माहिती आणि प्रसारण मंत्रालय

प्रक्षोभक, वादग्रस्त, भडक मथळे देणे टाळा-मंत्रालयांची खाजगी वाहिन्यांना सूचना


दूरचित्रवाणीवरील वादविवाद-चर्चात्मक कार्यक्रमात असंसदीय भाषेचा वापर, पत्रकारांकडून बनावट दावे : मार्गदर्शक सूचनांमध्ये उल्लेख

Posted On: 23 APR 2022 4:12PM by PIB Mumbai

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने आज खाजगी वाहिन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. खाजगी प्रसार माध्यम वाहिन्यांनी खोटे, बनावट दावे आणि सनसनाटी निर्माण करणारे भडक मथळे देणे टाळावे, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. सर्वांनी, केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायदा, 1995 मधील कलम 20 च्या सगळ्या नियमांचे पालन करावे, विशेषतः कार्यक्रमाविषयी असलेल्या संहितांचे पालन केले जावे, अशी सूचना, या सविस्तर मार्गदर्शक सूचनांमध्ये करण्यात आली आहे.

गेल्या काही काळात अनेक उपग्रह वाहिन्यांवर अशा प्रकारचे कार्यक्रम होतात, ज्यात अधिकृत, प्रमाणित मजकूर नसतो, दिशाभूल करणारी, वादग्रस्त भडक वक्तव्ये आणि सामाजिकदृष्ट्या असभ्य म्हणता येईल, अशा भाषेचा वापर केला जातो, असे आढळले आहे. या कार्यक्रमाचा दर्जा, आणि पातळी दोन्ही अत्यंत खालावलेली असते. यातली भाषा, असभ्य आणि बदनामीकारक असते, ज्यात अनेकदा जातीय रंगही आढळतात. विशेषतः युक्रेन-रशिया युद्ध आणि उत्तर-पश्चिम दिल्लीत झालेल्या घटनांचे वार्तांकन ज्या पद्धतीने झाले, त्याचा उल्लेख करत, यासंदर्भातल्या कार्यक्रमात, विहित संहितेचे उल्लंघन झाल्याचे, या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे.

युक्रेन-रशिया युद्धाचे वार्तांकन करतांना, काही वाहिन्यांनी बातमीशी संबंध नसलेले अत्यंत भडक मथळे दिले असल्याचे मंत्रालयाला आढळले होते. तसेच पत्रकारही या संदर्भात अप्रमाणित, पुरावे नसलेले आणि बनावट दावे करत असल्याचे दिसून आले आहे. त्याशिवाय प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी अनेकदा, अतिशयोक्त विधानेही केली जात असल्याचे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. दिल्लीत झालेल्या हिंसाचाराचे वार्तांकन करतांना, काही वाहिन्यांनी, अत्यंत प्रक्षोभक मथळे आणि हिंसाचाराचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केले, ज्यामुळे, दोन समुदायांमध्ये द्वेषभावना निर्माण होऊन, देशातील शांतता आणि सुव्यवस्थेला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्याशिवाय, अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवायांनाही धार्मिक, जातीय रंग देणारे बनावट मथळे दिल्याचेही आढळले आहे.

या सगळ्यांची, मंत्रालयाने गंभीर दखल घेतली आहे तसेच,ज्या कार्यक्रमात किंवा वादविवादात  असंसदीय, प्रक्षोभक, जातीय, आणि सामाजिक दृष्ट्या मान्य होणार नाही, अशी आक्षेपार्ह भाषा वापरली असेल, तर असे कार्यक्रम प्रक्षेपित करु नये, असे या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. त्याशिवाय, जातीय टिप्पणी, कोणाविषयी आक्षेपार्ह विधान करु नये, जेणेकरुन, प्रेक्षकांसमोर याचा नकारात्मक परिणाम होणार नाही.  तसेच, अशी विधाने आणि कार्यक्रमांमधून, सामाजिक-धार्मिक सौहार्द आणि शांतता बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही यात म्हटले आहे.

या हिंसाचाराच्या घटनांचा उल्लेख करत, मंत्रालयाने याविषयी गंभीर चिंता व्यक्त करत, हे कार्यक्रम केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायदा, 1995 चे उल्लंघन करत असल्याचे म्हटले आहे.

या मार्गदर्शक सूचना, माहिती प्रसारण मंत्रालयाच्या www.mib.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

***

S.Patil/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1819304) Visitor Counter : 442