आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नॅशनल अकादमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या 62 व्या स्थापना दिन समारंभाला डॉ.मनसुख मांडविया यांनी केले संबोधित


“आपल्या राष्ट्राकडे मनुष्यबळाची किंवा बुद्धीमत्तेची कमतरता कधीच नव्हती. आपल्याला हवा फक्त आत्मविश्वास."

"आयुर्वेद, योग यासारख्या आपल्या स्वदेशी वैद्यकीय प्रणालींना आधुनिक वैद्यकीय पद्धतींशी जोडणे ही काळाची गरज"

Posted On: 21 APR 2022 2:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 21 एप्रिल 2022

नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (एनएएमएस) 62 व्या स्थापना दिन कार्यक्रमाला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज नवी दिल्ली येथे संबोधित केले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार, एनएएमएस अध्यक्ष डॉ. एस. के. सरीन, एनएएमएसचे उपाध्यक्ष, डॉ. आर. दयाल  आणि एनएएमएसचे माजी अध्यक्ष डॉ. एस.सी. गोपाल हे देखील यावेळी उपस्थित होते.

एनएएमएसच्या 62 व्या स्थापना दिनानिमित्त अभिनंदन करताना, डॉ. मनसुख मांडविया यांनी या कार्यक्रमात देशभरातील 20 हून अधिक नामवंत संस्थांच्या सहभागाबद्दल त्यांचे कौतुक केले.

भारताच्या कल्याणासाठी दिलेल्या सकारात्मक योगदानाबद्दल त्यांनी अकादमीचे कौतुक केले. “या राष्ट्राकडे मनुष्यबळाची किंवा बुद्धीमत्तेची कमतरता कधीच नव्हती.  आपल्याला हवा फक्त आत्मविश्वास." यावर त्यांनी भर  दिला. स्वतःचे स्वदेशी संशोधन पुढे नेण्यासाठी आत्मविश्वास बाळगण्यास त्यांनी उपस्थितांना प्रोत्साहित केले.  “आयुर्वेद, योग यासारख्या आपल्या स्वदेशी वैद्यकीय प्रणालींचे, आधुनिक वैद्यकीय पद्धतींसोबत एकत्रीकरण करणे ही काळाची गरज आहे.  संशोधन आणि नवोन्मेषावर अधिक भर द्यायला हवा”, असे ते म्हणाले.

कोविड महामारीच्या काळात भारतातील आरोग्य सेवा सुविधांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल ते  म्हणाले की, “आम्ही केवळ कोविड-19 प्रतिबंधक लस विकसित केली नाही तर फार कमी वेळात तिची निर्मिती आणि निर्यातही केली. भारताच्या कोविड व्यवस्थापन रणनीतीबाबत निराशाजनक आडाखे बांधले गेले होते परंतु आम्ही केवळ महामारीचे व्यवस्थापनच केले नाही तर जागतिक स्तरावर आमच्या सर्वोत्तम पद्धती देखील सामायिक केल्या.

अकादमी आणि संशोधकांना संशोधन आणि 'नवोन्मेषात खाजगी क्षेत्रासोबत सहकार्य करण्यासाठी डॉ. मांडविया यांनी प्रोत्साहित केले.  भारतातील आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी उपस्थितांकडून येणाऱ्या सूचनांचे स्वागत असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते “जर्नी ऑफ एनएएमएस” या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. मेळाव्यात उपस्थित शैक्षणिक संस्था आणि संघटनांच्या अध्यक्षांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

 

 

 

 

S.Kane/V.Ghode/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1818659) अभ्यागत कक्ष : 233