कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

नागरी सेवा दिनानिमित्त 21 एप्रिल 2022 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सार्वजनिक प्रशासनासाठीच्या उत्कृष्टता पुरस्कारांचे होणार वितरण


केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह उद्या नागरी सेवा दिन सोहोळ्याचे उद्घाटन करणार

Posted On: 19 APR 2022 8:15PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाच्या प्रशासकीय सुधारणा आणि तक्रार निवारण विभागाने नागरी सेवा दिन साजरा करण्याच्या हेतूने नवी दिल्ली येथे  20 आणि 21 एप्रिल 2022 या दोन दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), भूविज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) तसेच कार्मिक,सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुउर्जा आणि अवकाश विभाग तसेच पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह उद्या 20 एप्रिल 2022 रोजी होणाऱ्या उद्घाटनपार सोहोळ्यात मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असतील.

21 एप्रिल 2022 रोजी 15 व्या नागरी सेवा दिनानिमित्त, विविध जिल्हे, अंमलबजावणी विभाग तसेच इतर केंद्र आणि राज्य सरकारी संघटनांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सार्वजनिक प्रशासनासाठीच्या उत्कृष्टता पुरस्कारांचे वितरण होणार आहे. केंद्र सरकारने निश्चित केलेले प्राधान्याचे कार्यक्रम आणि अभिनव संशोधनात्मक कार्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे पुरस्कार दिले जातात.

सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी विविध जिल्हा प्रशासन आणि केंद्र तसेच राज्य सरकारच्या विविध संस्थांतर्फे केल्या जाणाऱ्या असामान्य आणि नवोन्मेषपूर्ण कार्याचा सन्मान करण्याच्या हेतूने या सार्वजनिक प्रशासनातील उत्कृष्टतेच्या पंतप्रधान पुरस्कारांची सुरुवात करण्यात आली आहे.

नागरी सेवा दिन 2022 निमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांसाठी खालील कार्यक्रम प्राधान्याने निश्चित करण्यात आले आहेत:

  1. पोषण अभियानात लोकसहभागाला प्रोत्साहन देणे.
  2. खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून क्रीडा आणि स्वास्थ्य यांमधील उत्कृष्टतेला प्रोत्साहित करणे,
  3. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या अंमलबजावणीत डिजिटल व्यवहार आणि उत्तम प्रशासनाची सुनिश्चिती करणे,
  4. एक जिल्हा, एक उत्पादन योजनेद्वारे समग्र विकासाला चालना देणे,
  5. कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय प्रत्येक नागरिकापर्यंत सरकारी सेवा सुरळीतपणे थेट पोहोचविणे (जिल्हे/ इतर संस्था)
  6. अभिनव संशोधन (केंद्र, राज्य आणि जिल्हे स्तरावर)

या वर्षी निश्चित केलेल्या 5 प्राधान्यक्रम कार्यक्रमांसाठी जिल्हे स्तरावर 10 पुरस्कार दिले जाणार आहेत तर केंद्र आणि राज्य सरकार पातळीवर 6 पुरस्कार दिले जाणार आहेत.

प्राधान्याचे कार्यक्रम आणि नवकल्पनांवर आधारित 2019,2020 आणि 2021 वर्षातील  पुरस्कारप्राप्त उपक्रमांवरील  प्रदर्शनाचे डॉ जितेंद्र सिंह उद्घाटन करतील. उद्घाटन सत्रानंतर दोन पूर्ण सत्रे होतील, यापैकी एक डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली 'व्हिजन इंडिया @ 2047-गव्हर्नन्स' या विषयावर  आणि दुसरे पूर्ण सत्र वाणिज्य आणि उद्योग  आणि ग्राहक व्यवहार आणि अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली 'आत्मनिर्भर भारत - निर्यातीवर भर या विषयावर होईल. .

याशिवाय, पीएम गति शक्ती, पीएम स्वनिधी योजनाद्वारे  डिजिटल पेमेंट्स आणि सुशासन, एक जिल्हा एक उत्पादन योजना आणि आकांक्षी जिल्हा कार्यक्रम- संपृक्तता या विषयांवर चार खंडित सत्रे आयोजित   केली  जातील.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी पंतप्रधान गति शक्ती तर  केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी विकास मंत्री, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हे पीएम स्वनिधी योजनाद्वारे डिजिटल पेमेंट आणि सुशासन या विषयावरील सत्राच्या अध्यक्षस्थानी असतील. आयसीआयसीआयचे अध्यक्ष  जी सी .  चतुर्वेदी, डिजिटल पेमेंट्स आणि सुशासन  या सत्राचे अध्यक्षपद भूषवतील. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, एक जिल्हा एक उत्पादन योजनेवरील सत्राचे अध्यक्षस्थान भूषवतील आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आकांक्षा जिल्हा कार्यक्रमावरील सत्राचे अध्यक्षपद भूषवतील.

21 एप्रिल, 2022 रोजी पुरस्कार वितरणादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्राधान्य कार्यक्रम आणि नवसंशोधनांवरील ई-पुस्तके प्रकाशित करतील, ज्यात प्राधान्य कार्यक्रम आणि नवसंशोधनाच्या अंमलबजावणीवरील यशोगाथा आहेत. पुरस्कार प्रदान करण्यापूर्वी पुरस्कार विजेत्या उपक्रमांवरील चित्रफीत देखील दाखवली जाईल.

***

S.Patil/S.Chitnis/S.Kane/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1818159) Visitor Counter : 184