर यांनी यावेळी केली.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने इंडिया@75 च्या अंतर्गत,संपूर्ण वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. संकल्प से सिद्धीयाच पथदर्शी कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे.

बहु-सहभागित्व असलेला संकल्प से सिद्धीहा कार्यक्रम, केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालय, भारतीय उद्योग महासंघ आणि इंडिया@75 फाउंडेशनने संयुक्तपणे आयोजित केला आहे. या शिखर परिषदेत, विविध क्षेत्रातील मान्यवरांना विविध क्षेत्रातील भारताची कामगिरी आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर चर्चा करण्यास आमंत्रित करण्यात आले आहे.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819427) Visitor Counter : 279